- राजा माने
नऊ वर्षांचा उपक्रम चळवळ तर बनलाच पण आता माढ्यातील लोक डॉ.रागिनी पारेख यांना आपली कन्या तर पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना आपल्या गावचा पुत्रच मानतात...‘अरं बाबा, महारोगानं माझा एक हात अन् एक पाय छिनला... डोळं निकामी व्हाय लागलं म्हणून एका डोळ्याचं आपरेशन केलं तर डोळाच गेला ! मी कशी जगू? येका डोळ्याला तुझा फक्त हात लाव... तुझ्या हातात देव हाय... मग काय व्हायचं ते होऊ दे माझं...!’ पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंच्या पुढ्यातच काकुळतीला येऊन महारोगग्रस्त महिला आपल्या भावनांना वाट करून देते... तात्यारावही लगेचच ‘तू काळजी करू नको माय’ असं म्हणत तिच्यावर उपचाराला सुरुवात करतात. डोळ्यावर शस्त्रक्रियाही करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी तीच महिला तात्यारावांसमोरच शस्त्रक्रिया केलेल्या डोळ्यावरचं बॅण्डेज उतरवते अन् म्हणते, ‘बाबा सगळ्ळं सगळ्ळं दिसतंय...’ तिचा आनंद डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिनी पारेख यांच्या चेहऱ्यावरही ओसंडून वाहू लागतो... सोलापूर जिल्ह्यातील माढा गावातील असे चित्र गेल्या नऊ वर्षांपासून दरवर्षी अनुभवायला मिळते.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आपल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व माढेश्वरी सहकारी बँकेच्या वतीने २००८ साली डॉ. लहाने यांच्या मदतीने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास सुरुवात केली. आत्मीयता, सेवाभाव आणि सामाजिक बांधीलकी एखाद्या उपक्रमाचे रूपांतर एका सशक्त चळवळीत कसे करते, याचे प्रत्यंतर सोलापूर जिल्ह्याला आले. मोतीबिंदूपासून नेत्रहीनांना दृष्टी देणाऱ्या शस्त्रक्रियांनी असंख्य नेत्ररुग्णांच्या जीवनात आनंद फुलविला. आतापर्यंत १५ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली. डॉ. लहाने व डॉ. पारेख यांनी गेल्या नऊ वर्षांत या शिबिरातील रुग्णांवर माढ्यात तब्बल तीन हजार १३९ तर दीड हजार शस्त्रक्रिया मुंबईत केल्या. मागच्या आठवड्यात झालेल्या शिबिरात त्या दोघांनी ४९३ शस्त्रक्रिया करून नवा उच्चांक प्रस्थापित केला. माढ्यातील डॉ. लहाने व डॉ. पारेख यांच्या नेतृत्वाखालील ही चळवळ आता गतीने ग्रामीण भागात विकसित होत आहे. आ. बबनराव शिंदे व माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत तसेच सन्मती नर्सिंग होमचे संस्थापक डॉ. रमण दोशी, एस. एम. मोरे, एम. एन. दुड्डम या मंडळींबरोबरच माढ्यातील सर्वसामान्य माणूस लहानेंच्या शिबिराला आपल्या स्वत:च्या घरचा उपक्रम ठरविण्यासाठी धडपडताना दिसतो. डॉ. तात्याराव व डॉ. रागिनी यांचे अनोखे नाते या गावाशी जोडले गेल्याचे अनुभवास येते. शिबिराच्या कालावधीतील तीन दिवस तेथील विविध स्तरांतील लोक आपला मुलगा आणि आपली मुलगी गावी आल्याच्या आविर्भावात त्यांचे आदरातिथ्य करण्यात गुंतलेले दिसतात. डॉ. लहाने आपल्या घरी यावेत यासाठी झोपडीतला माणूसही त्यांना आग्रहाचे आवताण देतो आणि लहानेही तेवढ्याच प्रेमाने त्याचा स्वीकार करून त्या घरी पोहोचतात! यापूर्वी झालेल्या शिबिरामुळे दृष्टी प्राप्त झालेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक शिबीर कालावधीत केवळ तात्यारावांना पाहायला म्हणून तेथे येतात. त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवितात आणि निघून जातात. गर्दी केलेले रुग्णही लहानेंनी आपल्याला फक्त स्पर्श करावा, अशा प्रकारची श्रद्धा व्यक्त करतात. सलग १८ तास शस्त्रक्रियांचे काम करण्याची ऊर्जा लहाने-रागिनींना माढेकरांशी निर्माण झालेले नातेच देते, अशी त्यांची भावना आहे. कुटुंबातला माणूस ज्या पद्धतीने डोळ्याची काळजी घेण्यासंदर्भात आपल्या माणसाला बजावतो अगदी त्याच पद्धतीने आणि त्यांच्याच भाषेत प्रत्येकाला बजावण्याचे काम लहाने सतत करताना दिसतात. याच आपलेपणातून दरवर्षी केवळ शिबिरापुरते न ठेवता कायमस्वरूपी जिव्हाळा जतन करण्याच्या स्वभावामुळे आता अनाहुतपणे माढ्यातले लोक डॉ. रागिनी पारेख आमची कन्या तर डॉ. तात्याराव लहाने हे आमच्या गावचेच पुत्र असल्याचे कौतुकाने सांगतात.- राजा माने