पक्षाला जडलेल्या ‘अंकल लागण’मुळे राहुल चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:45 AM2018-07-06T02:45:04+5:302018-07-06T02:45:14+5:30
पक्षाच्या ध्येय-धोरणांशी विसंगत विधाने करणाऱ्या आणि जे काही कमावले आहे ते नष्ट करण्यासाठी मोदी-शहांच्या हाती आयते कोलित देणाºया पक्षातील ‘अंकल्स’मुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे नाराज आहेत.
- हरीश गुप्ता
(लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर)
पक्षाच्या ध्येय-धोरणांशी विसंगत विधाने करणाऱ्या आणि जे काही कमावले आहे ते नष्ट करण्यासाठी मोदी-शहांच्या हाती आयते कोलित देणाºया पक्षातील ‘अंकल्स’मुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे नाराज आहेत. अ. भा. काँग्रेस अधिवेशनात मोदींविरुद्ध ‘चायवाला’ वक्तव्य करून २०१४च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचारमोहिमेची वाट लावणारे ‘अंकल’ मणिशंकर अय्यर यांच्यापासून सुटका करताना राहुल गांधींना प्रचंड कष्ट पडले होते. पक्षातील ज्येष्ठांना नेहमीच जनहिताच्या मुद्यांवर बोलताना काळजी घेण्याची आणि अधिकृत पक्ष प्रवक्त्यांनी दिलेल्या पक्षाच्या ध्येयधोरणांवर कायम राहण्याची विनंती ते करीत आले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दिन सोझ यांनी जम्मू-काश्मीरबाबत अवेळी केलेल्या विधानांमुळे राहुल गांधी संतप्त झाले होते. भाजपा आणि पीडीपी यांच्यात संघर्ष सुरू असताना आणि काँग्रेस आपले धोरण आखण्याच्या तयारीत असतानाच सोझ यांनी वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधी अधिक संतप्त झाले होते. या ‘सोझ बॉम्ब’ने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. परंतु राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सोझ यांच्या काश्मीरवरील वक्तव्याचे समर्थन करून काँग्रेसची जखम अधिक खोल केली. राहुल गांधी यांच्यासाठी त्यांच्या आजी स्व. इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच गुलाम नबी आझाद हे ‘अंकल’ असल्याकारणाने त्यांना काही सुचेनासे झाले होते. त्यामुळे ‘अंकल’ आपण खरोखरच चुकलात’, असे फोन करून सांगण्याचे धाडसही ते करू शकले नाही. राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांना मात्र फोन करून आझाद यांच्याशी बोलण्यास सांगितल्याचे समजते. हा मुद्दा उपस्थित करण्याची ही योग्य वेळ नव्हती, अशा शब्दात सोनिया गांधी यांनी आझाद यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव करून दिल्याचेही कळते. त्यानंतर आझाद यांनी सोझ यांना शांत राहण्याचा आमि मीडियापासून जरा दूरच राहण्याचा सल्ला दिला. या पार्श्वभूमीवर जेव्हा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी काश्मीर मुद्यावर बैठक घेण्यात आली तेव्हा राहुल गांधींनी बैठकीचे अध्यक्षस्थान मात्र भूषविले नाही.
