मुंबई व पुणे येथे गेल्या काही दिवसांत भरावाला थोपविण्यासाठी बांधलेल्या संरक्षक भिंती पडल्या. १५ ते २५ फूट उंच भिंतीच्या आडोशाला वास्तव्यास असलेला बांधकाम मजूर आणि गरीब कुटुंबांतील ५०-६० व्यक्तींना मृत्यूने गाठले. पावसाची संततधार असल्याने बचावाची पुरेशी संधीदेखील मिळाली नाही.
सीमा भिंती प्लॉटच्या सपाट जमिनीवरील सीमा निश्चित करतात, तर संरक्षक भिंती भरावाला आधार देण्यासाठी बांधतात. बऱ्याचदा त्या सीमा भिंतीच्या रेषेवरच असतात. त्यामुळे त्यांना सीमा वा कम्पाउंड भिंती असे म्हणतात. या भिंती आपण समजतो, त्या कम्पाउंड भिंतीपेक्षा वेगळ्या असतात. त्या केवळ कम्पाउंड भिंती असत नाहीत, तर उंच-सखल जमिनीला समतल करताना जमिनीच्या भरावाला आधार देण्याचे काम करत असतात. पूर्वी शहरातील वस्ती छोट्या आकाराच्या प्लॉटवरील इमारतीत असायची. बदलत्या काळात एक-दोन एकर क्षेत्राच्या पुढील प्लॉटमध्ये स्वीमिंग पूल, क्लब हाउस, प्रशस्त पार्किंग, बागा यासारख्या सुविधांसह निवासी संकुले निर्माण होऊ लागली. मग टेकड्यांच्या अशास्त्रीय सपाटीकरणाने मोठा वेग घेतला आणि संरक्षक भिंतीच्या गरजेनेही.
जेथे दुर्घटना घडल्या आहेत, ती सर्व नव्याने विकसित झालेली संकुले आहेत किंवा देखभाल नसल्याने जीर्ण अवस्थेत असणारी सरकारी मालकीची बांधकामे आहेत. विकासकांनी पूर्वीच्या नैसर्गिक भौगोलिक रचनेत केलेले बदल, त्यासाठी शास्त्रीय कसोट्यावर घेतल्या जाणाºया दक्षता याकडे अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले असावे. अशा संकुलांच्या निर्मितीत सहभागी असणारे सर्वच जबाबदार घटक यांचे इमारत, तिचे अंतर्बाह्य रूप, आकर्षक प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वीजपुरवठा याकडे जेवढे काळजीपूर्वक लक्ष पुरविले जाते, तेवढे लक्ष मातीकाम, संरक्षक भिंती याकडे दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्या प्रत्यक्ष दृश्यस्वरूपात दिसत नसल्या, तरी या सर्व इमारतींच्या सभोवतालचा भराव आपल्यापरीने तोलून धरत असतात. भरावामध्ये बºयाचदा भरलेली माती, मुरूम, दगड, बांधकामातील राडा-रोडा हे वेगवेगळ्या प्रमाणात उपलब्धतेनुसार भरले जाते. त्यांचे भरणे निगराणी ठेवून योग्य साधनाने व्हावे लागते, अन्यथा भरावातील पोकळी अपेक्षित प्रमाणापेक्षा जास्त राहते.
पावसाळ्यात मोठ्या पावसानंतर पावसाचे सर्वच पाणी वाहून जाऊ शकत नाही. काही प्रमाणात ते जमिनीत मुरते. असे मुरलेले पाणी पूर्वीच्या नैसर्गिक भौगोलिक रचनेनुसार वाहून, जेथे संरक्षक भिंती असतात, तेथे येऊन तटते. या पाण्याचा निचरा व्हावा, म्हणून संरक्षक भिंतीमध्ये अश्रू छिद्रे द्यावी लागतात. पावसाळ्यात भरावातील पाण्याचा बाहेर निचरा करणे हे त्यांचे काम पूर्ण क्षमतेने व्हावे लागते. नाहीतर भरावातील पाणी तेथील विविध घटकांत पसरते, मुरते आणि केवळ वरची जमीनच त्यामुळे प्रभावित होत नाही, तर संरक्षक भिंतीवरील भार एकदम वाढतो व त्याचेच पर्यवसान संरक्षक भिंती कोसळण्यात होते.
