राज ठाकरे यांंनी उत्तर भारतीयांच्या सभेत केलेले भाषण परप्रांतीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. शिवाय आपल्या राज्यातल्या नेत्यांनाही अंतर्मुख करणारे आहे. अशी अभ्यासू भाषणे सगळे करू लागले, तर या राज्याचे भले होईल.परप्रांतीयांचे महाराष्टÑात येणारे लोंढे हा मुद्दा गेली अनेक वर्षे गाजतो आहे. १९९५ साली सत्तेवर येण्यासाठी मतपेटीवर डोळा ठेवून भाजपा-शिवसेनेने ४० लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरांचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मुंबईत मोफत घरे मिळतात, म्हणून उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून लोंढेच्या लोंढे मुंबईत आले. याचे महाराष्टÑाच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होतील, याचा विचारही त्या वेळी कोणी केला नाही. फुकट घराच्या लालसेपोटी वाट्टेल तेथे झोपड्या बांधल्या गेल्या. ज्यांना त्यातून घरे मिळाली, त्यांनी ती विकून पुन्हा नव्याने झोपड्या बांधल्या. ही गोष्ट राज्याला परवडणारी नाही, हे वास्तव ठामपणे सांगण्याची हिंमत एकाही राजकीय नेत्याने दाखविली नाही. परिणामी, आजच्या बकाल मुंबईला भाजपा-शिवसेनेचे ते धोरण जबाबदार आहे. मात्र, या लोंढ्यांच्या राजकारणातून मनसेला मोठे पाठबळ मिळाले. मनसेचा विरोध आणि त्यातून टीआरपीसाठी इरेस पेटलेल्या वाहिन्यांनी हा विषय देशभर नेला. परप्रांतीयांच्या विरोधात मनसेने केलेले खळ्ळखट्याक आंदोलन गाजले. महाराष्टÑात यायचे आणि इथल्याच लोकांना वाट्टेल ते बोलायचे, त्यांनाच गृहीत धरायचे, ही वृत्ती परप्रांतीयांमध्ये वाढीस लागली. त्यातूनच ‘सगळे परप्रांतीय संपावर गेले, तर मुंबई बंद पडेल,’ असे उद्दाम वक्तव्य संजय निरुपम यांनी केले. हा त्या वृत्तीचा उच्चतम बिंदू होता. या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन अस्खलित हिंदीतून जोरदार भाषण केले. त्यांच्या भाषणात संदर्भ होते, अभ्यास होता, राज्याविषयीची आस्था होती आणि परप्रांतीयांना त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन योग्य ती समज देण्याची धमकही होती. राजनी भाषणात मांडलेले सगळे मुद्दे व संदर्भ अचूक आणि बिनतोड होते. भूमिका स्पष्ट होती. महाराष्टÑात येऊन तुम्हाला मराठी आलेच पाहिजे, हा ठाम आग्रह होता. परराज्यातल्या नेत्यांनी स्वत:च्या राज्यात विकासाची कामे केली नाहीत, म्हणून हे लोंढे मुंबईत येत आहेत, हे वास्तवही त्यांनी मांडले. बिहारला बिमारु राज्य म्हणून केंद्र शासन भरघोस आर्थिक मदत करते. मात्र, त्या पैशांचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी कमी आणि नेत्यांची घरे भरण्यासाठी जास्त झाल्याने अनेक घोटाळे त्या राज्यात झाले. तीच अवस्था उत्तर प्रदेशची. या राज्यांनी स्वत:चा विकास केला असता, राजकीय उद्योगात स्वमग्न राहण्यापेक्षा राज्याला उद्योगधंद्यात आघाडीवर नेले असते, तर महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबले असते. मात्र, त्या राज्यातील नेत्यांच्या नकारात्मकतेमुळे अपमान सहन करत, पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत जाऊन राहण्याची वेळ तिथल्या लोकांवर आली. राज यांचा हा मुद्दा महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय आणि बिहारी नेत्यांना झोंबला पाहिजे. आपल्याच व्यासपीठावर येऊन एक नेता आपल्याच राज्यातल्या नेत्यांची जाहीर मापे काढतो, तरीही महाराष्टÑातील त्या राज्यांचे नेते मूग गिळून गप्प बसतात. कारण त्यांच्या राज्यांची अवस्था त्यांना माहिती आहे. त्यामुळेच तर ते नेते महाराष्टÑात आले व इथल्या राजकारणात रमले. त्यांना त्यांच्या राज्याविषयी आस्था असती, तर त्यांनी स्वत:ची राज्ये सोडून महाराष्टÑाची वाट धरली नसती. त्यामुळे राज यांनी त्यांच्यावर मुद्देसूदपणे वास्तवदर्शी टीका केली. ती ऐकून सगळ्यांनी पसंतीच्या टाळ्याही वाजविल्या. तुमच्या राज्याची ही अवस्था का झाली, हे त्या नेत्यांना विचारा, असे राज म्हणाले. त्याला राजकीय उत्तर देण्यापेक्षा त्या नेत्यांनी त्यांच्या राज्यांची अवस्था अशी का झाली, त्याला जबाबदार आपण आहोत का, याचे विवेचन केल्यास बरे. असेच अभ्यासू भाषण महाराष्टÑातील अन्य नेत्यांनी केले, तर त्यात राज्याचे भलेच होईल. राज यांच्या भाषणाचा परिणाम दीर्घकाळ टिकावा, आपल्या नेत्याचे विचार गावोगावी जावेत, असे ‘मनसे’ वाटणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज पक्षाकडे असावी लागते. त्यासाठी पक्षाचे मजबूत संघटन हवे असते. दुर्दैवाने राज यांच्याकडे ते नाही. राज यांचे अनेक सहकारी नेते पक्ष सोडून का गेले, याचे विश्लेषण होताना दिसत नाही. झाले असेल, तर त्यावरची कृती दिसत नाही. शेवटी कोणत्याही चांगल्या विचारांना तो पुढे नेणाºयांची गरज असते, फक्त भाषणांनी देश उभारता येत नाही. त्याला कार्यक्रमांचीही जोड लागते. याचाही राज यांनी विचार केल्यास राज्याला फायदाच होईल.
राज ठाकरेंचे भाषण परप्रांतीय नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 5:15 AM