विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई -
जगभरात जेव्हा कोरोनाचा कहर टिपेला होता, त्याच वेळी म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात रशियाच्या सायबेरिया या सुदूर प्रांतातील टोम्स्क ते मॉस्को या हवाईमार्गावर असलेल्या एका विमानात मोठे नाट्य घडत होते. रशियाचे सर्वशक्तिमान अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे कट्टर विरोधक ४४ वर्षीय अलेक्झी नवाल्नी आपला टोम्स्क येथील छोटेखानी दौरा आटोपून मॉस्कोला परतत असताना विमानातच त्यांना त्रास जाणवू लागला. अवघ्या काही क्षणांतच नवाल्नी यांची प्रकृती बिघडू लागली. वाटेतील ओम्स्क या ठिकाणी विमान तातडीने उतरविण्यात आले. तेथून नवाल्नी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते, परंतु उपचारांदरम्यान नवाल्नी कोमात गेले. नवाल्नी यांना पुढील उपचारांसाठी तातडीने जर्मनीला नेण्याचा निर्णय त्यांच्या कर्मचारी वृंदाने घेतला. सर्व औपचारिकता पूर्ण करून ओम्स्क येथून एका विशेष रुग्णवाहू विमानाने नवाल्नी यांना बर्लिनमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तज्ज्ञांनी शर्थीचे प्रयत्न करून नवाल्नी यांना अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले आणि पुतिन यांचा आपल्या आणखी एका विरोधकाला संपविण्याचा कुटिल डाव सपशेल अपयशी ठरला. नवाल्नी यांच्यावर नोविचोक या प्राणघातक विषाचा प्रयोग झाल्याचे जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या यंत्रणांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. अगदी गेल्याच महिन्यात नवाल्नी यांनी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याच्या कटात सहभागी असलेल्या रशियन गुप्तचर विभागाच्या पोलिसाला ‘बोलते’ करत, या सर्व घटनेमागे पुतिन हेच ‘प्रेरणा’स्थान होते, हे ‘वदवून’ घेतले. त्यासाठी नवाल्नी यांनी कोणता प्रयोग केला, त्यात त्यांना कोणाची साथ मिळाली, नोविचोक म्हणजे काय वगैरे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. अलेक्झी नवाल्नी यांनी ‘भांडाफोड’ केलेल्या प्रकरणाचा रशियाचे सत्ताकेंद्र असलेल्या क्रेमलिनने, अर्थातच स्पष्ट शब्दांत इन्कार करून नवाल्नी हे युरोपीय गुप्तचर संस्थांच्या हातचे बाहुले बनले असल्याचा नेहमीचाच आरोप केला. क्रेमलिनने केलेला हा आरोप किती फुसका आहे, हे युरोपीय यंत्रणांनी तातडीने स्पष्ट केले. रशियाला गतवैभव–म्हणजे शीतयुद्धकालीन व त्याही आधीचे–प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पुतिन वारंवार सांगत असतात. त्यासाठी युरोपीय देशांना आणि विशेषतः अमेरिकेला मिळेल तिथे खिंडीत गाठून त्यांची पुरती बदनामी होईल, अशा अनेक कारवायांना क्रेमलिनमधून ‘अंजाम’ दिला जातो. मग त्यात पुतिन यांच्या राजवटीला कंटाळून रशियातून परागंदा झालेल्यांना संपविण्याच्या कटांचाही समावेश असतो. एवढे सारे होऊनही नवाल्नी यांनी गेल्याच आठवड्यात आपण मायदेशी मॉस्कोला परतत असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, रविवारी नवाल्नी यांना घेऊन आलेले विमान बर्लिन येथून मॉस्कोच्या दिशेने झेपावले. मॉस्कोच्या मुख्य विमानतळाबाहेर नवाल्नीसमर्थकांनी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. विमानतळाला पोलिसांचा गराडा