संरक्षक भिंतींचे डिझाइन करण्यासाठी भारतीय मानकशास्त्रातील तरतुदीनुसार त्याचा आराखडा केला जातो. अशा प्रकारच्या संरक्षक भिंती केवळ शहरातील संकुलांपुरत्या मर्यादित नसून, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमार्ग, कालवे, घाटातील दरडींसाठीच्या भिंती, समुद्रकिनारी रस्ते, औद्योगिक प्रकल्प अशा विविध प्रकल्पांत वापरल्या जातात. सार्वजनिक ठिकाणी होणाºया वापरासाठी त्या अतिसुरक्षित पद्धतीने डिझाइन कराव्या लागतात. त्या भूकंपरोधक असायला हव्यात. पारंपरिक पद्धतीत शक्यतो अशा मोठ्या आकाराच्या, उंचीच्या संरक्षक भिंती फारच कमी प्रमाणात असायच्या. त्यामुळे त्यांच्या डिझाइननुसार आलेली जोखीम व खर्च दोन्ही कमी असायचे, परंतु अलीकडच्या १५-२० वर्षांत अशा प्रकारे भराव केलेल्या प्लॉटला सहजपणे १०-२० फूट उंचीच्या संरक्षक भिंतींची गरज भासू लागली. उंचीबरोबर जोखीम वाढली आणि वास्तवदर्शी डिझाइन असल्यास खर्चही. मग अशा संरक्षक भिंतींचे महत्त्व दुय्यम समजून तेथे तडजोडी व्हायला लागल्या. भिंतीजवळील झाडे, त्यांना दिले जाणारे पाणी, पावसाळ्यात होणारा मुसळधार पाऊस, यामुळे आधीच कमकुवत पद्धतीने भरलेले मातीकाम यांचा मोठा दाब भिंतीवर आल्यानंतर, त्या अतिरिक्त दाबामुळे संरक्षक भिंती विरुद्ध दिशेला अचानक कोसळून पडतात.
भराव केलेल्या प्लॉटच्या आसपासचे प्लॉट खालील पातळीवर असल्यास, त्या प्लॉटच्या विकसनाच्या वेळी संरक्षक भिंतीच्या पायाला खेटून खोदकाम होणे, धोक्याचे असते. पारंपरिक दगडी भिंती, आरसीसी भिंती, गॅबियन वॉल्स, पुलांसाठी आकर्षक वापर केलेल्या भिंती हे सध्या संरक्षक भिंतीसाठी उपलब्ध असणारे पर्याय आहेत. या सर्वच भिंतीच्या पायाची रुंदी जास्त असावी लागते. मात्र, याविषयी अनेक कारणांमुळे तडजोड केली जाते, या संरक्षक भिंती पुरेशा सुरक्षित असणे गरजेचे असते. नाहीतर काही काळानंतर दाब सहन न झाल्यामुळे अशा भिंती अचानक कोसळतात. गेल्या वीस वर्षांमध्ये भारतातदेखील पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय संशोधनातील त्रुटींवर अत्यंत सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून महाराष्ट्रात शासकीय व खासगी क्षेत्रात याचा वापर करून अशा संरक्षक भिंती यशस्वीरीत्या बांधल्या आहेत. अगदी ६५-७० फूट उंचीच्या संरक्षक भिंती गेल्या १२-१३ वर्षांपासून सक्षमपणे अगदी अडचणीच्या परिस्थितीत उभ्या आहेत.प्रताप देशमुख,बांधकाम क्षेत्राचे अभ्यासक.