- अजिंक्य गुठे(मुक्त पत्रकार)लोकसभा निवडणुकीच्या (भाजपसाठी धक्कादायक) निकालानंतर झालेल्या एनडीए खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले, पवन कल्याण हा फक्त पवन नाही तर आंधी आहे! अनेक वर्षं ‘पॉवर स्टार’ म्हणून सिनेमाचा रंगीत पडदा गाजवल्यानंतर पवन कल्याण आता आपली राजकीय ‘पॉवर’ पण तेवढ्याच ताकदीनं दाखवतोय. या निवडणुकीत देशात ज्या मोजक्या राजकीय पक्षांनी आपला १०० टक्के स्ट्राइक रेट राखलाय त्यात पवन कल्याणचा नंबर पहिला आहे. आंध्र प्रदेशमधून २ पैकी २ लोकसभा आणि स्वतःसह २१ पैकी २१ विधानसभा मतदारसंघांत त्यानं आपले उमेदवार विजयी केलेत... आणि आता त्याने चंद्राबाबू नायडू यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथही घेतलीय.२०१९ ला मात्र पवन कल्याण सपशेल आपटला होता. विधानसभा निवडणुकीत त्याच्या जनसेना पक्षाच्या सव्वाशेपेक्षा जास्त उमेदवारांपैकी फक्त १ आमदार निवडून आला. स्वतः पवन कल्याण दोन मतदारसंघांतून पराभूत झाला होता. वायएसआरच्या जगनमोहन रेड्डीनं एकहाती सत्ता मिळवली. पण या पराभवानंतरही त्यानं आपलं काम सुरू ठेवलं, पक्ष संघटना वाढवली. राज्यभर दौरे केले. साऊथच्या परंपरेप्रमाणे व्हॅन तयार करून घेतली. २०२४ च्या निवडणुकीआधी अचूक टायमिंग साधत तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि भाजपसोबत युती केली, स्वतःचा आणि या युतीच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
त्याला त्याचे चाहते PSPK म्हणतात.. पॉवर स्टार पवन कल्याण! चंद्राबाबूंचा टीडीपी आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या युतीचा किस्साही असाच रंजक आहे. आंध्र सरकारनं माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास विभागात घोटाळा प्रकरणात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अटक केली. त्यावेळी पवन कल्याण आपले हजारो समर्थक आणि शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह चंद्राबाबू यांना तुरुंगात भेटण्यासाठी निघाला. रात्रीच्या वेळी भर पावसात एकामागे एक असलेल्या शेकडो गाड्या वेगानं धावत होत्या. आंध्र सरकारच्या पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर तो रस्त्यावरच झोपला. चांगलाच राडा झाला होता. या सगळ्या प्रसंगाचे व्हिडीओ, फोटो आणि रील्स आंध्रमध्ये तुफान व्हायरल आहेत. पुढे काही दिवसांनंतर पवन कल्याण चंद्राबाबू नायडू यांना तुरुंगात भेटला. लगेच तुरुंगाच्या बाहेरच पत्रकारांसमोर जनसेना आणि टीडीपीच्या युतीची घोषणा केली. त्यानंतरचे निकाल आपल्यासमोर आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा प्रमुख नेता तब्बल २ महिने तुरुंगात असल्याने टीडीपीचं केडर नैराश्यात गेलं होतं. एकहाती सत्ता असणाऱ्या वायएसआरपुढे आता टीडीपीचा निभाव लागणार नाही हे चित्र पुढे पवन कल्याणनं मोठ्या खुबीनं बदललं. राज्यभर फिरून त्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. जातीय समीकरणंही चपखल बसली. लोकसभेत टीडीपी आणि जनसेनेच्या मिळून १८ जागा निवडून आल्या. आज किंगमेकर म्हणून देशात चंद्राबाबू नायडू यांचं नाव घेतलं जात असलं तरी चंद्राबाबू तुरुंगात असताना त्यांच्या राजकारणाला नवसंजीवनी देण्यामागे पवन कल्याण आहे. त्याचं मीडिया मॅनेजमेंट जबरदस्त आहे. स्वतः अभिनेता असल्यानं त्याला कॅमेऱ्याची भाषा बरोबर समजते. टायमिंग आणि ऑप्टिक्सचा खेळही तो अचूक खेळतो. वायएसआर काँग्रेस आणि जगनमोहन रेड्डी यांनी केलेल्या चुका व्यवस्थित हायलाइट करत राहणं आणि त्याविरोधात रस्त्यावर उतरून रान पेटवणं हे एखाद्या कसलेल्या राजकारण्यासारखं पवन कल्याणनं केलं.
आजघडीला देशातील कुठल्याच प्रादेशिक पक्षाचे सोशल मीडिया हँडल्स जनसेनाएवढे व्हायब्रंट नसावेत. दक्षिणेकडच्या राजकारणात मसीहा, सुलतान, रॉबिनहूड टाइप व्यक्तिमत्त्व चालतात. पवन कल्याणनं स्वतःची हीच इमेज तयार केली. सिनेमात व्हिलनशी लढणारा, लोकांना गुंड प्रवृत्तींपासून वाचवणारा रील हिरो पवन कल्याणनं जनतेला रिअलमध्ये दाखवला. त्याच्या सभांना होणारी गर्दी, पक्षाच्या जनता दरबारात रडणाऱ्या महिला, तरुणांचा गोतावळा, फुलांची उधळण अंगावर घेत लोकांना अभिवादन करणारा पवन कल्याण आणि कधी रथाच्या, तर कधी गाडीच्या टपावर बसून उभारून केलेली आक्रमक भाषणं ही त्याच्या राजकारणाची शैली बनली. स्टाइल, ॲटिट्यूड, ॲपिअरन्स आणि प्रेझेंटेशन असं सगळं पवन कल्याणच्या कॅम्पेनमध्ये दिसतं. साऊथच्या सिनेमात राजकारण आहे आणि राजकारणातही सिनेमा आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत साऊथनं आणखी एका अभिनेत्याला यशस्वी राजकारणी बनवलंय. या पॉवर स्टारनं पुढच्या काही वर्षांत देशाच्या राजकारणात आपली पॉवर दाखवली तर आश्चर्य वाटायला नको. rg.ajinkya88@gmail.com