जयराम रमेश ‘कोडे’
राहुल गांधी यांना जयराम रमेश यांचेही कोडे पडलेले आहे. ते अभ्यासू आणि १९७५-७७ मध्ये कार्नेजी मेलॉन विद्यापीठात शिकलेले भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचे सल्लागार बनल्यापासूनच ते सक्रिय आहेत. त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. २००४ पासून राज्यसभेचे सदस्य असलेले रमेश कॅबिनेट मंत्रीही राहिलेले आहेत. ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना २०१९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी १५ गुरुद्वारा रकबगंज मार्ग येथे स्थापित केलेल्या काँग्रेस वॉर रूमचे प्रमुख बनविण्यात आल्याचेही समजते. तसे २००४ पासूनच ते वॉर रूममध्ये सहभागी आहेत. ते अविवाहित आणि वन-मॅन आर्मी सारखेच राहिलेले आहेत. लॅपटॉप २४ तास त्यांच्या खांद्यावर असतो आणि त्याद्वारे ते नेत्यांसाठी भाषणांचा मसुदा तयार करीत असतात. परंतु त्यांनी नुकताच राहुल गांधींच्या विरोधात मार्ग पत्करला आणि स्वत:चे नुकसान करून घेतले. सैफुद्दिन सोझ यांनी काश्मीरवर लिहिलेल्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहू नका, हा काँग्रेस पक्षाचा अघोषित आदेश त्यांनी धुडकावला. या प्रकाशन सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेले पी. चिदंबरम मात्र या कार्यक्रमापासून दूरच राहिले. एवढेच नव्हे तर आधी उपस्थित राहण्याचा निर्णय घेणारे डॉ. मनमोहनसिंग यांनीही घरीच राहणे पसंत केले. विशेष सुरक्षा गटाने कार्यक्रम स्थळाची रेकीही केली. परंतु रमेश यांनी उपस्थित राहणे आवश्यक समजल्याने राहुल गांधी नाराज झाले. आता राहुल गांधींची नाराजी दूर करण्यासाठी प्रियंका गांधींना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.
प्रशांत किशोर पुन्हा नितीशकुमारांच्या तंबूत
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निवडणूक विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पुन्हा जवळ करीत त्यांच्यावर आगामी निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराचे काम सोपविण्याची तयारी चालविली आहे. नितीशकुमार यांच्याकडे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेचे नेतृत्व सोपविण्याचा भाजपाचा इरादा दिसत नाही. त्यामुळे येणारा काळ कठीण असल्याची जाणीव एकटे पडलेले नितीशकुमार यांना झाल्याचे दिसते. १२ जुलै रोजी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत जागा वाटपाबाबतची चर्चा होणार आहे. या चर्चेच्या फलनिष्पत्तीबाबत नितीशकुमार साशंक आहेत. राजदला पुन्हा जवळ करण्याच्या प्रयत्नात त्यांनी लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. परंतु लालूंच्या दोन्ही पुत्रांनी नितीशकुमार यांच्या या प्रयत्नांवर कटू शब्दांत टीकास्त्र सोडले. ‘आता नितीशकुमार यांच्यासाठी आमची दारे नेहमीसाठी बंद झाली आहेत,’ असे लालूपुत्रांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर यांना पुन्हा जवळ करण्याचे ठरविले आहे. २०१५ मध्ये संजद-राजद-काँग्रेस आघाडीला विजय मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हे विजयी झाले होते. परंतु २०१४ च्या ऐतिहासिक विजयानंतर मात्र किशोर मोदी तंबूमधून बाहेर पडले होते.
काँग्रेससाठी नितीशकुमार नैसर्गिक मित्र
काँग्रेस बिहारमधील राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि सुरक्षित खेळी खेळत आहे. एकीकडे भाजपा-नितीशकुमार यांच्यात वरचढ होण्याची स्पर्धा चालू असताना आणि लालूपुत्र नितीशकुमारांवर कठोर टीका करीत असताना काँग्रेस मात्र शांत आहे. ‘काँग्रेस आणि राजद हे संयुक्त जनता दलाचे नैसर्गिक मित्र आहेत,’ असे ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये महाआघाडीतून बाहेर पडण्याचा नितीशकुमार यांचा निर्णय ही ‘घोडचूक’ होती, असेही गहलोत यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला असला तरी नितीशकुमार यांच्यासोबत पुन्हा आघाडी करण्यासाठी काँग्रेस अनुकूल असल्याचेच संकेत त्यांनी दिले आहेत. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत आणि २०१९ मध्ये २०१५ ची पुनरावृत्ती होऊ शकते, याची काँग्रेसला पुरेपूर जाणीव आहे. संजदसोबत आघाडी करण्याच्या संदर्भात आपण राजदचे मन वळविण्यात यशस्वी होऊ, असा काँग्रेसला विश्वास आहे. गहलोत म्हणाले, ‘नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडायला नको होते. ती त्यांची घोडचूक होती. २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांना भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आल्यावर मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडणारे आणि महाआघाडी स्थापन करणारे नितीशकुमार महाआघाडी कसे काय सोडू शकतात, हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे.