डाॅ. वसंत भोसले, संपादक, लोकमत कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आधुनिक समाजाची रचना आधुनिक मूल्यांसह झाली पाहिजे, यासाठी लढणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीरनगरीला गालबोट लावण्याची घाई कोणाला झाली आहे, याची चर्चा व्यापक पातळीवर झाली पाहिजे. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आपण साऱ्यांनी साऱ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून शाहूंच्या विचाराचा पराभव होणार नाही याची शपथ घ्यायला हवी !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा ३४९ वा दिन नुकताच साजरा करण्यात आला आणि उद्या, सोमवारी थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १४९ वा जन्मदिन साजरा करण्यात येत आहे. शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आधुनिक समाजाची रचना आधुनिक मूल्यांसह झाली पाहिजे, यासाठी लढणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीरनगरीला गालबोट लावण्याची घाई कोणाला झाली आहे, याची चर्चा व्यापक पातळीवर झाली पाहिजे. कोल्हापूरनगरीची अनेक रूपे आहेत. त्यात एक रूप शाहूनगरी आहे. तसेच कलानगरी, क्रीडानगरी, तीर्थनगरी, चित्रनगरी अशी अनेक रूपे आहेत. देशभर स्वातंत्र्याचा लढा चालू असताना छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणून एक क्रांती शाहू महाराज घडवून आणत होते. समाजाच्या सर्वांगीण विकासाचे एक आदर्श मॉडेल मांडून त्याचा अंमल करण्यासाठी संघर्ष करीत होते.
समाजाचे परिवर्तन करताना रेल्वे गाडीने रूळ बदलताना होणारा खडखडाट जसा असतो तसा समाजातही होण्याची अपेक्षा असते. तसा खडखडाट राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकाळात कोल्हापूर संस्थानात झाला. त्यांच्या जन्मवर्षाचे एकशे पन्नासावे वर्ष सुरू होत असताना याचे स्मरण याच्याचसाठी की, त्यांनी मांडलेला विचार, घेतलेले निर्णय, केलेला संघर्ष, उभा केलेला नवा समाज याचा एकत्र विचार केला तर आधुनिक भारताच्या विकासाचे ते मॉडेलच ठरते. त्याच मार्गाने जाण्याचा निर्धार केला तर संपूर्ण समाजाची उन्नती होईल. कोणी वंचित राहणार नाही, उपेक्षित राहणार नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी तत्कालीन समाजातील उणिवांवर बोट ठेवले. समाजाचा सर्वांगीण विकास का होत नाही, याचा शोध घेत घेत शिक्षणापासून सुरुवात करून नवी व्यापारपेठ वसविणे, आधुनिक कारखाने उभारणे यासाठी रस्ते, रेल्वे आदी पायाभूत सुविधा निर्माण करणे, असे निर्णय घेतले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जगभर जी स्थित्यंतरे होत होती, त्याचा साकल्याने विचार करून आपल्या कोल्हापूर संस्थानच्या प्रजेच्या हितासाठी जागतिकीकरणाची प्रक्रिया ते घडवून आणत होते. या सर्व प्रक्रियेला छेद देणारी जातीव्यवस्था, अंधश्रद्धा, धार्मिक आणि जातीय भेदाभेद आदींवर उपाय शोधून कृतिशील कार्यक्रम राबवित होते.
अशा गोष्टींना सनातन्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा समाजहितासाठी त्यांच्याशी दोन हात करण्याचा धाडसी निर्णयही घेतला. वास्तविक वेदोक्तप्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे हिंदू चाली, रितीरिवाज यांना प्रमाण मानून वागण्याचा आग्रह धरत असताना त्यांना सर्व हिंदू सकल समाजाचे भाग आहेत, या तत्त्वालाच तिलांजली देणारी भूमिका सनातन्यांनी घेतली. अन्यथा पुढील संघर्ष झाला नसता आणि सकल हिंदू समाजाला एकाच तत्वाने समान न्याय देण्याची भूमिका घेतली असती तर बरे झाले असते. पर्यायी छात्रगुरू नेमण्यापर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कडक भूमिका घ्यावी लागली नसती.
कोल्हापूरनगरी ही शाहूनगरी म्हणजे त्यांच्या विचारांची, परिवर्तनाचा, पुरोगामीत्वाचा स्वीकार करणारी नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. आधुनिक समाज घडविणारी ती एक राज्यकर्त्यांची भूमिका म्हणून पुढे आली. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थाने खालसा झाली तरी ही भूमिका मागे पडली नाही. आजही विविध पातळीवर नवी कारखानदारी, रेल्वे, महामार्ग, विमानतळ आदी पायाभूत विकासाचा विस्तार करण्याचा मार्ग त्याच शाहूंच्या विचाराने चालू आहे. तोच मार्ग आहे. तंत्रज्ञान नवे आले असेल, संशोधनातून उत्पादनाच्या साधनांमध्ये आमूलाग्र बदल झाले असतील, पण मार्ग तोच आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्याच्या प्रक्रियेचा भागदेखील राजर्षी छत्रपती शाहू महाराज होते.
