राहुल गांधींचा पदत्याग काँग्रेसच्या हितासाठीच
By विजय दर्डा | Published: July 8, 2019 05:49 AM2019-07-08T05:49:43+5:302019-07-08T05:50:40+5:30
काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी अखेरपर्यंत ठाम राहिले. आपण आता काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले.
काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी अखेरपर्यंत ठाम राहिले. आपण आता काँग्रेसचे अध्यक्ष नाही, असे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. या घोषणेसोबत राहुलजींनी पक्षाला लिहिलेले चार पानांचे एक पत्रही प्रसिद्ध केले. व्यक्तिश: माझ्यासाठी हा अत्यंत दु:खद प्रसंग आहे. पण मी राहुलजींच्या धाडसाची व सुस्पष्ट दृष्टिकोनाची प्रशंसा करतो. काँग्रेस पक्षास नवसंजीवनी मिळावी या दृष्टीनेच त्यांनी हा पदत्याग केला, हे अगदी उघड आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात काँग्रेसचा एवढा दारुण पराभव झाला याचे आणि एकूणच पक्षाची बिकट स्थिती याचे त्यांनाही नक्कीच दु:ख झाले असणार. मला असे वाटते की, राहुलजींनी मनापासून कठोर मेहनत केली, पण काँग्रेसकडून पक्ष म्हणून त्यांना साथ मिळाली नाही. काँग्रेसमध्ये आमूलाग्र परिवर्तन होण्याची गरज राहुलजींनी त्यांच्या पत्रात प्रतिपादित केली, ते योग्यच आहे.
गेल्या ३ जूनचा माझा हा कॉलम याच विषयावर होता. काँग्रेसची एवढी शोचनीय अवस्था का झाली, याचे सविस्तर विश्लेषण मी त्यात केले होते. काँग्रेसमध्ये संघटना नावाची गोष्ट अजिबात राहिलेली नाही, हे नाकारता न येणारे वास्तव आहे. पक्षात कुठे सेवादल दिसत नाही, ‘एनएसयूआय’ दिसत नाही की महिला काँग्रेसचे अस्तित्वही जाणवत नाही. पक्षाची ‘इंटक’ ही कामगार संघटना तर अस्ताला गेल्यासारखी वाटते.
राहुलजी अध्यक्ष झाले तेव्हा ते नव्या भिडूंची टीम तयार करतील, अशी अपेक्षा जरूर होती. परंतु आपमतलबी चौकटीने त्यांना घेरले. सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला ते त्या विश्वासाला पात्रच नव्हते. ते तर आपापले हिशेब मांडण्यात दंग होते. पक्षाची अशी अवस्था असताना दुसरीकडे भाजपने अगदी विचारपूर्वक खेळी करून राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्याची व त्यांना राजकीय थट्टेचा विषय बनविण्याची पावले टाकली. पक्षाचा अध्यक्ष होऊ शकेल, असा नेहरू-गांधी घराण्याखेरीज अन्य कोणी काँग्रेसमध्ये नाही का, असे अनेक लोक मला विचारत असत. देशाच्या उभारणीत नेहरू-गांधी घराण्याचे मोठे योगदान आहे, एवढेच नव्हे तर त्यांनी मोठी किंमतही मोजली आहे, असे सांगून मी लोकांची समजूत काढत असे. पण आज स्थिती अशी आहे की, हे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत कोणी नाही. देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुणांची आहे. यापैकी अनेकांची कुटुंबे पूर्वी काँग्रेसी होती, पण या तरुण पिढीचा काँग्रेसशी काही संबंध राहिलेला नाही. राहुल गांधी यांना राजकीय थट्टेचा विषय बनविले गेले तेव्हा त्यास सडेतोडपणे प्रत्युत्तर देण्याचे काम काँग्रेसने केले नाही. जनमानस आपल्या बाजूने वळविण्यातही पक्ष अपयशी ठरला. भाजपने नेहरू-गांधी घराण्याविषयी अत्यंत घातक प्रचारतंत्र वापरले. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या काळात कोणालाही मोठे होऊ दिले नाही, हे लोकांच्या मनावर ठसविण्यात भाजप यशस्वी ठरली. या बदनामी मोहिमेस काँग्रेसने का थोपविले नाही, असा माझा प्रश्न आहे. जिगरबाज पद्धतीने लढायचे असेल तर आधी प्रतिस्पर्ध्याची नीट ओळख करून घ्यावी लागेल. आपले कोण व गैर कोण याचा चाणाक्षपणे शोध घ्यावा लागेल.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या स्थितीविषयी मी राहुलजींना नेहमीच वस्तुस्थिती सांगत आलो. संघटनेच्या पातळीवर एका मोठ्या ‘आॅपरेशन’ची गरज होती. पण पक्षात कोंडाळे करून बसलेल्या चौकडीला ते मान्य नव्हते. नेमका कोण आपला आहे, कोण स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी जवळीक करत आहे, हे सर्व बारकाईने पाहण्याची गरज होती. परंतु तसे होऊ शकले नाही. ज्यांचे काँग्रेसशी कधीही समर्पण भावनेने नाते नव्हते ते पदे मिरवीत राहिले. पडत्या काळात जे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले त्यांना दूर ठेवले गेले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकून पुन्हा सत्तेत येण्याची द्वाही मिरविली आहे. पण काँग्रेसमध्ये काही हालचाल होताना दिसत नाही.
मला असे वाटते की, केवळ राहुल गांधींच्या राजीनाम्याने चित्र बदलणार नाही. काँग्रेसला रसातळाला नेणाऱ्या मतलबी चौकडीचेही उच्चाटन करावे लागेल. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या लोकांना पुढे आणावे लागेल. एकेकाळी संपूर्ण देशावर राज्य करणाºया या पक्षाची अशी अवस्था का झाली, याचा काँग्रेसच्या नव्या कमांडरला गांभीर्याने विचार करावा लागेल. ज्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा करिश्माई नेता व अमित शहा यांच्यासारखा कुशल डावपेचपटू आहे अशा भाजपशी आता काँग्रेसची गाठ आहे. गमावलेला जनाधार पुन्हा मिळविण्यासाठी काँग्रेसला खडतर मेहनत करावीच लागेल.
पक्ष नव्या दमाने पुन्हा उभा राहावा, यासाठीच राहुलजींनी त्याग केला आहे. त्यांचे पिता राजीव गांधी यांनीही देशासाठी मोठा त्याग केला होता. मला असे वाटते की, राहुलजी नेहमीच पक्षासोबत राहतील, पक्षाला दिशा दाखविण्याचेही काम करतील. पण कालांतराने राहुलजींना पुन्हा एकदा पक्षाची धुरा आपल्या हाती घ्यावीच लागेल. त्यांची प्रतिमा उजळण्याची आज गरज आहे. राहुलजींमध्ये क्षमता आहे, देशभक्ती आहे, काम करण्याची ऊर्मी आणि निष्ठा आहे. त्याग, तपश्चर्या व राष्ट्रीय आंदोलनाचा वारसाही त्यांच्या जोडीला आहे. त्याचा नक्कीच उपयोग होईल.
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरिअल बोर्ड,
लोकमत समूह