कलाक्षेत्राशी संबंधित दोन व्यक्तींचा याच्याशी संबंध आहे. यातील एक व्यक्ती आरोप करणारी तर दुसरी चक्क आरोपीत आहे. पण दोहोत मूलभूत फरक म्हणजे पहिल्या व्यक्तीने वास्तव जाणून न घेताच सरकारवर आरोप केल्याचे सकृतदर्शनी जाणवत असल्याने तिचा हा खटाटोप आत्म प्रसिद्धीसाठी होता का असा संशय घ्यायला जागा आहे. त्याचवेळी जी व्यक्ती आरोपीत आहे तिच्यावर आरोप करणाऱ्यांनी आपल्या मर्दुमकीची प्रसिद्धी करण्यासाठी तिच्या प्रसिद्धीचा वापर करण्याचा उपद्व्याप केल्याचे मानण्यास पुरेपूर वाव आहे. न-नाट्य किंवा समांतर नाट्य चळवळीतले एक दादा नाव म्हणजे अमोल पालेकर. त्यांनी राज्याच्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अलीकडेच धाव घेतली होती. कोणत्याही कलाप्रदर्शक प्रयोगाची संहिता मंडळाला सादर करण्याचा नियम अत्यंत जाचक तसेच व्यक्तीस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा गळा घोेटणारा आहे त्यामुळे तो रद्द व्हावा अशी त्यांची न्यायालयाकडे याचना होती. त्यावर न्यायालयाने सरकारला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस कायद्यातील संबंधित कलमाच्या आधीन जो नियम लागू केला होता तो गेल्या मार्च महिन्यातच सरकारने रद्द केल्याचे न्यायालयाला पुराव्यांसहित सांगण्यात आले. याचा अर्थ ज्या मुद्यावर पालेकर भांडू इच्छित होते तो मुद्दाच गैरलागू असल्याचे दिसून आले. आता यावर वादी म्हणजे पालेकर यांचे कथन न्यायालय ऐकून घेणार आहे. पण प्रश्न तो नाही. कलेच्या आणि उपयोजित कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या पालेकरांनी आपण कोणत्या मुद्यावर भांडतो आहोत तो मुद्दा लागू की गैरलागू याचा विचार न करता याचिका दाखल केली असेल तर त्यांचा हा उद्योग आत्म प्रसिद्धीसाठी नव्हता असे कसे म्हणता येईल? याच्या नेमकी उलट परिस्थिती सुश्मिता सेन या हिन्दी चित्रपटातील अभिनेत्रीची. मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सध्या म्हणे एका विशेष शोध मोहिमेवर आहे. मोहीम आहे, डेंग्युच्या डासांची उत्पत्ती करणाऱ्या केन्द्रांचा शोध घेऊन त्यांचा बीमोड करण्याची. त्यांच्या या मोहिमेत सुश्मिता सेनच्या खार उपनगरातील घराच्या गच्चीत व सज्ज्यात म्हणे अशी तीन केन्द्रे त्यांना आढळून आली. लगेच तिला तंबी देणारी नोटीस जारी केली आणि माध्यमांकडे बातमीही पोचती झाली. सुश्मिता सेन अभिनेत्री आहे म्हणून तिला सारे गुन्हे माफ अशी भूमिका महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने घेतली नाही याबद्दल तिचे कौतुकच. पण तिला नोटीस जारी करणारी यंत्रणा जेव्हां दक्षिण मुंबईत पोहोचली तेव्हां वेगळेच घडले. वानखेडे स्टेडियमच्या नाकासमोर असलेल्या यशोधन नावाच्या ज्या सरकारी इमारतीत मंत्रालयातील बव्हंशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा निवास आहे, तिथे या यंत्रणेला एकूण सात केन्द्रांचा शोध लागला पण कोणालाही नोटीस जारी न करता यंत्रणा गेल्या पावली मागे फिरली.
केवळ प्रसिद्धीसाठी?
By admin | Published: September 29, 2016 4:16 AM