>> संदीप प्रधान
काँग्रेस पक्षातील नेतृत्वाचा पेच सुटण्याची शक्यता दिसत नाही. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रकृतीच्या कारणास्तव जबाबदारी पार पाडणे अशक्य झाले आहे आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर अध्यक्षपदाची खाली ठेवलेली धुरा स्वीकारण्यास राहुल गांधी उत्सुक नाहीत. राहुल यांना अध्यक्षपदाचा मानमरातब हवा आहे. परंतु त्या पदासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या नको आहेत, असे अनेक काँग्रेसजन खासगीत बोलतात. गेल्या वर्षभरात काँग्रेसमध्ये झालेल्या अनेक निर्णयांवर छाप राहुल यांची असली तरी ते निर्णय सोनिया यांनी घेतल्याचे भासवले गेले. राहुल हे नेत्यांना भेटत नाहीत, चर्चा करून निर्णय घेत नाहीत, अशा तक्रारी वरचेवर कानावर येतात. ट्विट करून आपली भूमिका जाहीर करणे म्हणजे जबाबदारी पार पाडली, अशी त्यांची भावना आहे.
सोनिया गांधीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष; कार्यकारिणीचे शिक्कामोर्तब
राहुल यांच्या या तऱ्हेवाईक वर्तनाचा फटका मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे राज्यांत पक्षाला बसला. त्यामुळे काँग्रेसमधील २३ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी भावना व्यक्त केली. या पत्रावरुन पक्षात बरीच खळबळ माजली. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांची ट्विट व त्यावर खुलासा यामुळे चर्चेतून हद्दपार झालेली काँग्रेस पुन्हा काही काळ चर्चेत आली. दिवसभराच्या चर्चेनंतर संघटनात्मक बदलांचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना सोपवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ‘काँग्रेस हे कुटुंब आहे व त्यामुळे मतभेद व मतभिन्नता विसरून १३० कोटी जनतेची लढाई लढायची आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी यापूर्वी व आताही मनाला ठेच पोहोचवणारे शब्दप्रयोग केले असले तरी ते किल्मिष मनात न ठेवता एकदिलाने काम करण्यावर मतैक्य झाले आहे. अ.भा. काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवून नव्या अध्यक्षांचा निर्णय घेतला जाईल’, असे जाहीर करून तूर्त अध्यक्षपदाचा विषय लांबणीवर टाकण्यात काँग्रेसला यश आले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४ मध्ये यश मिळवले तेव्हापासून आजपर्यंत भाजपने काँग्रेसबाबत काही मुद्द्यांवर जनभावना निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्यामधील मुख्य मुद्दे म्हणजे काँग्रेस ही गांधी कुटुंबाची मालमत्ता असून काँग्रेसची घराणेशाही हा देशाला शाप आहे. गेल्या ६० वर्षांत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराने देशाला खड्ड्यात घातले. काँग्रेसची सेक्युलर भूमिका म्हणजे मुस्लिमांचे लांगुलचालन असून मतांकरिता काँग्रेसने मुस्लिमांचे लाड केल्याने हिंदूंवर वर्षानुवर्षे अत्याचार झाले. यापुढे मोदींच्या नेतृत्वाखाली देशात हिंदू ताठ मानेनी जगतील व मुस्लिम हे दुय्यम नागरिक असल्यासारखे राहतील. भाजपने ही जनभावना झटपट निर्माण केलेली नाही. त्याकरिता फार पूर्वीपासून प्रयत्न केले असून फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅप वगैरे सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला आहे. लंडनमधील वॉलस्ट्रीट जर्नलने त्या प्रचाराचा अलीकडेच पर्दाफाश केला आहे. आपला हा प्रचार यशस्वी होण्याकरिता अभाविपच्या कार्यकर्तीचा बंधू फेसबुकचा भारतामधील उच्चाधिकारी नियुक्त होण्यापर्यंत सर्व प्रयास भाजपने केले आहेत.
याखेरीज काँग्रेसमधील संभाव्य नेतृत्वाच्या स्पर्धेतील नावांबाबत पर्सेप्शन निर्माण करण्याकरिताही सोशल मीडियाचा व सत्तेचा पुरेपुर वापर केला आहे. २००४ मध्ये सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार देत अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी २००९ पर्यंत केलेल्या कारभारामुळे काँग्रेसला अधिक यश लाभले. सोनिया यांची प्रकृती बिघडल्याने राहुल यांचा उदय झाला व मनमोहन सिंग व राहुल यांच्यात संघर्षाच्या ठिणग्या उडू लागल्या. केंद्र सरकारचा अध्यादेश पत्रकार परिषदेत टरकावण्यामुळे ते मतभेद उघड झाले. परंतु हे सिंग पुन्हा काँग्रेसला उर्जितावस्थेला नेऊ नये याकरिता सिंग हे रबरस्टॅम्प आहेत, असे चित्र जनमानसात भाजपने पद्धतशीर रुजवले. टुजी घोटाळ्यात त्यांचे नाव गोवले गेले. राहुल यांना ‘पप्पू’ ही उपाधी चिकटवून त्यांना तरुण वर्गाच्या मनातून साफ उतरवले.
