घाटकोपर येथील ‘साईदर्शन’ इमारत पडण्यास व १७ निष्पाप नागरिकांचे बळी घेण्यास कारणीभूत असलेला सुनील शितप हा एकेकाळी हारफुले विकण्याचा किरकोळ व्यवसाय करीत होता. तेथून त्याने कोट्यधीश होण्यापर्यंत कशी मजल मारली, याच्या सुरस व भयचकित करणाºया कहाण्या आता कानांवर येत आहेत. मात्र, अशा पद्धतीने कायदा धाब्यावर बसवून माफिया मार्गाने गडगंज संपत्ती कमावणारा शितप हा एकटा नाही. शहरीकरणाचा परीसस्पर्श झालेल्या व आता स्मार्ट होण्याची स्वप्ने पाहणाºया अनेक छोट्यामोठ्या शहरांमधील गल्लोगल्ली असे शितप उदयाला आले आहेत. किंबहुना, राजकारणातील यशाचा हा एक ‘शितप पॅटर्न’ गेल्या काही वर्षांत उदयाला आला आहे. घाटकोपरला झोपडपट्टीत वास्तव्य करणाºया शितपचे एकेकाळी दोनवेळा जेवणाखाण्याचे वांधे होते. सुरुवातीला कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याकरिता त्याने हारफुले विकली, घरोघरी पेपर टाकले. त्यानंतर, त्याला ‘राजकारण’ नावाचा जादूचा दिवा सापडला. कार्यकर्ता म्हणून मिरवणाºया शितपने अल्पावधीत केबल व्यवसायात हातपाय पसरले. केबलमाफिया म्हणून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर भूमाफियाची पदवी पदरात पाडून घेतली की, राजकारणातील पत आपोआप वाढते. शितपने घाटकोपर परिसरात भूमाफिया म्हणून आपली ओळख निर्माण केल्यावर आपसूक त्याची दहशत निर्माण झाली. महापालिकांवर सत्ता मिळविण्याकरिता जेव्हा शिवसेना-भाजपा या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये कमालीची स्पर्धा लागते, तेव्हा बख्खळ पैसा खर्च करून निवडून येणारे शितपसारखे उमेदवार सर्वच पक्षांना लागतात. त्यामुळे शितपची पत्नी आशा हिला महापालिकेची उमेदवारी देताना सुनीलची पत व दहशत पाहूनच तिला शिवसेनेने उमेदवारी दिली, हे उघड आहे. राज्यातील प्रस्थापित नेत्यांना आव्हान देण्याकरिता शिवसेना उभी राहिली व तिने भाजीविक्रेते, डोअरकिपर, रिक्षावाले अशा अनेक बिनचेहºयांच्या मंडळींना राजकारणात ओळख प्राप्त करून दिली. ही मंडळी राजकारणात यशस्वी झाली आणि त्यांनी पैसाअडका जमवला. मात्र, गेल्या काही वर्षांत शिवसेनेतील सामान्य मध्यमवर्गीय शिवसैनिक पार लोप पावला असून शितपसारखे इन्स्टंट श्रीमंत माफिया मोठे झाले आहेत. ही परिस्थिती जशी शिवसेनेत आहे, तशीच ती भाजपात वाढत आहे. मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने अनेक शितप त्या पक्षाच्या वळचणीला आले होते. आता ते भाजपाकडे धाव घेत आहेत.
राजकारणातील ‘शितप पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:50 AM