काळाच्या पडद्याआड जाऊन अनेक वर्षे उलटल्यावरही वादांच्या केंद्रस्थानी राहण्याचे दुर्भाग्य काही महापुरुषांना लाभले आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नाव त्या यादीत अग्रक्रमाने घ्यावे लागेल. सावरकर नेहमीच एका वर्गासाठी दैवत अन् दुसऱ्या वर्गासाठी टीकेस पात्र व्यक्तिमत्त्व ठरत आले आहेत; परंतु अलीकडे त्यांच्यावरील टीकेला जरा जास्तच धार चढताना दिसत आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी बरेचदा गरज नसतानाही सावरकरांवर टीकेची झोड उठवताना दिसतात. मग तेवढ्याच हिरिरीने सावरकर प्रशंसक त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरतात आणि नव्या वादाला तोंड फुटते.
काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांना एका मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाली. त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना, सावरकरांचा उल्लेख करून माफी मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. अडचणीच्या ठरणाऱ्या या विषयाला ठाकरे आजवर पद्धतशीरपणे बगल देत आले आहेत. रविवारी नाशिक येथे जाहीर सभेस संबोधित करताना मात्र, त्यांनी सावरकरांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा थेट राहुल गांधी यांनाच देऊन टाकला. त्यामुळे आता ते स्वत:च खिंडीत सापडले आहेत. उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी संधीच्या शोधातच असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांनी ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे.
ठाकरेंना खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने मैदानात उतरले आहेत. मनसेकडून राहुल देशपांडे आणि भाजपकडून राम कदम यांनीही सोमवारी ठाकरेंवर टीकास्त्रे डागली. ठाकरेंनी राहुल गांधींना दिलेला इशारा केवळ दाखविण्यापुरता आहे, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे ते नेमके काय करणार, प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा राहुल गांधींच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलण्याची त्यांची हिंमत होणार नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत प्रत्यक्ष कृती होणार नाही, असा भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांचा सूर आहे. तिकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन, सावरकरांच्या अपमानासंदर्भात आपण अतिशय गंभीर असल्याचे दाखवून दिले आहे. ठाकरे यांचा इशारा राहुल गांधी गांभीर्याने घेतात की नाही आणि त्यांनी ठाकरेंच्या इशाऱ्याला भीक न घालता सावरकरांवरील टीका यापुढेही सुरूच ठेवली, तर ठाकरे कोणती भूमिका घेणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत.
राहुल गांधींच्या सावरकरांवरील टीकेमुळे ठाकरेंसोबतच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचीही मोठी गोची झाली आहे, हे मात्र निश्चित! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावरून भाजप, शिंदे गट आणि मनसेचे नेते भरभरून व्यक्त होत असताना, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी मात्र अळीमिळी गुपचिळी धोरण स्वीकारले आहे. महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही तोंडात मिठाची गुळणी धरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही प्रमुख नेत्याने या विषयावर तोंड उघडले नव्हते. सावरकर या विषयाने राज्य काँग्रेसची नेहमीच गोची केली आहे. सावरकरांचे समर्थन करून गांधी कुटुंबाची नाराजी ओढवून घेता येत नाही अन् टीका केली तर राज्यातील निवडणुकांमध्ये फटका बसण्याची भीती वाटते! त्यामुळे काँग्रेस नेते या मुद्यावर बहिरेपणाचे सोंग घेणेच पसंत करतात.
उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढण्याची घाई झालेल्या भाजपच्या हे चांगलेच पथ्यावर पडले आहे. या मुद्याच्या निमित्ताने ठाकरे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दरी निर्माण करण्याची आयतीच संधी भाजपपुढे चालून आली आहे. तिचा लाभ उपटण्याचे पुरेपूर प्रयत्न तो पक्ष करणारच! दुसरीकडे राहुल गांधी यांचा एकंदर स्वभाव आणि आजवरची राजकीय वाटचाल बघता, ते सावरकरांविषयी यापुढे भाष्य करणार नाहीत, याची शक्यता फार धूसर आहे. ते यापुढे जेव्हा सावरकरांच्या विरोधात बोलतील, त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेंना त्यांच्या इशाऱ्याची आठवण करवून देण्याचे काम भाजप नेते निश्चितपणे करतील. त्यावेळी ठाकरे यांची भूमिका काय असेल, हे बघणे रंजक ठरणार आहे. तूर्तास सावरकरांमुळे ठाकरे कोंडीत सापडले आहेत, हे मात्र निश्चित!