- रविप्रकाश कुलकर्णीआज सारा महाराष्ट्र पाण्याअभावी अक्षरश: तडफडतो आहे, पण त्याची जाण किती जणांना आहे? सध्या डोंबिवलीत मंगळवार, गुरुवार, शनिवार पाणी नसतं, तर इथं कोण अस्वस्थता आहे, पण सोलापूरसारख्या ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही. वाटीने पाणी भरायला लागतं, हे दु:ख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही का? का केवळ ही बातमी होते? आमची संवेदनशीलताच नष्ट व्हायला लागली आहे का?माझं जगणं आणि माझी परंपरा यांचं काही नातं राहिलं आहे काय, असा मला नेहमी प्रश्न पडतो. संत तुकाराम बीज, एकनाथ षष्ठी, गुढी पाडवा, रामनवमी या अशा गोष्टी आता कॅलेंडरवर दिलेल्या असतात, म्हणून तर माझ्यापुढे येतात, असंही कधी-कधी मला वाटायला लागतं. अलीकडच्या ज्ञात्यांनी पंचांग कॅलेंडरमध्ये जिरवून टाकलं आणि पंचांगाचं स्वतंत्र अस्तित्व कमी-कमी होत गेलं असेल काय? माझा गोंधळ कधी संपेल असं वाटत नाही, पण ही टोचणी काही ना काही निमित्ताने जागी होते, हे मात्र खरंच... घुमान येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन झालं. त्यामुळे एक झालं, आमचे नामदेव महाराज पंजाबात जाऊन स्थायिक झाले होते. याची आठवण पुन्हा जागी झाली. या निमित्ताने महाराष्ट्र-पंजाब पुन्हा एकदा जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली. अर्थात, त्यामागे संजय नहार आणि त्यांची सरहद्द संस्था यांची योजकता नि:संशय होती. यात शंकाच नाही. त्याचंच पुढचे पाऊल म्हणजे, आता या शब्दात घुमान येथे सर्वभाषा संमेलन होत आहे. या अशा उपक्रमातून ‘भारत जोडो’ उपक्रमास गती येईल, असे वाटते. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ या सगळ्यांच्या कारकिर्दीकडे पाहिलं की, आता असं वाटायला लागतं की, मध्ये इतकी वर्षे गेली, पण परिस्थितीत कितीसा फरक पडला?काळ बदलला तरी परिस्थिती जैसे थे, असं म्हणावं काय? हा विचार मनात आला, त्यातही कारण घडलं. एकनाथ षष्ठी आणि रामनवमी! एकनाथांनी भर बारा वाजता गाढवाला पाणी पाजलं, ही गोष्ट सुस्पष्ट आहे.आज परिस्थिती काय आहे?गाढवांची परंपरा तर चालूच आहे, त्यात आता माणसांची भर पडली आहे!पण एकनाथांची शिकवण-कार्य ते कुठे आहे? तेव्हा पाण्याचा प्रश्न गाढवापुरताच होता. आता तो सर्वव्यापी झालेला आहे. याचं हवं तेवढं भान तरी आपल्याला कुठे आहे? आज सारा महाराष्ट्र पाण्याअभावी अक्षरश: तडफडतो आहे, पण त्याची जाण किती जणांना आहे?पाणी आणि संवेदनशीलता याचं उदाहरण आठवतं ते पण सांगून टाकतो-वर्धा येथे महात्मा गांधींचा मुक्काम होता. ऐन उन्हाळ्याचे दिवस. महात्माजींना भेटायला ठिकठिकाणाहून लोकं येत होती. त्यांना भेटण्याअगोदर दारातच ठेवलेल्या माठातून मंडळी पाणी पिऊन मग आत येत होती. मध्येच गांधीजी बाहेर येऊन थांबले. एका-दोघा पाणी पिणाऱ्यांना थांबवत ते म्हणाले, ‘तुम्ही काय करताय?’ ‘पाणी पितोय.’ ‘पाणी ना तुम्ही घोटभर पित आहात. उरलेलं अर्ध पाणी फेकून देता आहात.’ ‘हे पाणी कोस-दीड कोसावरून उन्हा-तान्हात आपल्या मायभगिनी इथे आणतात. ते काय असं फेकून देण्यासाठी?’घोट-घोट पाण्याची चिंता गांधीजींना तेव्हा होती, परंतु पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. हे कशाचं लक्षण?आता सभा-संमेलनात व्यासपीठावर तांब्या- भांडे जाऊन त्या जागी बाटल्या आल्या, हे आता तुम्ही आम्ही पाहतो. फोटो घेताना या बाटल्यांचा अडसर होतो, म्हणून मग त्या बाटल्या आडव्या ठेवायला लागतात, पण या बाटल्यांतले पूर्ण पाणी प्यायले जाते का? सगळ्या बाटल्या मात्र उघड्या झालेल्या असतात. या अर्धवट बाटल्यांतल्या पाण्याचे काय होते? वाया जाते! ही गोष्ट मी संबंधीतांच्या लक्षात आणून दिली. विशेष म्हणजे, त्या जलसतर्कता चर्चेत महात्मा गांधींनी घोटभर पाण्याची चिंता कधी वाहिली होती, याची कथा सांगून झाली होती!पण बाटलीतल्या शिल्लक पाण्याकडे लक्ष वेधल्यानंतर प्रतिक्रिया काय आली असेल?‘तुम्ही काय स्वत:ला गांधीजी समजता?’‘आपण गांधी थोडेच आहोत?’‘एवढं थोडं-थोडं पाणी आतापर्यंत साठवलं असतं, तर पाण्याचा प्रश्न केव्हाच सुटला असता...’आणखीही अशा प्रतिक्रिया झाल्या.पण पाणी वाचवलं पाहिजे, याकडे कुणीच देत नव्हते. फक्त प्रश्नाला फाटे फोडण्यातच सगळी शक्ती खर्च करून गुंता वाढला.प्रश्न जैसे थे!हे पण पुन्हा आठवायचं कारण नाथांच्या पैठणचा रांजण! नाथांचा रांजण भरण्यासाठी सगळे गावकरी यथाशक्ती नदीतून कावड भरभरून ओतत राहतात, पण रांजण भरत नाही. शेवटी श्रीखंडाची एक कावड त्या रांजणात पडताच, रांजणातून पाणी उसळून बाहेर पडतं. हे उसळेलं पाणी कसे बाहेर येतं, हा चमत्कार काय, याचं कोडं सुटलेलं नाही.पण मला कोडं पडलेलं आहे की, आज श्रीखंड्या आसपास असूनही, कावड भरून रांजणात टाकणारे लोक आहेत काय? अशी जाणीव झाली, तरी आजची पाण्याची समस्या सुटेल. फक्त ही समस्या आहे, एवढी संवेदनशीलता ठेवली, तरी प्रश्न सुटू शकेल.
प्रश्न संवेदनशीलतेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2016 3:51 AM