- अभय नरहर जोशीआनंदी पुणे..आनंदपुणे!
ओहो. ‘पुणे राज्यात सर्वात आनंदी’ ही बातमी वाचून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचि अंग आनंदाचे...’ अशी भावना दाटून आली. अखेर बाटगे असलो तरी आम्ही पुणेकरच. प्रस्तुत सदर लेखकाचे सोबतचे छायाचित्र पाहावे. पुणेरी पगडीतील आनंदी पुणेकराचे हे प्रातिनिधिक चित्रच नव्हे काय ? त्या आनंदात आम्ही जन्मापासून अस्सल पुणेकर असलेल्या आमच्या मित्राला बंडू बोलभटला भेटावयास गेलो. त्यावेळी झालेला हा सुखसंवाद...
आम्ही : बंड्या, लेका बातमी वाचलीस का, पुणे राज्यातलं सर्वात आनंदी शहर ठरलंय.
बंडू बोलभट : (चेहऱ्यावरील रेषाही न हलवता) हं वाचलीय.
आम्ही : मग तुला आनंद नाही का झाला ?
बं. बो. : आनंदी व्हायला आधी दुःखी असावं लागतं. एक पुणेकर म्हणून मी दुःखी कधी नसतोच.
आम्ही : बंड्या, तुझ्या तिरकस बोलण्यानं, टोमण्यांनी दुसरे दुःखी होतात, त्याचं काय ?
बं. बो. : तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्याशी बोलायला मी कुणालाही निमंत्रण द्यायला जात नाही.
आम्ही : अरे, पुण्याला आनंदी शहराचा मान मिळालाय, यावर तुझं काही मत असेलच ना पुणेकर म्हणून.
बं. बो. : पुणेकर म्हणून मला प्रत्येक विषयावर मत असण्याचा अन् ते व्यक्त करण्याचा जन्मजात हक्क आहेच. पुणे हे आनंदी शहर असल्याचं प्रमाणपत्र बाहेरच्या मंडळींनी आम्हाला देऊ नये. आनंदी पुणे या शब्दातच द्विरुक्ती आहे. एक तर आनंदी म्हणा नाही तर पुणे म्हणा. पुणे हा आनंदाचा समानार्थी शब्द आहे. त्यामुळेच तर या पुण्यात माणसंच काय, गवे-हरणंही स्थलांतरीत होऊ लागलेत. काही दिवसांनी अनेक पुणेकर बिबटेही पाळतील व त्यांच्या गळ्यात पट्टे बांधून रस्त्याने फिरायला जाताना दिसतील.
आम्ही : (बंड्याच्या या उद्गारांनी खचून जात) अरे बाबा कधी तरी सरळ बोल की.
बं. बो. : अरे सरळच बोलतोय. आमच्यात असंच बोलतात. ते तुम्हाला वाकडं वाटतं. दोष तुमच्या आकलनाचा आहे. पाणी येवो अथवा न येवो, कितीही ट्रॅफिक जॅम असो, मेट्रो होवो अथवा न होवो, उड्डाणपूल उभारून पाडण्याचा खेळ होवो, गणपती पाहायला आल्यानंतर इथेच राहून पुणेकर होणारे कितीही येवोत, बाकरवडी कितीही महाग करो तरी आम्ही आमची आनंदी वृत्ती सोडली नाही बरं. तरीही देशात आम्ही बारावे ? आम्ही पहिलेच असणार. रॅंकिंग चुकलंय.
आम्ही : खरंय बाबा तुझं.
बं. बो. : त्यावर मी एक बालकवींची माफी मागून एक रचना केलीय. खालील रचनेत मोद म्हणजे मोदच वाचावे. नामसाधर्म्यामुळे घोटाळा नको. मोद म्हणजे आनंद. पुणेकर नसलेल्यांसाठी हा खुलासा. पुणेकर तर जन्मतःच जाणते असतात म्हणूनच आनंदी असतात. ऐक.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे || धृ.||
कसबा-खडकाळीत मोद भरे, शनिवारात मोद फिरे, सदाशिवात भरला, नारायणात फिरला, कोथरूडात उरला, मोद पुण्यनगरीत चोहीकडे || १ ||
गवे कसे सोनेरी हे, सोसायटीत हरणे हसती आहे, झेड ब्रिजावर खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे, भाऊ रंगले, दादा दंगले, मुठेकाठी गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहीकडे || २ ||
दारावर पाटी असे, तरी डोकावुनि कुणी पाहतसे, मग आनंदे अपमानित होतसे चितळे मिठाईस ना म्हणणाऱ्याला, मोद भेटला का त्याला ? बाकरवडीत अन् आंबाबर्फीत मोेद वसतो, सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहीकडे || ३ ||
वाहतूक वाहे मंदगती, डचमळती दुचाकी पथोपथी, हाॅर्न सदैव कूजित रे, कोणावरी गातात बरे ? पालिकेत ‘कमल’ विकसले, आनंदी आनंद इकडे, तिकडे, चोहीकडे || ४ ||
या विश्वांगणात पुणेकरांच्या नावे, किती पामरे रडतात, पुणेकरा मोद कसा मिळतो ?चित्ती ठेवोनि समाधान पुणेकरांतील द्वेष संपला, मत्सर गेला,आनंदी आनंद उरला इकडे, तिकडे, चोहीकडे || ५ ||
(लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.