भारतीय संस्कृतीमध्ये त्याग, परिश्रम आणि न्यायाप्रति विशेष आपुलकी आहे. महात्मा गांधी यांनी याच मूल्यांचा वापर करीत तमाम सर्वसामान्य भारतीयांना स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडून घेतले होते. एखाद्या देशाची किंवा प्रदेशाची बहुसंख्य जनता सार्वजनिक कार्यासाठी एकत्र येण्याचा विक्रम करणारा तो संग्राम होता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही पदयात्रा करणाऱ्या सामान्य माणसापासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनाच जनतेची सहानुभूती मिळत असते. स्वातंत्र्यानंतरही अशा देशव्यापी पदयात्रांचा इतिहास मोठा आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रा काढली होती. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी पंजाबमधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर युवकांना जागृत करण्यासाठी पदयात्रा केली होती.
शेतकरी, कष्टकरी आदींच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजवर असंख्य पदयात्रा झाल्या आहेत. भारतीय मानसिकतेचा हाच धागा पकडून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी साडेसहा हजार किलोमीटरची यात्रा मणिपुरातील थौबल जिल्ह्यातून सुरू केली आहे. गतवर्षी त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतची ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. तेव्हाच त्यांनी ‘पूर्व ते पश्चिम यात्रा’ करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. भारत जोडो यात्रेत अनेक प्रदेशांतील विविध स्तरातील तरुण, शेतकरी, कर्मचारी, शेतमजूर, महिला आदींनी भाग घेऊन विविध प्रश्नांची चर्चा घडवून आणली. भारत जोडो यात्रेचे वैशिष्ट्य हे, की विविध क्षेत्रात अभ्यास करणारे विचारवंत, कलाकार, अभ्यासक, संशोधकदेखील या यात्रेत भाग घेऊन सामान्य माणूस देशाप्रति काय विचार करतो आहे, हे जाणून घेत होते. त्यापैकी अनेकांचा काँग्रेस पक्षाशी, सक्रिय राजकारणाशी संबंधही नव्हता.
भारत जोडो यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने काँग्रेसला मोठी मदत झाली. या मार्गावरील काही प्रदेशांतील निवडणुकाही काँग्रेसने जिंकल्या. राहुल गांधी यांनी आता ६७ दिवसांची १५ राज्यांतून जाणारी भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली आहे. भारतीय समाजमनातील विद्वेषाची भाषा संपवून एकमेकांशी जोडून घेण्यावर भारत जोडो यात्रेत भर दिला होता. आता या यात्रेच्या नावात ‘न्याय’ हा शब्द जोडला गेला आहे. ईशान्य भारतातील छोट्या छोट्या प्रदेशांसह आसाम, बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून ही यात्रा जाणार आहे. वेळेअभावी पदयात्रेऐवजी यात्रेकरू बसने प्रवास करणार आहेत. ही यात्रा २० मार्च रोजी मुंबईमध्ये येऊन समाप्त होईल.
मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि मुख्य यात्रेकरू राहुल गांधी यांनी वांशिक संघर्षाचा फटका बसलेल्या मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्दाचे वातावरण पुन्हा आणण्याचे आश्वासन दिले. त्याची गरजच होती. मणिपूरच्या हिंसाचाराविषयी मत-मतांतरे काहीही असोत, पण इतक्या संवेदनशील प्रदेशात इतका दीर्घकालीन वांशिक हिंसाचार होत राहणे देशाला शोभादायक नाही. या यात्रेच्या वाटेवरल्या अनेक प्रदेशांत सामाजिक पातळीवर फारसे चांगले वातावरण नाही, हे मान्य करावे लागेल. लोकसभेची अठरावी सार्वत्रिक निवडणूक तोंडावर असताना होणाऱ्या या यात्रेस राजकीय संदर्भही आहेत. कारण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला याच पूर्व ते पश्चिम भारतातून मोठे यश मिळते.
उत्तर विभागात देखील भाजप सर्वांत पुढे आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष या यात्रेत नेमकी काय भूमिका मांडतात, याला महत्त्व असेल. सुमारे अठ्ठावीस राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या ‘इंडिया आघाडी’ला मूर्त स्वरुप येत आहे. किमान ४०० लोकसभा मतदारसंघांत भाजप विरुद्ध एकास एक उमेदवार निश्चित करण्यात या आघाडीला यश येईल, अशा बातम्या आहेत. तसे झाले तर ही येणारी सार्वत्रिक निवडणूक एकतर्फी होणार नाही. या निवडणुकीत विरोधक भाजपला चुरशीची टक्कर देऊ शकतील. जुनेजाणते आणि बुजुर्ग नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे इंडिया आघाडीचे अध्यक्षपदही दिले गेले आहे. त्यांचा अनुभव इंडिया आघाडीतल्या अंतर्गत मतभेदांना आवर घालून या आघाडीला एकसंध आकार देऊन जाईल असे दिसते.
या बदलत्या पार्श्वभूमीवर निघणारी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ कसे वातावरण निर्माण करते ते पाहणे महत्त्वाचे राहणार आहे. या यात्रेची मुख्य भिस्त राहुल गांधी यांच्यावर असली तरी यात्रेच्या वाटेवरील राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षही तगडे आहेत. त्यांच्या यशावरही इंडिया आघाडीचे भवितव्य निश्चित होणार आहे. या यात्रेचा शेवट होईपर्यंत देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असेल आणि मुख्य राजकीय घडामोडींना प्रारंभ होईल. त्या दृष्टीने या यात्रेचे यशापयश महत्त्वाचे ठरणार आहे.