-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्या दिवशी राहुल गांधी यांचे अनेक विरोधी पक्षनेत्यांनी फोनवरून अभिनंदन केले. राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचाही त्यात समावेश होता. बोलता बोलता राहुल गांधी त्यांना म्हणाले ‘तुम्ही अत्यंत रुचकर स्वयंपाक करता असे मी ऐकले आहे’ - लालू हो म्हणाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी राहुल यांना जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. राहुल यांनी ते स्वीकारले, पण एक व्यक्तिगत विनंती केली; ‘तुम्ही तुमचे खास पदार्थ माझ्यादेखत शिजवायचे कारण मला स्वयंपाक शिकायचा आहे. तुम्ही आधीची काय लागते ती तयारी करून ठेवा; परंतु शिजवताना मात्र मी उपस्थित राहीन!’ - राहुल गांधी वेळेवर हजर झाले आणि त्यांनी लालू स्वयंपाक करतानाचा एक व्हिडीओही तयार केला. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही यावेळी उपस्थित होते. लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांबरोबर राहुल यांनी भोजन केले.
- आता त्यांचे सरकारी निवासस्थान पुन्हा मिळाले आहे. स्वयंपाकाचा प्रयोग ते आपल्या या घरी करतील असे दिसते. संदीप दीक्षित यांच्या घरात राहायला जाण्याचा बेत त्यांनी रद्द केला. कारण सुरक्षा यंत्रणांची परवानगी मिळाली नाही! तोतयांनी घातली टोपी भारतीय क्रिकेट नियामक मंडळातले महत्त्वाचे पद मिळविण्यासाठी घायकुतीला आलेले एक पोलिस अधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. हरयाणाचे पोलिस महानिरीक्षक इतक्या मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या या अधिकाऱ्याला तोतयांनी गंडवले. काही तोतयांनी ‘तुम्हाला क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक देण्यात येणार असल्या’ची बातमी त्यांना दिली. त्याबदल्यात या तोतया मंडळींनी अधिकाऱ्याकडून बरीच मोठी रक्कमही उकळली. क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले नेमणूक पत्रही त्यांना देण्यात आले. या बड्या अधिकाऱ्याशी त्यांनी फोनवरून संवादही घडवून आणला. क्रिकेट नियामक मंडळाचे हे पत्र प्रस्तुत लेखकाच्या हाती लागले असून त्यात असे म्हटले आहे की, हरयाणाच्या या माजी पोलिस महानिरीक्षकांना १५ जुलै २०२३ पासून १४ जुलै २०२६ पर्यंत भ्रष्टाचारविरोधी कक्षाच्या प्रमुखपदी नेमणूक देण्यात येत आहे.
संबंधित पोलिस महानिरीक्षक २०२० मध्ये महासंचालकपदावरून निवृत्त झाले असून सध्या ते हरयाणा राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे सदस्य म्हणून काम करतात. आपल्याला गंडवण्यात आले आहे हे लक्षात आल्यावर हादरलेले हे अधिकारी व्यक्तिगत कारणांनी अमेरिका दौऱ्यावर निघून गेले. तोतयांविरुद्ध त्यांनी साधी औपचारिक तक्रारही नोंदवली नाही. अलीकडेच गुजरातमधल्या एका तोतयाने अनेक अधिकाऱ्यांना टोपी घातली; त्यात अगदी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपालही होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तोतयांनी घडविलेला हा दुसरा प्रताप होय!
विरोधकांकडील राज्यांवर मोदींची खैरातकेंद्र सरकारने खाणी आणि खनिजद्रव्य दुरुस्ती कायदा संसदेमध्ये गोंधळातच पारित केला. त्याचा फायदा एनडीएचे घटक नसलेल्या विरोधी पक्ष शासित राज्यांना होणार आहे. बिहार असो वा झारखंड, तेलंगणा, ओडिशा, केरळ किंवा पश्चिम बंगाल ही सर्व राज्ये खनिजांनी समृद्ध आहेत; पण गेल्या काही दशकांपासून या ना त्या कारणाने त्यांना खनिजांचे उत्खनन करता येत नव्हते. नव्या कायद्यामुळे ते शक्य होईल. यासाठी १०७ खाणी निश्चित करण्यात आल्या असून त्यातील १९ खाणींचा लिलाव करण्याची परवानगी राज्यांना देण्यात आली आहे. ८८ खाणींमध्ये लिथियम, बेरिलियम सारखी खनिजे आहेत. त्याचप्रमाणे झिर्कोनियम व अन्य खनिजे सापडणाऱ्या खाणींचाही लिलाव करण्यात येणार आहे. मात्र, या लिलावातून मिळणारा पैसा केंद्र सरकारच्या खजिन्यात जाणार नाही. हा पैसा राज्य सरकारांना मिळेल.
लिथियम, कोबाल्ट, सेलेनियम, मॉलीब्डेनम, टंगस्टन आणि इतर खनिजे बाहेर काढण्यासाठी अर्थातच खासगी क्षेत्रातून प्रयत्न होतील यात शंका नाही. उत्पन्न वाढवून घेण्याच्या सूत्रावर बोली जिंकणाऱ्याची निवड केली जाईल. खनिज द्रव्यांनी समृद्ध असलेल्या या राज्यांना उत्खननाची आस लागली होती. मोदी यांनी सध्याच्या कठीण काळात त्याना संतुष्ट केले आहे.
बदलती समीकरणेराजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून सादर करणार नाही असे दिसते आहे. वसुंधराराजे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे पक्षश्रेष्ठींशी त्यांचा समझौता झाल्याच्या प्रचलित समजुतीला तडा गेला आहे. ‘घटनेने भले स्त्रियांना समान हक्क दिले असतील. परंतु, त्यासाठी प्रत्येक पावलावर स्त्रियांना झगडावे लागते’ असे ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘सर्व महत्त्त्वाचे निर्णय पुरुष घेत असतात. मी राजस्थानच्या राजकारणात आले तेव्हा मला खूप संघर्ष करावा लागला. दबावाला बळी पडले असते तर मी आज जेथे आहे तेथे पोहोचले नसते’, असेही त्या म्हणतात. ‘स्त्री स्वतः निर्धार करील तर ती डोंगरही हलवू शकते’, अशी गर्जनाही वसुंधराराजे यांनी केली आहे. - त्यांच्या या ट्वीटमुळे भाजप श्रेष्ठी अस्वस्थ आहेत!