- सुकृत करंदीकर, सहसंपादक, लोकमत, पुणेमाणसानं अवकाशात कितीही भराऱ्या घेतल्या तरी एका माणसाला दुसऱ्या माणसाबद्दलचं शारीरिक आकर्षण हे मूलभूत ‘ॲनिमल इन्स्टिंक्ट’ कायम आहे. स्त्रीचं सौंदर्य, पुरुषाचं देखणेपण, स्त्री शरीराची कमनीयता, पुरुषाचे पीळदार स्नायू, आवाज, रंग, रग, शक्ती, वेग यातल्या कशाचा तरी मोह प्रत्येकाला कधी ना कधी पडतो. शतकानुशतकांच्या मानवी इतिहासात नाव कोरलेल्या अगणित नायक-नायिकांची उदाहरणे पाहिली तर काय दिसतं? त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्त्व, कोणतं ना कोणतं शारीरिक असामान्यत्व या बाह्यगुणांचा परिणाम प्रचंड असतो. बौद्धिक क्षमता, नेतृत्व गुण, कर्तृत्व हे सगळं नंतर येतं. म्हणून तर मैदानातले रगेल, विजयासाठी झुंजणारे खेळाडू, पडद्यावरच्या रंगीबेरंगी दुनियेतले आकर्षक तारे, गायक, नर्तक, वादक हे तुलनेनं सहज लोकप्रिय पावतात. वर्ण, प्रांत, भाषा, देश अशा सगळ्या साखळ्या तोडून ही मंडळी जगभर पोहोचतात. एखादा रसायनशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, लेखक वगैरेंना ही सिद्धी-प्रसिद्धी तितक्या सहजतेनं मिळत नसते. कारण बहुसंख्य समाज ‘ॲनिमल इन्स्टिंक्ट’च्या अमलाखाली असतो. व्यापारानं, पैशानं जग एकमेकात गुंतत गेलं तसे लोकप्रियता, प्रसिद्धीचे निकष झपाट्यानं बदलले. एकेक व्यक्ती ही स्वत:च एक बडा ‘ब्रँड’ बनू लागली. तिच्या प्रत्येक हालचालीला, तिच्या सोबतच्या प्रत्येक मिनिटाला प्रचंड ‘किंमत’ आली आणि ती मोजण्यासाठी स्पर्धाही सुरू झाली. अलीकडच्या दीड-दोन दशकांत माध्यम बदललं आणि ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवरच्या एकेका ‘पोस्ट’साठी आता बोली लावली जाते. या सगळ्याचा पाया एकच - संबंधित व्यक्तीच्या प्रेमात आकंठ प्रेमात बुडालेले लाखो-करोडो चाहते. हेच जीवतोड प्रेमी ‘ब्रँड’ घडवतात, आकाशाएवढ्या उंचीवर नेतात.कोणी कशाचं ‘फॅन’ व्हावं याचं काही गणित नसतं. त्यासाठी काही असामान्यत्व जगापुढं गाजवावं लागतं. पायात चित्त्याची ताकद असणारा कॅरेबियन बेटांवरचा युसेन बोल्ट ९.५८ सेकंदात शंभर मीटर अंतर कापतो त्या क्षणी कोट्यवधी लोक त्याच्या वेगाचे वेडे होऊन जातात. बोल्ट काय खातो, बोल्ट काय पितो, पायात ‘शूज’ कोणते असतात, अंगात काय घालतो, तो ऐकतो काय, सुट्टी कुठं घालवतो, त्याच्याकडची ‘फोर व्हीलर’ कोणती, त्याची ‘गर्लफ्रेंड’ कोण, त्याच्या आयुष्यात चाललंय काय.. यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीशी त्याचे कोट्यवधी चाहते स्वत:ला जोडून घेतात. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यापेक्षाही आपल्या ‘हीरो’च्या आयुष्यात डोकावण्यात ‘फॅन्स’ना जास्त रस असतो. असं घडतं तेव्हा युसेन बोल्ट हा फक्त धावपटू उरत नाही. तो ‘अल्टिमेट ब्रँड’ बनलेला असतो. त्याच माध्यमातून त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना आपलं ‘गिऱ्हाईक’ करून घेतलं जातं. जे बोल्टचं तेच रॉजर फेडरर, टायगर वुड्स, रोनाल्डो, मेस्सी, जोकोविच, विराट यांच्यासारख्या इतर अनेक ‘ब्रँड्स’चंही! केवळ व्यक्तीच नव्हे, तर बार्सिलोना, मॅन-यू, चेन्नई सुपर किंग, मुंबई इंडियन्स अशा संघांचेही ‘ब्रँड्स’ घडवले जातात. त्यांची लोकप्रियता ‘विकली’ जाते. सूर्य तळपतोय तोवर त्याच्या प्रकाशात न्हाऊन निघण्याची घाई असते. या ‘ब्रँड्स’ची कारकिर्द मावळतीला लागली की त्यांची ‘व्हॅल्यू’ही ओसरत जाते. नवे ‘स्टार’ पुढं येतात. - म्हणूनच ऑलिम्पिक पदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू कोर्टाची पायरी चढताना दिसते. तिच्या ऑलिम्पिक पदकाचे भांडवल करून काही कंपन्या तिच्या ‘ब्रँड’चा फुकट फायदा घेत असल्याचा तिचा आरोप आहे. सिंधूचं बॅडमिंटन करिअर आतापेक्षा उंचावण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी मिळालेल्या यशाचा पुरेपूर फायदा घेण्याचा तिचा प्रयत्न अगदीच रास्त म्हणावा लागेल. अन्यथा तिनं कष्टानं कमावलेल्या यशात, लोकप्रियतेच्या अंगणात कोणीही फुकट नाचून जाईल. आयुष्यभर ‘ब्रँड व्हॅल्यू’ टिकवून ठेवण्याची पुण्याई आणि (कसबही) अमिताभ, सुनील गावसकर, पेले अशा फार थोडक्यांकडेच असतं.
पी. व्ही. सिंधू कोर्टाची पायरी चढते आहे, कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 5:23 AM