"...म्हणून मी सोनिया गांधींना मानते", घराणेशाहीवर उमा भारतींचे विधान
Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा
शशी थरुर यांच्यासारखा नेता कदाचित भविष्यात काँग्रेसचा अध्यक्ष झाला तर व्यक्तिमत्व, इंग्रजीवरील प्रभुत्व, परराष्ट्र संबंधात अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकारामुळे डोकेदुखी ठरू शकतात हे ओळखून त्यांची प्रतिमा प्लेबॉय अशी केली. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विरोधात संशय निर्माण केला गेला. पी. चिदम्बरम हे अर्थतज्ज्ञ व निष्णात वकील आहेत. कदाचित काँग्रेस त्यांच्याकडे अध्यक्षपद देऊ शकेल हे लक्षात घेऊन चिदम्बरम यांना तुरुंगात डांबून त्यांचे प्रतिमाभंजन केले गेले. प्रियंका गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे स्वीकारू नये याकरिता रॉबर्ट वड्रा यांच्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवली. थोडक्यात काय तर काँग्रेस पक्षाबद्दल व त्या पक्षातील संभाव्य नेतृत्व करू शकणाऱ्या चेहऱ्यांबद्दल हेतूत: नकारात्मक पर्सेप्शन तयार करून भाजपने काँग्रेसची चोहोबाजूने कोंडी केली आहे. एकेकाळी सोनिया ही विदेशी महिला असून ती कधीही हा देश सोडून जाईल व देशाची गुपिते विकून टाकेल, असा अपप्रचार भाजपने केला होता. मात्र सोनिया यांनी तडफेने तो अपप्रचार खोडून काढला व आपले नेतृत्व सिद्ध केले. त्यामुळे काँग्रेसला नवा आश्वासक चेहरा निवडताना सर्वप्रथम काँग्रेसच्या घराणेशाहीला मूठमाती द्यावी लागेल.
ज्याप्रमाणे सोनिया यांनी मनमोहन सिंग हा चेहरा पुढे करून लोकांची मने जिंकली तसे काहीतरी करावे लागेल. कदाचित रघुराम राजन यांच्यासारखा विद्वान अर्थतज्ज्ञ किंवा तरुण वर्गात लोकप्रिय असलेला एखादा टेक्नोक्रॅट हा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणून मोदींच्या चेहऱ्याला काँग्रेसकडून आव्हान दिले जाऊ शकते. राजीव गांधी यांनी सॅम पिद्रोडा यांच्या मदतीने भारतात संगणक युग सुरू करून तत्कालीन तरुणांची मने जिंकली होती. नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांच्या मदतीने खुली अर्थव्यवस्था देशाला स्वीकारायला लावून मध्यमवर्गीयांना आर्थिक संधी व सुबत्तेची स्वप्ने दाखवली. राजीव, नरसिंह राव व सोनिया हे शंभर टक्के राजकारणी होते व आहेत. पण सॅम पिद्रोडा, मनमोहन सिंग हे वेगळा विचार करून नव्या पिढीच्या आशाआकांक्षांना साद घालणारे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे राहुल यांना आपले नेतृत्व सिद्ध करण्याचे बाळकडू घरातून मिळालेले आहे. केवळ युवकांना पसंत पडेल, असा चेहरा त्यांना मोदींच्या समोर ठेवायचा आहे. कारण देश पुन्हा घराणेशाही स्वीकारणार नाही हे उघड आहे.
