महाराष्ट्रात गडचिरोलीचे नाव ऐकले नाही अशी व्यक्ती अभावानेच आढळेल. ज्या कारणासाठी गडचिरोलीची ओळख आहे ते कारण मात्र गडचिरोलीकर किंवा तमाम महाराष्ट्रालाही अभिमान वाटावा असे नाही. गेल्या चार दशकांपासून हा जिल्हा नक्षली हिंसाचाराने होरपळत आहे. शेकडो लोकांना हिंसाचाराला बळीही पडावे लागले. अशा वातावरणात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या संदेश वाचनातून येथे ३ मार्चला जागतिक विक्रम नोंदविण्याची तयारी सुरू आहे. पण केवळ हा विक्रम केल्याने येथे अहिंसा आणि शांतता प्रस्थापित होणार का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळेल. मग मोठा खर्च करून हा विश्वविक्रम करण्याची गरज काय? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे आज दिली नाही तरी चालेल, पण उद्या ती उत्तरे प्रत्यक्ष कृतीतूनच लोकांना मिळतील, याची दक्षता पोलिसांना घ्यावी लागणार आहे. आज नक्षलवाद आणि हिंसा हा गडचिरोलीवासीयांच्या दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग झाला आहे. कधी पोलिसांचा खबºया असल्याच्या संशयातून नक्षल्यांकडून असलेली जीवाची भीती तर कधी नक्षल समर्थक असल्याच्या संशयातून पोलीस पकडून नेण्याची भीती. गेल्या ३०-४० वर्षांपासून हेच सुरू आहे. अशाप्रकारे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करण्याच्या प्रकाराला आता लोकही कंटाळले आहेत. बाहेरचे जग पाहू लागलेल्या नवीन पिढीतील युवकांना प्रगती आणि विकास काय असते, हे कळू लागले आहे. त्यामुळेच नवीन पिढीसमोर नक्षलवाद जास्त दिवस तग धरण्याची शक्यता कमीच आहे, मात्र आदिवासींच्या या नवीन पिढीला प्रगतीच्या वाटेने पुढे नेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सामान्य नागरिकांना हिंसाचार नको आहे, यात दुमत नाही. पण हिंसाचार घडविणा-यांशी उघडपणे दोन हात करण्याची हिंमतही त्यांच्यात नाही. ती हिंमत त्यांना देण्यासोबतच अहिंसेचा पुरस्कार करण्याची त्यांच्या मनातील भावना जाहीरपणे प्रकट करण्याची एक संधी गडचिरोलीत होऊ घातलेल्या जागतिक विक्रमाच्या निमित्ताने लोकांना मिळणार आहे. हा विश्वविक्रम झाला म्हणजे आता जिल्ह्यातील हिंसाचार थांबेल आणि जिल्ह्यात शांतता निर्माण होईल, असे मुळीच नाही. पण तसे होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाईल, हे निश्चित. विश्वविक्रम करणारा एक आदिवासीबहुल जिल्हा अशीही गडचिरोलीची ओळख जागतिक स्तरावर जाईल. मात्र त्यानंतर या जिल्ह्यात खरोखरच हिंसाचार थांबून शांतता प्रस्थापित करण्याची पोलिसांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. तसे न झाल्यास ते पोलिसांचे अपयश ठरेल, यात शंका नाही.
विश्वविक्रमाला गवसणी घालताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:30 AM