कारण सर्वसमावेशक समाज निर्मिती करणारा विचारच पुढे जातो, हे त्यांनी मनस्वी स्वीकारले होते. आधुनिक शिक्षण, युरोपची प्रगती, विविध देशांत होत असलेली औद्योगिक क्रांती, आदींचा त्यांच्यावर प्रभाव झाला होता. परिणामी कोल्हापूरनगरीला आधुनिक रूप देण्याचा अखंड ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचा संघर्ष अंधश्रद्धेविरुद्ध होता, गरिबीविरुद्ध होता, शिक्षणासाठी होता. त्यामुळे त्यांनी प्रत्येक आघाडीवर प्रयोग केले. रचनात्मक तसेच संघर्षात्मक काम केले. तोच मार्ग स्वातंत्र्योत्तर काळातही भारताने स्वीकारला. त्यात कोल्हापूरला असा शाहू विचारांचा वारसा असल्याने सहकाराच्या माध्यमातून आणि शासनाच्या मदतीने अनेक कामे लोक सहभागातून उभी राहिली. आज जिल्ह्यातील एखाद्या नदीचा अपवाद (धामणी नदी) सोडला तर चौदा धरणे उभी राहिली आहेत.
महाराष्ट्राचे सरासरी सिंचन वीस टक्के असताना कोल्हापूरचा जवळपास सारा परिसर सिंचनाखाली आहे. उद्योगविश्वात नवीन प्रयोग झाले. कलेची साधना सतत होत राहिली. कुस्तीची रांगडी स्पर्धा होत राहिली. या साऱ्या परंपरेचा अभिमान बाळगून नवी आव्हाने स्वीकारण्याऐवजी कोणी औरंगजेबाचे उदात्तीकरण करते हे शाहूनगरीला शोभते का? त्यावरून सामाजिक तणाव तयार होऊ शाहूनगरीविषयी चुकीचा संदेश जगभर जातो आहे. शाहू विचाराने चालणाऱ्या कलानगरीत असे घडलेच कसे, असा विचार करून राष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी धावत आले होते. कोणाला तरी शाहू विचारांचा पराभव करावा, असे वाटत असणार आहे.
अशा वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर छत्रपती संभाजीनगरात जावून औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतात. हा सामाजिक बेजबाबदारपणा झाला. हिंदवी स्वराज्याचा लढा हे केवळ युद्ध नव्हे, नव्या समाजाची रचना करणारी विचारधारा होती. अठरापगड जातीचे मावळे त्यासाठी लढत होते. हीच संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक पातळीवर संघर्ष करीत राज्य घटनेतून मांडली. अठरापगड जाती आणि सर्वधर्मीयांना समान हक्क, न्याय आणि विकासाची संधी देण्याचे तत्त्व स्वीकारले. शिवरायांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणारी ती भूमिका होती. त्यासाठी ज्या औरंगजेबाविरुद्ध लढत होते त्या औरंगजेबाचा अशा पद्धतीने स्वाभिमान दाखवून देणे किती गैर आहे? हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांच्या विरुद्ध ते लढत होते त्यांच्या कबरीचे दर्शन घेऊन समाजात तणाव निर्माण करण्याचे काही कारण आहे का? की शाहू विचारांचा पराभव करू पाहणाऱ्यांना बळ द्यायचे आहे?
काही समाजकंटकांनी स्टेट्सच्या नावाखाली बेजबाबदार, विकृत कृत्य केले असेल तर त्याची सजा साऱ्यांना कशी द्यायची? त्यासाठी समाजाला वेठीस धरणे योग्य आहे का? कोल्हापूरनगरी शाहूनगरी म्हणजे नव्या विचारांची कास धरणारी नगरी असेल तर तिला सनातनवादी नगरी करण्याची वल्गना करण्याची गरज तरी कशासाठी? कोल्हापूरची ही ओळख नाही. कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. तो अधोरेखित करणाऱ्या खुणा पावलोपावली दिसतात. अंबाबाई मंदिरात दिसतील, टाऊन हॉलमधील चिमासाहेबांच्या पुतळ्यात दिसतील. पावनखिंडीत तो स्वराज्यासाठी धारातीर्थी पडणाऱ्यांच्या शौर्यात दिसतील. अशा कितीतरी पाऊलखुणांच्या मार्गाने जाण्याची संधी सोडून स्टेट्सचा खेळखंडोबा जाणीवपूर्वक करून समाजाच्या उन्नतीचा महामार्ग उद्ध्वस्त करण्यासाठी का आपण सरसावावे? शाहू जयंतीनिमित्त आपण साऱ्यांनी साऱ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून शाहूंच्या विचाराचा पराभव होणार नाही याची शपथ घ्यायला हवी !