यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अपघातमुक्तीकडे पाऊल टाकत महाराष्ट्राच्या प्रगतीचा प्रशस्तमहामार्ग ठरावा...पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रगतीचा दिशादर्शक म्हणून महाराष्ट्राचे भूषण आहे. पुणे आणि मुंबईच्या विकासाच्या वाटचालीत त्याचे ॅॅविशेष महत्त्व आहे. सांस्कृतिक राजधानी पुणे आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडण्यासाठी उभारण्यात आलेला हा मार्ग उद्या १८ वर्षे पूर्ण करीत आहे. भारतातील सर्वात पहिला नियंंत्रित प्रवेश अशी या महामार्गाची ओळख आहे. ब्रिटिशांच्या काळात बांधल्या गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर सातत्याने वाहतुकीत वाढ होत गेली. त्याचा अंदाज घेत १९९० साली केंद्र सरकारच्या राईट्स व ब्रिटिश कंपनी स्कोंट विल्सन समूह या कंपन्यांनी या मार्गाची पाहणी व अभ्यास केला. पुणे-मुंबई प्रवास अडीच तासांत हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले. सध्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तत्कालीन सार्वजनिक वाहतूक मंत्री होते. त्यांनी या महामार्गाच्या उभारणीचे शिवधनुष्य पेलले. त्यांच्या कल्पकतेतून उभारणीचा आराखडा तयार झाला. १९९७ साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर उभारणीची जबाबदारी सोपविली गेली. ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पथकर आकारून बांधकाम खर्च वसूल करण्याचा निर्णय घेतला गेला. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक, सिग्नल नसलेल्या या मार्गाद्वारे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख देशवासीयांना झाली. देशातील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी हा एक मार्ग आहे. २००९ साली या द्रुतगती महामार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले गेले. या मार्गामुळे मुंबई-पुणे हा १४८ किलोमीटर लांबीचा प्रवास सहा तासांवरून दोन-अडीच तासांवर आला आहे. बहुतांश खासगी वाहने, एस.टी. बसेस तसेच मालवाहू वाहने या रस्त्याचा वापर करतात. नवी मुंबई शहराच्या कळंबोलीपाशी हा रस्ता सुरु होतो. पुण्यातील देहूरस्ता येथे राष्ट्रीय महामार्गाला येऊन मिळतो. सुमारे ९४.५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील बोरघाटामधून जातो. गेल्या १८ वर्षांमध्ये येथील समस्या मात्र कमी झाल्या नाहीत, उलट वाढत चालल्या आहेत. १७०० हून अधिक अपघात, ५००हून अधिक बळी १८ वर्षांमध्ये या रस्त्याने अनुभवले आहेत. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, विहंग नायक अशा कलावंतांसोबतच अनेक निष्पाप जीव मृत्युमुखी पडले आहेत. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळणे, चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण करणे या मुख्य हेतूने महामार्ग बांधण्यात आला होता. मात्र, हे हेतू साध्य झाले नसल्याचे दिसून येत आहे. वाहने लेन शिस्त पाळत नाहीत. दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे, अनियंत्रित वेगामुळे अपघात वाढले आहेत. शिस्त आणि वाहनांचा मर्यादित वेग याविषयी जागृती करण्यात एमएसआरडीसी, परिवहन मंत्री तसेच संबंधित पोलीस यंत्रणेला अपयश आलेले आहे. पुरेसे उड्डाणपूलच नसल्याने लोकांनी कंपाऊंड तोडून महामार्ग ओलांडण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर एमआरडीसीने समांतर रस्ता व उड्डाणपूल बांधले. लोकांबरोबरच जनावरेही येण्याचे न थांबल्याने अपघाताचा धोका कायम आहे. जुना मार्ग आणि द्रुतगती मार्ग दोन्ही रस्ते येथे एकत्र आल्याने वाहनांची संख्या वाढते. अनेकदा अपघात घडून वाहतूक ठप्प होते. द्रुतगती मार्गावरील टोल हे सुद्धा एक गौडबंगालच आहे. टोलची मुदत २०१९ पर्यंत आहे. तो कमीतकमी असेल असे सांगितले जात होते. ज्या उद्देशाने हा द्रुतगती मार्ग बांधण्यात आला, त्यालाच तडा गेला आहे. यामागील नेमके सत्य ‘पारदर्शक’पणे सामोरे यावे अशी प्रवाशांची मागणी आहे. प्रवासाचा कोणताही थकवा न जाणवता इच्छितस्थळी जातानाची मजा काही औरच असते. पण वेगामुळे होणारे अपघात, दरडी कोसळणे, लेनची शिस्त न पाळणारे अतिउत्साही प्रवासी आदी विविध कारणांमुळे हा महामार्ग असुरक्षित व धोकादायक ठरला आहे. देशातील पहिला महामार्ग अशी इतिहासात नोंद असलेला हा एकमेव द्रुतगती मार्ग अपघातमुक्त हमरस्ता म्हणून ओळखला जावा. महाराष्ट्राच्या प्रगतीचा महामार्ग ही त्याची ओळख बनावी. - विजय बाविस्कर
पुणे-मुंबई महामार्ग अपघातमुक्त व्हावा
By admin | Published: June 29, 2017 12:53 AM