विजय दर्डा
मुझे न तन चाहिए, न धन चाहिए। बस अमन से भरा यह वतन चाहिए।
जब तक जिंदा रहूं, इस मातृभूमि के लिए। और जब मरूं तो तिरंगा कफन चाहिए।
देशासाठी प्राणांची आहुती देण्यास सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक भारतीय जवानाच्या हृदयातील हुंकार या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेला प्रत्येक सुपुत्र हा भारताचा अमूल्य ठेवा आहे. देशाच्या अशा सुपुत्रांना भ्याड दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य येते तेव्हा देशवासीयांचे रक्त खवळून उठणे स्वाभाविक आहे.
काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांची भारतमातेच्या चरणी प्राणाहुती पडली तेव्हा तमाम भारतीयांप्रमाणेच माझ्याही मनात भावनांचा कल्लोळ उठला. माझे हृदय पिळवटून गेले, राग उफाळून आला आणि शत्रूचा बदला घेण्याची तीव्र भावना मनात दाटून आली. एवढ्या मोठ्या संख्येने जवानांच्या मृत्यूचे अतीव दु:ख होते, सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांविषयी चीड होती व आपल्या बहाद्दर शिपायांच्या हौतात्म्यानंतरही पाकिस्तानात बसलेल्या दहशवादाच्या पोशिंद्यांना आपण जन्माची अद्दल घडवू शकत नाही, याची मनात क्लेषदायी चुटपूटही होती. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे कायमचे उद््ध्वस्त करावेत, अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची पुलवामा हल्ल्यानंतर मनोमन इच्छा आहे.
माझ्या मनात वारंवार असे येते की, ९/११च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत पुन्हा घुसण्याची दहशतवाद्यांची हिंमत झाली नाही, १९७२ च्या म्युनिक आॅलिम्पिकवरील हल्ल्यानंतर हे दहशतवादी पुन्हा इस्रायलकडे नजर वर करून पाहण्याचे धाडस करू शकत नाहीत, रशियात दहशतवादी हल्ल्यांची संख्या पाच वर्षांत १४४ वरून ३०पर्यंत कमी होऊ शकते तर मग भारत का बरं एवढा अगतिक असावा. सन १९८८ पासून जानेवारी २०१८ पर्यंत दहशतवाद्यांनी भारतात घुसून ४७,२३४ हल्ले केले आहेत. आपल्या लोकशाहीचे सर्वोच्च व सर्वात पवित्र प्रतीक असलेली संसद व आपली अस्मिता असलेला लाल किल्लाही या दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. एवढे होऊनही आपण सीमेपलीकडून चालणारा हा दहशतवाद नेस्तनाबूत करू शकलो नाही की या विषारी सर्पाला दूध पाजणाºया पाकिस्तानची नांगी ठेचू शकलो नाही. १९७२ च्या म्युनिक आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये ‘ब्लॅक सप्टेंबर’ नावाच्या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या ११ खेळाडूंची हत्या केली तेव्हा हा छोटासा देश गप्प बसला नाही. या हल्ल्यामागील एकेका दहशतवाद्याला इस्रायलने जगाच्या कानाकोपºयातून हुडकून ठार केले. इस्रायलने लेबेनॉनमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांचाही खात्मा केला. १९७६ मध्ये दहशतवाद्यांनी इस्रायलच्या एका विमानाचे अपहरण करून ते युगांडाला नेले तेव्हा युगांडात घुसून इस्रायलने सर्व अपहरणकर्त्यांना ठार करून १०२ प्रवाशांची सुखरूप मुक्तता केली होती.अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनलाही पाकिस्तानने आश्रय दिला होता. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनचा काटा काढला. रशियाने चेचेन्यामध्ये जाऊन चेचेन बंडखोरांना यमसदनास धाडले. आपल्या शेजारच्या श्रीलंकेनेही घट्ट पाळेमुळे रोवलेल्या ‘लिट्टे’सारखी बंडखोर संघटना नामशेष केली. दहशतवादाच्या बाबतीत आपणही गौरवास्पद कामगिरी केलेली आहे. १९९० च्या दशकात पंजाबमधील खलिस्तानवाद्यांच्या दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यात पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने मोठे यश मिळविले होते. तेव्हा नरसिंह राव सरकारने काश्मीरमध्ये होणाºया सीमापार दहशतवादासही नियंत्रित केले होते. त्यामुळेच ठप्प झालेली लोकशाही प्रक्रिया काश्मीरमध्ये पुन्हा सुरू होऊ शकली होती.
दहशतवाद चिरडून टाकण्यात शाश्वत यश का मिळत नाही, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. एक तर आपल्या गुप्तहेर यंत्रणेत काही उणिवा आहेत किंवा दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात आपण कमी पडत असू. आपल्याला याचे तंत्र आणि कौशल्य इस्रायल आणि अमेरिका यासारख्या देशांकडून शिकावे लागेल. मी आणखी एक गोष्ट सांगेन. दहशतवाद ही एक राष्ट्रीय समस्या असल्याने तिच्याकडे राजकारणाच्या नजरेतून पाहता कामा नये. पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधी पक्ष एकजुटीने सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी लखनऊमध्ये ठरलेली पत्रकार परिषद रद्द करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा एक चांगला पायंडा पाडला. संवेदनशील असे राष्ट्रीय विषय सर्व संमतीनेच हाताळले जायला हवेत.तसेच देशातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्वच माध्यमांनी यासारख्या नाजूक वेळी संयम पाळण्याची गरज आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. सीआरपीएफ, एसआरपी, बीएसएफ, आयटीबीपी यासारख्या निमलष्करी दलांमधील देशासाठी प्राणाहुती देणाºया जवानांना लष्कराप्रमाणे हुतात्म्याचा दर्जा मिळायला हवा.चले गए जो हंसते-हंसते बांध अपने सर पे कफन। उन शहीदों के बलिदान को मेरा शत्-शत् नमन।( लेखक लोकमत समुहात एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आहेत )