काँग्रेस जुन्या वळणावर; स्वातंत्र्यलढ्यातील पुण्याईचा यापुढे उपयोग होणार नाही हे ओळखावं
वासनिक म्हणाले, ‘सॉरी’ दुखावण्याचा हेतू नव्हता; लेटरबॉम्ब टाकणाऱ्यांची आज तलवार म्यान
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या निमित्ताने सुरू झालेली नेपोटिझमची चर्चा ही एकीकडे ठाकरेंच्या घराणेशाहीला चाप लावणारी आहे, तशीच ती गांधी घराण्याच्या पायात बेडी अडकवण्याकरिता सुरू झालेली आहे. सोनिया यांची हंगामी अध्यक्षपदाची मुदत संपत असतानाच हे सर्व सुरू होणे व काँग्रेस कार्यकारिणीत राहुल यांना नेतृत्व देण्याची मागणी काही नेते करीत असताना फोन-पे या कंपनीने जाहिरातीमध्ये आलिया भट्टला संधी दिल्याने दिवसभर नेपोटिझमवरुन फोन-पे विरुद्ध ट्विटरवर चर्चा झडणे हा योगायोग नाही. घराणेशाहीच्या विरोधात निर्माण केलेला अंगार विझू नये, याचीच ही भाजपची धडपड आहे.
काँग्रेसची संघटनात्मक बांधणी जवळपास संपुष्टात आली आहे. काँग्रेसमध्ये दरबारी राजकीय नेत्यांची भाऊगर्दी झाली आहे. मोदींचा मुकाबला करण्याकरिता सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका स्वीकारण्याची बालिश सूचना अशाच दरबारी राजकीय नेत्यांनी केल्याने गुजरात विधानसभा निवडणुकीत व अन्य काही निवडणुकीत काँग्रेसने तो प्रयोग केला. मात्र फारसे हाती लागले नाही. उलटपक्षी राम मंदिर उभारणीचा श्रीगणेशा करून भाजपने काँग्रेसला चपराक लगावली. भाजप व रा. स्व. संघाने गेल्या काही वर्षांत संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. त्यामुळे काँग्रेसला त्यावर बरेच कष्ट घ्यावे लागतील. काँग्रेसचे विरोधक सत्ता मिळाल्यावर चुका करतील व आपसुक सत्ता पुन्हा पदरात पडेल. त्यामुळे संघटनात्मक बांधणी करण्याची गरज नाही, अशा भ्रमात यापुढे काँग्रेसला राहून चालणार नाही. सत्तेचा त्याग करण्याची तयारी राहुल यांनी दाखवली तर पक्ष बांधणीकरिता ते काम करू शकतील. अर्थात गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रयत्नांची पराकाष्ठा अपरिहार्य आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सत्ता असताना काँग्रेसनी सेक्युलर विचारधारा मानणाऱ्या प्रादेशिक पक्षाचा, नेत्यांचा दुस्वास केला आहे. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, देशावर राज्य केले आहे हा अहंपणा विसरुन भाजपशी लढणाऱ्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची व वेळप्रसंगी मोठा वाटा त्यांच्या पदरात टाकण्याची तयारी काँग्रेसला ठेवावी लागेल.
मोदी यांची कार्यपद्धती काँग्रेसला समजून घेणे गरजेचे आहे. मोदी आत्मकेंद्री व्यक्ती असून त्यांच्यावर त्यांच्या पक्षातील अनेकजण नाराज आहेत. पक्षातील हे अंतर्विरोध काँग्रेसला लाभदायक ठरू शकतात. मोदींचे यश हे त्यांच्या वाणीत दडलेले आहे. आपण केलेल्या अथवा न केलेल्या कामाचे श्रेय ते मिळवतात. मोदी हे उत्तम मार्केटिंग व इव्हेंट मॅनेजर आहेत. एका कार्यक्रमाचे गारुड लोकांच्या मनावर असतानाच ते दुसरा इव्हेंट घडवून आणतात. आर्थिक आघाडीवर मोदी व त्यांच्या सरकारमध्ये मोठी पोकळी आहे. त्या आघाडीवर काँग्रेसने सप्रमाण मोदींचा कान धरला तर त्यांची पंचाईत होऊ शकते. मात्र कान धरणारी व्यक्ती ही अधिकारवाणीने बोलणारी व निष्कलंक हवी. सोशल मीडियावरील उच्च मध्यमवर्ग दीर्घकाळ आपले ऐकणार नाही, विश्वास ठेवणार नाही, हे मान्य करून बोलत राहण्याची तयारी काँग्रेसला भविष्यात ठेवावी लागेल. सोशल मीडिया न वापरणाऱ्या गोरगरीब, उपेक्षित यांचे प्रश्न हातात घेऊन काँग्रेसला सातत्याने आंदोलने करावी लागतील. सुरुवातीला त्याची फारशी दखल घेतली जाणारही नाही. मात्र कालांतराने मीडिया, सोशल मीडियाला त्यांची दखल घ्यावी लागेल. ही कठोर परिश्रमाची, संघर्षाची लढाई राहुल गांधी व काँग्रेस लढली तरच ते टिकतील.