- डॉ. रविनंद होवाळ (प्रवर्तक, शोषणमुक्त भारत अभियान)स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात होऊन गेलेल्या महान समाजसुधारकांच्या आणि राजकीय विचारवंतांच्या यादीत राजा राम मोहन रॉय यांचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेकांना पेलवणार नाही, इतका प्रगत विचार रॉय यांनी त्या काळात भारतीय समाजापुढे ठेवला. ते विचार भारतीय समाजजीवनाच्या विविध अंगांमध्ये योग्य त्या प्रमाणात उतरवण्यात आपण कितपत यशस्वी ठरलो आहोत, यावरूनच आपण आपले राष्ट्रीय यशापयश जोखले पाहिजे.नुकताच राजा राम मोहन रॉय यांचा स्मृतिदिन झाला. त्यांचा जन्म १७७२ मध्ये झाला होता. त्यांचे मूळ आडनाव बॅनर्जी असे असले, तरी बंगाल प्रांताच्या प्रशासकीय कार्यात त्यांच्या आजोबांनी दाखवलेल्या कर्तबगारीमुळे त्यांना रॉय ही सन्मानदर्शक पदवी बंगालच्या नवाबाने दिली होती. तीच पुढे राम मोहन यांच्या कुटुंबाचे आडनाव म्हणून वापरली गेली. मुघल बादशहा अकबर दुसरा याच्या वेतनवाढीसाठीचे एक निवेदन घेऊन राम मोहन हे वयाच्या अठ्ठावनाव्या वर्षी इंग्लंडला गेले होते. तिकडे जाण्यापूर्वी बादशहाने त्यांना राजा ही उपाधी बहाल केली. अशा प्रकारे राम मोहन बॅनर्जी हे राजा राम मोहन रॉय बनले. मात्र, ते इतिहासात अजरामर झाले, ते त्यांच्या काळाच्याही पुढे गेलेल्या विचारसरणीमुळे अर्थात द्रष्टेपणामुळेच!१८१८ साली सतीप्रथेच्या विरोधात प्रबंध लिहिणाऱ्या राम मोहन यांनी ब्रिटिश साम्राज्याला आपला नैतिक पाठिंबा व्यक्त केला होता. भारतातील तत्कालीन ब्रिटिश राजवटीविषयी त्यांनी असे लिहून ठेवले आहे की, ब्रिटिशांनी भारतात कायद्याचे राज्य आणून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित केली. कायद्यासमोर समानता आणली. पूर्वी अस्तित्वात नसलेले नागरी स्वातंत्र्य बहाल केले. शेती, व्यापार, वाहतूक, शिक्षण यांत सुधारणा केली. लोकांच्या आर्थिक स्थितीत परिवर्तन आणले. अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा दूर करण्यास मदत केली.लोकमान्य टिळकांपूर्वीच्या अनेक सुधारकांचे व राजकीय नेत्यांचे ब्रिटिशांबाबत हेच मत होते. मात्र टिळकांनी या सर्व बाबींना दुय्यम महत्त्वाचे ठरवून आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा पुरस्कार केल्यामुळे नंतरच्या काळात सामाजिक सुधारणा मागे पडल्या. आज भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे उलटली, तरीही भारतात सामाजिक सुधारणांना प्रथम स्थान प्राप्त झालेले नाही. जातीयता, अंधश्रद्धा, आर्थिक व सामाजिक विषमता यांसह अनेक वाईट गोष्टी अजूनही देशातून हद्दपार झालेल्या नाहीत. राम मोहन रॉय व त्यांच्यासारखे सुधारक त्यामुळेच आजही अत्यंत समयोचित ठरतात!परकीयांचे राज्य आता आपल्याला नको असले, तरी स्वकीयांतीलही वर्चस्ववाद्यांचे, जातीयवाद्यांचे, अंधश्रद्धा प्रसारकांचे आणि तत्सम इतर लोकांचे राज्य आता आपल्याला नको आहे. आपल्याला आता समतावाद्यांचे, विज्ञानवाद्यांचे व समन्वयवाद्यांचे राज्य हवे आहे. राम मोहन रॉय यांचे आणि त्यांच्यासारख्या इतर समतावादी महामानवांचे विचार त्यासाठी आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात!देशात कायद्याचे राज्य असावे; कायद्यासमोर सर्वांना समान लेखले जावे; लोकमताची कदर करून कायदेमंडळाने कल्याणकारी कायदे करावेत; विविध धर्मीयांसाठी समान कायदे असावेत; सर्वच धर्मांतील अनिष्ट प्रथा, परंपरा, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा यांचे कायद्यांच्या आधारे निर्मूलन केले जावे; कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना परस्परांच्या हस्तक्षेपापासून दूर ठेवले जावे; न्यायमंडळाचे कामकाज उघडपणे केले जावे; न्याय देण्यास विलंब लावू नये; लोकांच्या जीविताचे व संपत्तीचे संरक्षण सरकारने प्राधान्यक्रमाने करावे; स्वातंत्र्य, समता व बंधुता यांसारख्या तत्त्वांच्या आधारे देशात लोकशाही व्यवस्था निर्माण करावी; सतीची चाल, बालविवाह, बालहत्या, स्त्रीभ्रूणहत्या, यज्ञात बळी देणे समाजविघातक प्रथा-परंपरा नष्ट करण्याच्या अपेक्षा राजा राम मोहन रॉय यांनी त्या मागासलेल्या कालखंडातही व्यक्त केलेल्या आहेत.राम मोहन यांनी सुचवलेल्या सुधारणांतील काही सुधारणा भारतीय संविधानाने अनेक सुधारणांना समाजजीवनात प्रत्यक्षात लागू करून त्यांच्या पाठीमागे कायद्याचे भक्कम पाठबळ आता उभे केलेले असले, तरी त्यांची अंमलबजावणी मात्र अजूनही अपेक्षित गतीने व ताकदीने केली जात असलेली दिसत नाही. भारतातल्या विविध क्षेत्रांतील शोषण त्यामुळेच अजूनही मोठ्या प्रमाणात संपुष्टात आलेले नाही. त्यामुळेच अशा प्रकारचे शोषण संपवू इच्छिणारे राजा राम मोहन रॉय यांचे विचार आजही अत्यंत उपयुक्त आणि कालसुसंगत ठरतात!
समतावादी विचारांचे सच्चे पाईक : राजा राम मोहन रॉय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 5:29 AM