- विनायक पात्रुडकर सध्या राज्यभर राज ठाकरे यांच्या सभांची चर्चा आहे. तेही जिवाचे रान करत मोदी-शहा या दुकलीला उघडे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसादही मिळत आहे. मुळात ते उत्कृष्ट वक्ते आहेतच, त्याला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनची जोड दिल्याने लोकांनाही ही पद्धत भावली आहे. त्यामुळे वाहिन्यांना जबरदस्त खाद्य मिळाले असून, त्यांची यंदाच्या टीआरपीची काळजी मिटली आहे. राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नसले, तरी मोदी-शहा नको हे ते प्रत्येक सभेतून ओरडून सांगत आहेत. त्यांचे अनेक मुद्दे लोकांना पटत आहेत, मोदी-शहांनी चुका केल्याचे लोकांना जाणवतही आहे. राज ठाकरेंचे भाषण संपल्यानंतर लोक विचार करत बाहेर पडतात की, ठीक आहे मोदी-शहा नको; पण मग पर्याय कोण? पुन्हा त्यांचा गोंधळ सुरू होतो. एकीकडे राज ठाकरे योग्य बोलत आहेत हेही पटतेय; पण दुसरीकडे कुणाकडे जायचे, हा प्रश्न बाकी आहे.राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून पर्याय दिला नसल्याने, केवळ नकारात्मक मन:स्थितीतून लोक बाहेर पडतात आणि पर्याय ठोस नसल्याने मनाचा पक्का निर्धारही होत नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीतून प्रभाव टाकत लोकांना विचार करायला भाग पाडले; पण सक्षम पर्याय वा स्वत:चे उमेदवार न दिल्याने लोकांची अवस्था लटकलेलीच राहिली. त्यांच्या सभांची सर्वच माध्यमांनी मोठी दखल घेतल्याने राज्यभर याच सभांची चर्चा झाली. अनेक राष्ट्रीय वाहिन्यांचे संपादक-वरिष्ठ पत्रकार यांनी त्यांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यातही त्यांनी भाषणांमधला मुद्दा ठोसपणे मांडला.मोदींवर शाब्दिक हल्ला झाल्याने देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषणातून प्रतिहल्ला चढविला. ‘शरद पवारांचा पोपट’ इथपासून ते राष्ट्रवादीची सुपारी घेतलेले भाडोत्री नेते, अशी टीकाही झाली. याचा आधार घेत, जेव्हा पत्रकार प्रश्न विचारीत, तेव्हा मात्र राज ठाकरे यांची चीडचीड दिसायची. तुम्ही फडणवीसांची सुपारी घेऊन मला प्रश्न विचारताय का? असा अवमानकारक प्रतिप्रश्नही त्यांनी काहींना केला. नरेंद्र मोदी हे सत्तेवर असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा माझा अधिकार असल्याचे जेव्हा राज ठाकरे सांगतात, तेव्हा राज ठाकरे यांना अडचणीत आणणारे प्रश्न मात्र चालत नाहीत. राज ठाकरे यांना अडचण वाटेल असे प्रश्न विचारल्यानंतर, तुम्ही भाजपची सुपारी घेऊन मला प्रश्न विचारू नका, असा आरोप करीत पत्रकारांना गप्प करतात. कदाचित, त्यांच्या म्हणण्यात तथ्यांश असलेही; पण पत्रकार त्यांचे काम करत असतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी नाही का? राज ठाकरे यांनी खोटेपणाचा शिक्का मारला तर चालेल; परंतु त्यांचा मुद्दा खोडण्याचा कुणी प्रयत्न केला, तर नाही चालणार, खरे तर ते मराठी पत्रकारांचे लाडके नेते आहेत. त्यांचाही पत्रकारांचा चमू आहे, त्यांचा तेही वापर करीत असतात. मोदी सरकारने ज्या चुका केल्या, त्याची परतफेड जनता करेलही; पण त्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकारांवर आगपाखड करण्याची गरज नाही. आजही अनेक पत्रकार प्रामाणिकपणे त्यांचे काम करीत आहेत. त्यांच्यावर शिक्का मारण्याचे काम व्हायला नको.खरे तर राज ठाकरे हे मुद्द्याचे उत्तम मार्केटिंग करणारे फर्डे वक्ते आहेत. कोणता माल खपवायचा, कोणत्या मालाला नकार द्यायचा, नव्हे द्यायला लावायचा, याची त्यांना जाण आहे. त्यांच्या या गुणांमुळेच पहिल्या झटक्यात मराठी माणसांनी त्यांचे १३ आमदार निवडून दिले होते. नाशिक पालिकाही ताब्यात दिली होती. ती सत्ता टिकवून ठेवण्यात ‘मनसे’ला अपयश आले, ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी पक्षाचे अस्तित्वही जाणवत नव्हते. एककल्ली कारभार हीच मनसेची आजतागायत प्रतिमा राहिली आहे. जशी मोदींना पाहून लोकांनी मते दिली, त्यापूर्वी राज ठाकरेंच्या भाषणावर भारावूनच लोकांनी त्यांना मते दिली होती. सध्या त्यांच्या भाषणातून मोदी-शहा यांच्यावर वैयक्तिक खुन्नस असल्यासारखी टीका ते करीत आहेत. राजकीय भाषणाचा तो भाग असला, तरी केवळ दोन व्यक्तींना ठोकण्याशिवाय दुसरा कोणताच अजेंडा मनसेचा दिसत नाही. या भाषणांच्या यशापयशाची चर्चा २३ मेनंतर होईलच. त्या विश्लेषणातून काय निष्पन्न होईल, हे तेव्हा ठरेल; पण मृतप्राय झालेल्या मनसेला या लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ठळकपणे जनतेपुढे आणता आले, हे राज ठाकरेंचे यश म्हणावे लागेल.
राज ठाकरे, तुम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 10:03 PM