विधानसभेत केवळ एक आमदार निवडून आलेला, मुंबई महापालिकेतही फारसे बळ नाही, पक्षातले सगळे नेते विधानसभेत पराभूत झाले, जे निवडून आले ते दुसऱ्या पक्षातून, अशी सगळी नकारघंटा असतानाही मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात जाहीर सभा घेऊन गर्दीची गुढी हिमतीने उभारली. त्यामुळे राज काय बोलले याहीपेक्षा आॅक्टोबर २००९ नंतर शिवाजी पार्कवर भरगच्च सभा घेऊन त्यांनी स्वत:च्या अस्तित्वाची मजबूत जाणीव मात्र करून दिली आहे. स्वत:च्या पक्षात कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ, पक्षासाठी काम करायचे म्हणजे काय करायचे असे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या मनात, या पार्श्वभूमीवर झालेल्या जाहीर सभेमुळे हुरूप आल्याचे पदाधिकारी सांगत आहेत. काही अंशी मरगळ झटकण्याचे काम यानिमित्ताने राज यांनी यशस्वीपणे केले आहे. राज्यात विरोधी पक्षासाठी मोठी स्पेस आहे. राष्ट्रवादी पक्षात जयंत पाटील, धनंजय मुंडे असे काही नेते वगळले तर बाकीच्यांमध्ये घोटाळ्यांमधून बाहेर पडून भूमिका घेऊन उभे राहण्याची उभारी नाही. काँग्रेसमध्ये काय चालले आहे हे त्यांच्याच नेत्यांना कळेनासे झाले आहे आणि शिवसेना सत्तेत राहून करत असलेला खोटा विरोध लोकांनाही कळून चुकला आहे. या सगळ्यात विरोधकांसाठीची राज्यात चांगली स्पेस आहे, पण ती भरून काढणारा राज्यव्यापी नेता दुर्दैवाने कोणत्याही पक्षात नाही. राज ठाकरे यांना ही सुवर्णसंधी आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या राज यांच्या सभेने महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला आहे. आमच्या पक्षात नव्याने आलेल्यांना, पदं मिळालेल्यांना कालच्या सभेने हुरूप दिल्याचा दावा मनसेचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. दुसरीकडे मुंबई भाजपा-शिवसेनेत टोकाची भांडणे सुरू झाली आहेत. ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ अशी त्यांची अवस्था आहे. डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीशी भाजपाच्या नेत्यांचा संबंध असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला तो आरोप भाजपाला खोडता आलेला नाही. अॅड. आशिष शेलार आणि आदित्य ठाकरेंचा वाद सर्वश्रुत आहे. भाजपा सेना आपापसात भांडले नाहीत तर लोक त्यांना मुंबई महापालिकेत कोणती कामे केली असे प्रश्न विचारतील अशीही एक किनार त्यामागे आहे. मुंबईसाठी काय केले, याची समाधानकारक उत्तरे दोघांकडेही नाहीत. मोदींच्या स्वच्छ भारत योजनेचा पुरता बोजवारा भाजपा नगरसेवक, आमदारांच्याच मतदारसंघात उडालेला आहे. मुंबईत जागोजागी कचऱ्याचे ढीग नवे नाहीत. आम्ही करून दाखवले असे सांगायलाही नवे काहीच नाही. दोघे असेच भांडत राहिले की काय काम केले हे विचारण्याची सोयच राहत नाही. शिवाय भाजपा-शिवसेना एकमेकांच्या विरोधात उतरले तर दोघांच्याही जागा वाढतात असाही एक तर्क मांडला जात आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत आदित्य ठाकरेंना प्रोजेक्ट करायचे आहे. कदाचित आदित्यना महापौरपदाचा उमेदवार म्हणूनही पुढे आणले जाईल. परिणामी भाजपाकडे या नावाशी टक्कर देणारा दुसरा उमेदवार असणार नाही अशी खेळीही शिवसेना खेळण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातली भांडणे संपलेली नाहीत. दोन्ही काँग्रेस मिळून मुंबई पालिकेत नाकी दम आणता येईल एवढी ताकद असताना सगळे विखुरलेले आहेत. या सगळ्यात नव्याने जो कोणी समोर येईल, आक्रमक भूमिका घेईल, जे चालू आहे त्यापेक्षा वेगळे काही करेल त्याला संधी आहे. ही संधी पाडव्याच्या सभेने राज यांना चालून आली आहे.राज ठाकरे अॅक्सेसेबल आहेत, एखाद्या विषयावर बोलण्यासाठी ते जेवढ्या सहज उपलब्ध होतात ती सहजता उद्धव आणि आदित्यमध्ये नाही. या आणि अशा गोष्टींचा फायदा घेत राज पुढच्या काळात नेमके काय आणि कसे नियोजन करतात याकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.- अतुल कुलकर्णी
राज ठाकरेंच्या सभेचे गणित!
By admin | Published: April 11, 2016 1:51 AM