पडला होता, अशा परिस्थितीत नवाल्नी यांना मुख्य विमानतळाऐवजी मॉस्कोनजीकच्या शेरेमेटायेवो या विमानतळावर उतरविण्याचे आदेश यंत्रणांना दिले गेले. त्यानुसार, अखेरच्या क्षणी विमान शेरेमेटायेवो येथे वळविण्यात आले. मायभूमीवर पाऊल ठेवताच नवाल्नी यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी नेण्यात आले. तत्पूर्वी नवाल्नी यांनी रशियात येऊच नये, यासाठी तपासयंत्रणांनी त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावले. “नवाल्नी यांनी राजकीय प्रचारासाठी मिळालेल्या निधीचा गैरवापर केला असून, त्यासाठी तुरुंग त्यांची वाट पाहात आहे,” येथपासून ते “नवाल्नींना रशियात परतताच अपूर्ण राहिलेली कैदेची शिक्षा पूर्ण करावी लागेल,” येथपर्यंत असंख्य आरोप करून, धमक्या घालून नवाल्नी यांनी रशियात परतण्याचा बेत रहित करावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु या सगळ्याला भीक न घालता नवाल्नी अखेरीस मायभूमीत परतलेच. वस्तुत: रशियात परतणे नवाल्नी यांच्यासाठी जोखमीचे ठरू शकते. याची पुरेपूर जाणीव खुद्द नवाल्नी आणि त्यांच्या असंख्य समर्थकांना आहे. तरीही ही जोखीम पत्करून नवाल्नी रशियात परतले आहेत. यंदाच्या वर्षी सप्टेंबरात रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या (स्टेट ड्युमा) निवडणुका होणार आहेत. त्यासाठी नवाल्नी यांना पुन्हा आपला राजकीय आखाडा स्थिरस्थावर करून घ्यायचा आहे. जर्मनीत राहून नवाल्नी यांना तसे करणे शक्य नव्हते. नवाल्नी यांना प्रत्यक्ष आखाड्यात उतरूनच प्रचार करावा लागणार आहे. म्हणूनच प्रचंड जोखीम असूनही नवाल्नी रशियात परतले आहेत. आपल्या विरोधकांना निर्दयपणे संपविण्याची पुतिन यांची खास शैली माहीत असूनही नवाल्नी यांनी ही जोखीम जाणीवपूर्वक पत्करली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नवाल्नी पुतिन यांच्या सत्तास्थानाला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. अध्यक्षपदाची निवडणूकही–त्यातला फोलपणा ठावुक असूनही त्यांनी लढवून पाहिली. पुतिन यांना सत्ताच्युत करण्याचा नवाल्नी यांचा संकल्प आहे. त्यासाठी त्यांनी रशियात जोरदार आघाडी उघडली असून, मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठिशी उभा राहू लागला आहे. त्यामुळेच हादरलेल्या पुतिन यांच्या राजवटीने नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग करून त्यांना संपविण्याचा प्रयत्न केला. आताही त्यांना मायदेशी परतताच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असले, तरी नवाल्नी यांच्या समर्थकांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. अशा परिस्थितीत नवाल्नी यांची रीतसर सुटका होते की, त्यांच्यावर अधिकाधिक आळ लावून त्यांना कारागृहातच खितपत पडण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते, हे येणारा काळच ठरवेल. नवाल्नी यांना तुरुंगात ठेवले, तरी अडचण आणि बाहेर सोडले, तरी अडचण अशा दोन्ही बाजूंनी पुतिन यांना नवाल्नी अडचणीचे ठरणार आहेत. पुतिन यांना जेरीस आणण्यात अलेक्झी नवाल्नी यांना यश येते किंवा कसे, हे नजीकच्या भविष्यात स्पष्ट होईलच, परंतु पुतिन यांची एकंदरच रासवट राजवट लक्षात घेता, नवाल्नी यांच्याबाबतीत काहीही घडू शकते, हे त्यांना आणि समर्थकांना पक्के ठावुक आहे.