- सुधीर महाजन
पैठणला गावातल्या नाथांच्या मंदिराकडे जाताना गल्लीच्या तोंडाशी कोपऱ्यावर असलेला ओटा कुच्चर ओटा म्हणून ओळखला जातो. आता पडझड झाली असली तरी त्याला गेल्या काही शतकांचा इतिहास आहे. म्हणजे संत एकनाथांच्या काळात धर्ममार्तंड म्हणवून घेणाऱ्या मुखंडांचा हा अड्डा होता आणि गंगेवर म्हणजे गोदावरीवर स्नानासाठी जाणाऱ्या नाथांवर हे मुखंड चिखल फेकत, दगड आणि टोमणेही मारत. म्हणजे हे गावभरच्या निंदानालस्तीचे ठिकाण होते, तर नेमकी आज या कुच्चर ओट्याची ओळख १४ नोव्हेंबरच्या निमित्ताने झाली. पं. जवाहरलाल नेहरूंचा हा जन्मदिवस ‘बालदिन’, तर नेहरूंची निंदानालस्ती करणारे असे ‘कुच्चर ओटे’ सध्या समाजमाध्यमांवर हजारोंच्या संख्येने तयार झालेले आहेत. या ओट्यांवर आवडीने चघळले जाणारे दोनच विषय प्रामुख्याने दिसतात. एक तर नेहरू आणि एडविना माऊंट बॅटन यांचे संबंध आणि दुसरा विषय १९६२ मध्ये चीनसोबत युद्धात झालेला भारताचा पराभव.
नेहरू आणि एडविना यांच्यात मैत्री होती, हे स्पष्टच आहे; पण त्याविषयाची चर्चा भारताबाहेरही होती. ख्यातनाम लेखक पत्रकार खुशवंतसिंग यांच्या आत्मचरित्रातही एक प्रसंग सांगितला आहे. स्वातंत्र्यानंतर ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयामध्ये खुशवंतसिंग प्रसिद्धी विभागाचे प्रमुख होते. नेहरू एकदा ब्रिटन दौऱ्यावर आले. त्यावेळी सगळ्या भेटीगाठी आवरून ते एडविनाच्या घरी मध्यरात्री पोहोचले, तर सकाळी सगळ्या प्रमुख वृत्रपत्रांच्या पहिल्या पानावर नेहरूंचे एडविनाच्या दारासमोरचे छायाचित्र झळकलेले होते. नेहरू आणि एडविना यांची मैत्री हा त्यांच्या खाजगी आयुष्याचा भाग होता, हे आपण विसरतो.
चीनचा प्रश्न हा एक आणखी महत्त्वाचा मुद्दा. नेहरूंनी चीनवर अनाठाई विश्वास ठेवला आणि त्यांचा अंदाज चुकला; परंतु नेहरू ज्यादृष्टीने भारत- चीन संबंधांकडे पाहत होते, ते फलद्रूप झाले असते, तर आशिया हा जगातील महासत्ता बनला असता. चीनसह पूर्वेकडील देश आणि भारत यांच्या संबंधांकडे नेहरू हे शेकडो वर्षांच्या साहचर्यातून पाहत होते. १९६२ पूर्वी कधीही भारत- चीन यांच्यात संघर्ष झालेला नव्हता. शांततामय शेजारी असाच चीन होता. या दोन्ही देशांमध्ये शतकानुशतके व्यापारी संबंध होते. बौद्ध धर्म हा एक समान दुवा होता आणि या भावनिक नात्याने पूर्वेकडील चीनसह कंबोडिया, म्यानमार, कोरिया, जपान, व्हिएतनाम हे भारताशी जोडलेले होते. शिवाय या सगळ्याच देशांनी वसाहतवादाचा जुलूम सहन केलेला होता. हे सगळे देश एकापाठोपाठ स्वतंत्र झाले होते. इतिहासाचे संदर्भ लक्षात घेऊन या साधर्म्याच्या आधारावर पूर्व आशिया एक महासत्ता या नजरेने नेहरू परराष्ट्र संबंधांकडे पाहत होते. चीनमध्ये चॅग कै शेक सत्तेवर असेपर्यंत भारत- चीन संबंध एका सुदृढ वळणावर पोहोचलेले होते.
जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर ब्रिटन, रशिया यांच्या बाजूने अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली. त्यावेळी भारताने आणि पर्यायाने काँग्रेसने दोस्त राष्ट्रांना पाठिंबा देऊन भारताने युद्धात मदत करावी, अशी अमेरिकेची इच्छा होती; परंतु युद्धानंतर भारतात लोकशाहीवादी सरकार स्थापन करण्याची ब्रिटनची हमी नेहरूंना अमेरिकेकडून पाहिजे होती. प्रारंभी, अमेरिकेने आशा दाखवली. किंबहुना भारतासह सर्व वसाहतवादी देशांना स्वातंत्र्य देण्यात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे नेहरूंना वाटत होते; परंतु अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या जाहीरनाम्यात त्याचा साधा उल्लेखही नव्हता. भारत- अमेरिका संबंधातील दुरावा येथूनच स्पष्ट झाला म्हणून पूर्व आशियाचा महासंघ बनवून एक जागतिक शक्ती म्हणून भारतासह या सर्व देशांनी पुढे आले पाहिजे, हा सिद्धांत त्यांनी मांडला. चीनच्या आक्रमणानंतर नेहरूंचा भ्रमनिरास झाला. नेत्याचा एखादा निर्णय चुकतो; पण त्याचे विश्लेषण त्याच काळातील परिमाणांना समोर ठेवून केले पाहिजे; पण आजच्या परिमाणावर ते निर्णय तपासले जातात. स्वातंत्र्यानंतर विभाजनामुळे उद्भवलेल्या धार्मिक उन्मादाच्या काळातील लाटेवर स्वार होऊन हिंदुत्ववादी भारत निर्माण करणे नेहरूंना सोपे होते; पण त्यांनी प्रवाहाविरुद्ध जात धर्मनिरपेक्ष लोकशाही बळकट करण्यास प्राधान्य दिले आणि तशी सक्षम लोकशाही अस्तित्वात आणली. याचा आज दुर्दैवाने विसर पडला आहे. नेहरूंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला खुजे करण्यासाठी हे आभासी कुच्चर ओटे तयार झाले; पण नेहरू उत्तुंगच आहेत.