- चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार
रविवारी मेलबर्नच्या टेनिस कोर्टवर पाच तास ५० मिनिटे झुंजून तो जिंकला तेव्हा स्टेडियममध्ये हजर असलेला प्रत्येकजण उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला मानवंदना देत होता. पण तो दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहरा झाकून गुडघ्यांवर बसला होता... त्याच्यासाठी हा सर्वोच्च भावनिक क्षण होता. हा नुसता विजय नव्हता, तर अखेरच्या क्षणापर्यंत असं काही संपत नसतं, हा संदेश त्यात दडलेला होता. गेल्यावर्षीच्या अखेरीपर्यंत ‘आता तो संपला’, असं टेनिस जगतातील पंडितांना वाटत होतं. पण जिंकण्याची उर्मी काय असते, हे पस्तिशीतल्या नदालनं उभ्या जगाला दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या जेतेपदाचा पाच सेट चाललेला हा सामना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं, त्यापेक्षाही, नदालच्या कहाणीचा गाभा पुन्हा एकवार अधोरेखित झाला.
मैदानात उतरणाऱ्या प्रत्येकालाच जिंकण्याची उर्मी असते. अद्वितीय ठरणारे त्याच्या चार पावलं पुढे असतात. एक उंची गाठल्यानंतर गवई मैफिली जिंकायच्या म्हणून साधना करीत नाही. नेमकं हेच अद्वितीय खेळाडूंच्या बाबतीत घडतं. ते स्वतःलाच स्वतःसाठी नवनवे मापदंड निर्माण करतात. अत्युच्च शारीरिक क्षमतांच्या पलीकडे जाऊन अवघड आव्हानांना सामोरे जातात. हे जेव्हा घडतं तेव्हा अशा खेळाडूंच्या तोडीचे प्रतिस्पर्धी अक्षरश: इन मीन तीन राहतात. नदालच्याबाबतीत हेच तर घडलं.
तसं पाहिलं तर टेनिसमधल्या एव्हरेस्टवर पोहोचण्यासाठी फेडरर, जोकोविच आणि नदाल यांच्यात कमालीची चुरस होती. गेल्या वीस वर्षांत झालेल्या ८० ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ६० जेतेपदं या त्रिकुटामध्ये समसमान वाटली गेली. वीस जेतेपदं हेच आजवरचं पादाक्रांत झालेलं सर्वोच्च शिखर होतं. त्याच्या आणखी वर कोण जाणार, यासाठीची जागतिक चढाओढ विलक्षण उत्कंठावर्धक होती. एक एव्हरेस्ट आणि तीन दावेदार. त्यातले फेडरर आणि नदाल हे गेल्यावर्षी गुडघेदुखीनं जायबंदी झालेले. आता काय आपण कुबड्या घेऊन कोर्टवर उतरायचं का, असा विनोद फेडरर आणि नदाल यांच्या मैत्रीपूर्ण संभाषणात सहज येऊ लागला होता. नदाल तर गेल्यावर्षी दोन मोठ्या स्पर्धांना मुकला. फेडरर सध्या प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे. राहता राहिला जोकोविच. तोच विक्रमादित्य ठरणार, अशी अटकळ होती; पण लस विरोधापायी जोकोविचला कोर्टवर न उतरताच ऑस्ट्रेलियातून बाहेर पडावं लागलं.
नदाल अंतिम सामन्यात पोहोचला तेव्हा त्याच्या पुढ्यात उभा असलेला रशियाचा मेदवेदेव दहा वर्षांनी तरुण. पहिले दोन सेट हरल्यावर नदालला त्याची लय सापडली आणि एका अद्वितीय खेळाडूचं कसब आणि विजिगिषु वृत्ती यांच्यातील अद्वैत साकारलं. परिस्थितीने कितीही मोठं प्रतिकूलतेचं दान फेकलं, तरी अखेरच्या क्षणापर्यंत काहीही संपत नसतं, हेच नदालच्या या ताज्या विक्रमी कामगिरीतून अधोरेखित झालं.
काळाच्या ओघात टेनिस हाही पॉवर गेम बनला आहे. पण दुखापतीमधून निर्माण होणाऱ्या आव्हानांवर केवळ पैशाने मात करता येत नाही. फेडरर, नदाल, जोकोविच किंवा सॅम्प्रस यांच्यासारखे चार मिनार अमाप पैसा, प्रसिद्धी आणि जिंकणं-हरणं याच्याही पलीकडे गेलेले असतात. तेही अब्जावधी कमावतात, पण ते सगळं परिघावरचं. गाभ्यात असते, ती मनःपूत खेळण्याची जिद्द! म्हणून तर उदंड पैसा, कीर्ती कमावल्यानंतरही दुखरे गुडघे आणि हळवं मन घेऊन नदाल कोर्टवर पुन्हा उतरला.
ग्रँड स्लॅम जेतेपद एकवीसवेळा मिळवणारा नदाल हा केवळ क्ले कोर्टचा म्हणजे लाल मातीतला बादशाह असल्याची टीका झालीच होती. ती पचवून तो लढत राहिला. स्पेनमधल्या एका छोट्या शहरातून आला हा नदाल. श्रीमंत घरातही गुणवत्ता जन्मते आणि बहरते, याचा वस्तुपाठ म्हणजे नदालची कहाणी. शाळकरी वयात ब्राझीलचा रोनाल्डो हा याचा हिरो. त्या वयात याला फुटबॉल आणि टेनिस दोन्हीत सारखाच रस होता. एकाची निवड करायची वेळ आल्यावर यानं फुटबॉलला लाथ मारली आणि गेली १८ वर्षे टेनिसच्या कोर्टवर अधिराज्य गाजवलं. एखादं शिखर प्रयत्नांती सर करता येऊ शकतं, पण तिथेच मुक्काम ठोकणं कशाला म्हणतात हे समजून घ्यायचं असेल, तर एका माणसाचं आयुष्य पाहावं : राफेल नदाल! ( chanduk33@gmail.com)