शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

बुद्ध, फुले, गांधी, आंबेडकरांचा सम्यक विचार

By admin | Published: April 12, 2017 3:25 AM

२०१७ साली अवघ्या जगावर वंश, धर्म, जात परकीय द्वेष यांसारख्या संकुचित विभाजनवादी नि आक्रमक राष्ट्रवादाचे सावट पसरले आहे. ब्रिटनचा व काही युरोपियन

- प्रा. एच. एम. देसरडा२०१७ साली अवघ्या जगावर वंश, धर्म, जात परकीय द्वेष यांसारख्या संकुचित विभाजनवादी नि आक्रमक राष्ट्रवादाचे सावट पसरले आहे. ब्रिटनचा व काही युरोपियन देशांचा वंश, वर्ण, धर्म, वर्चस्ववादी उजव्या पक्षांच्या बाजूने झुकाव, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या कडव्या अतिउजव्या उपटसुंभ भूमाफियाचा (गोंडस शब्दात रिअल इस्टेटवाल्याचा) राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला विजय आणि त्यानंतर चाललेला कारभार या खचितच चिंतेच्या बाबी आहेत. सीरिया, तुर्कस्थान, इराक, सौदी यात चाललेला हैदोस व हिंसाचार, अगदी आपल्या शेजारच्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हल्ले यांनी अवघे जग चिंताक्रांत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत व २०१७ च्या उत्तर प्रदेशानंतर खुद्द आपल्या देशात आततायी अट्टाहास, विद्यार्थ्यांवर राष्ट्रद्रोहाचे खटले या सर्व बाबी चिंताजनक असून, इंटरनेटच्या जमान्यातील मानव समाज मध्ययुगीन अंधकारात लोटला जात आहे. खरे तर हे भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिष्ठान व मूल्यांना सरळसरळ आव्हान आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने याची चर्चा गांभीर्याने होणे नितांत गरजेचे आहे. जात, वर्ग, पुरुषसत्ताक व्यवस्था हे तर मुळी सर्व विषमतेचे मुख्य कारण आहेच. भरीस भर म्हणजे सरंजामी, भांडवली राजकीय अर्थकारणाने श्रमजीवी जनसमुदायाला आपल्या कह्या, कब्जात ठेवण्यासाठी सर्रासपणे बळाचा वापर केला गेला. आजही सर्रास करीत आहेत. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हिंसा नि वंशसंहाराच्या परिणामी मानव समाजाच्या वाटचालीबाबत काही मूलभूत प्रश्न विचारले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या लगोलग झालेली अमेरिकेतील स्वातंत्र्याची घोषणा, फ्रेंच राज्यक्रांती आणि ज्याला ज्ञानोदय व प्रबोधन पर्व म्हणतात तो विवेकवाद यामुळे लोकशाही मूल्यसंकल्पनेला गती मिळाली. वसाहतवाद व व्यापारी भांडवलशाहीचे स्थित्यंतर औद्योगिक भांडवलशाहीत होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर मानव निसर्गावर हुकूमत गाजवू लागला. त्याला कैफ चढला. गंमत म्हणजे अमेरिकेचे ट्रम्प, रशियाचे पुतीन, चिनचे झी नि भारताचे मोदी हे एका सुरात हीच विकास तंत्रज्ञान-उत्पादनाची भाषा बोलत आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर सरंजामी भांडवली सत्ताधीशांचे, महाजन अभिजन वर्गाचे चैनचोचले पुरे करण्यासाठी नाना तऱ्हेच्या वस्तू व सेवांचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढवले गेले. अर्थात, त्यांच्या दिमतीला असलेला संघटित कामगार-कर्मचारी वर्ग, सैन्य दल, पोलीस यंत्रणा यांनाही या वस्तुसेवांचा लाभ मिळाला. १९ व्या शतकात व २० व्या शतकाच्या पूर्वार्धात मुख्य राजकीय विवाद सामाजिक, आर्थिक विकास, उत्पादन वाढ व जनकल्याणासाठी भांडवलशाही व्यवस्था असावी की साम्यवादी-समाजवादी व्यवस्था हा होता. रशियन व चिनी क्रांती म्हणजे उत्पादन साधनांची सामाजिक मालकी अशी प्रणाली रूढ झाली. नंतरच्या काळात सरकार की बाजार ही चर्चा प्रकर्षाने पुढे आली. यूएसएसआरच्या अधिपत्याखालील सोव्हिएत राजवटीचे पतन झाल्यानंतर व चीनने बाजारी समाजवादाचा स्वीकार केल्यानंतर ‘जागतिकीकरणाचे’ नवे युग अवतरले.गेल्या पन्नास-साठ वर्षांत भांडवलाला विशेषत: वित्तीय भांडवलाला जगभर मुक्त संचार करण्याची मुभा मिळाली. २००८ च्या आर्थिक घसरणीनंतर वित्तीय भांडवलशाहीचा डोलारा टिकणार नाही, त्याच्या अंगभूत मर्यादा आहेत, हे जगभरच्या सामान्य लोकांना जाणवू लागले. उत्तरोत्तर प्रचलित विकासाचे विनाशकारी स्वरूप दररोज अधिकाधिक उघड होत आहे. आधुनिक औद्योगिक अर्थरचना, जीवनशैली व उत्पादन पद्धती ही निसर्ग आणि मानवासाठी हानिकारक असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले. यासाठी मानवाला आपल्या जीवनशैलीत तातडीने आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. १९९१ च्या आर्थिक सुधारणा लागू झाल्यानंतरदेखील केवळ काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारांचेच नव्हे, तर भाजपाप्रणीत युती सरकारांचे व्यवहारदेखील कंत्राटे देऊन, म्हणजे खंडणी अगर लाच घेऊनच चालले आहेत. अंबानी-अडाणी व अन्य उद्योगसमूह रिअल इस्टेटवाले (?) यांना यूपीए असो की, वाजपेयी व मोदींचे एनडीए पाहिजे ती संसाधने मिळवण्यास अगर जनहित व पर्यावरणीय कायदे धाब्यावर बसविण्यास काही अडचण नाही. पैसा फेको, लूट करो, स्वीस बँक या चाहे जहाँ रखो, विकासाच्या गोंडस नावाने हा सर्व व्यापारी उद्योग बरकतीत चालू आहे. ‘भारत माता की जय! अच्छे दिन, सब का विकास, गांधी-सरदार पटेल-आंबेडकर के सपनों का भारत! मन की बात : नये भारत का निर्माण - १२५ करोड भारतवासीयों के लिए !’ या केवळ घोषणाच.पर्याय : या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? सर्वप्रथम विकास म्हणजे काय, कुणाचा व कशाचा विकास, ही बाब नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. विकासाची मुख्य कसोटी समता व सातत्य असावी. प्रामुख्याने विकास निसर्ग - स्नेही लोकाभिमुख, स्त्रीकेंद्री असावयास हवा. येथे हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की, भारतीय संविधानाचे अधिष्ठान समता आहे. मात्र, आपल्या देशात दररोज विषमता वाढत आहे. वरच्या एक टक्का श्रीमंतांकडे तळाच्या ५० टक्के जनतेपेक्षा अधिक संपत्ती व उत्पन्न आहे, तर ४७ टक्के बालके कुपोषित, ३० टक्के भारतीयांना दारिद्र्य व अभावग्रस्त जीवन जगावे लागते. सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर आत्महत्त्या करण्याची नौबत आली. शरमेची बाब म्हणजे त्यातील सर्वाधिक महाराष्ट्रातील शेतकरी आहेत. भारताच्या व महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता फुल्यांना अभिप्रेत असलेली जैवशेती उत्पादन पद्धती, सार्वत्रिक शिक्षणपद्धती, शूद्र, अतिशूद्रांचे शोषण थांबवणारी अर्थव्यवस्था, श्रमप्रतिष्ठेला अव्वल स्थान देणारी समाजरचना ही आज काळाची गरज आहे. नेमकी हीच बाब गांधींनी पुरस्कृत केली. त्यांनी सांगितले की, ‘ऐच्छिक गरिबी, सादगी व स्वावलंबन हाच अर्थरचनेचा पाया असावा.’ बाबासाहेबांनी दलितांच्या उत्थानासाठी शिक्षणाला गुरुकिल्ली मानले. अर्थात ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा त्यांचा मूलमंत्र आपण विसरलो. खरे तर बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून ऐहिक व आध्यात्मिक जीवन सुधारण्यासाठी मध्यम मार्ग निवडला. बौद्ध धम्माचा गाभा भोगविलासाचा अव्हेर करून ‘तृष्णाक्षय’ करणे हा आहे. हवामान बदलाचे वास्तव लक्षात घेता २१ व्या शतकात शाश्वत विकासप्रणालीला अनन्यसाधारण स्थान आहे. प्रज्ञा, करुणा व शील या त्रयींद्वारे माणूस भोगवादाच्या गर्तेतून मुक्त होऊ शकतो. शाश्वत विकास हा आज परवलीचा शब्द असून, जागतिक तपमानवाढीच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी बुद्धप्रणीत मध्यम विकास मार्ग ही आज भारत व जगाची गरज आहे. येथे संविधानात प्रतिपादन केलेले समतेचे तत्त्व आणि बौद्ध धम्म स्वीकारून पुरस्कृत केलेली अहिंसक जीवनशैली व शाश्वत विकासप्रणाली हे बाबासाहेबांचे भारतालाच नव्हे, तर साऱ्या जगाला मौलिक योगदान आहे. धम्मदीक्षा घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांना यासाठी वेळ मिळाला नाही, ही खेदाची बाब होय.सारांशरूपाने असे म्हणता येईल की, बुद्ध, फुले, गांधी व आंबेडकर विचारांच्या अनुयायांनी आपापले संकुचित स्वार्थ व हितसंबंध जपण्यासाठी या महापुरुषांना एकमेकांच्या विरुद्ध उभे केले. विभूतिपूजा अथवा मूर्तिभंजनाचा खटाटोप चालू ठेवला. या गर्तेतून बाहेर पडून या चारही क्रांतिकारी महामानवांच्या शिकवणुकीचे सार लक्षात घेऊन समतावादी चिरस्थायी विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. अनुयायी मंडळींनी महापुरुषांना सवंगपणे डोक्यावर घेण्याऐवजी गांभीर्याने डोक्यात घेणे गरजेचे आहे. जयंती-पुण्यतिथीला त्यांचा जयघोष करून, पुष्पांजली अर्पण करणे पुरेसे नाही, तर त्यांच्या विचारावर इमानदारीने अंमल करणे हाच प्रबुद्ध मार्ग आहे. बाबासाहेबांना तीच सच्ची आदरांजली होय.(लेखक नामवंत अर्थतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य आहेत.)