प्रभुजी कृपा करा आणि एकदा नागपूर - मुंबई व्हाया औरंगाबाद असा नंदीग्राम_एक्सप्रेसने प्रवास करा. ही विनंती यासाठी की आजच आपली एक घोषणा वाचली. ‘आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा पुढील महिन्यात शुभारंभ’- रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा. ४०० कि.मी. ताशी वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे म्हणे. परवाच २१ जुलैला मराठवाडा एक्स्प्रेसने औरंगाबाद ते नांदेड प्रवास केला. २५० कि.मी. अंतर जाण्यासाठी पाच तास लागले. एक तास उशिरा पोहोचलो. २२ जुलै रोजी नंदीग्रामने परतीचा प्रवास केला. राज्याची राजधानी आणि उपराजधानी जोडणाऱ्या या रेल्वेने औरंगाबादला परत एकदा तासभर उशीराच पोहोचलो. मी वातानुकलीत प्रथम श्रेणीच्या डब्यात होतो. नंदीग्राममधील सहप्रवासी मुंबईचे एक व्यावसायिक बलदेवसिंग पत्नीसह गुरुतागद्दी समोर मथ्था टेकून परत निघाले होते. ते दर महिन्याला दर्शनासाठी नांदेडला येतात. त्यांचा अनुभवही क्लेशदायी होता. स्वच्छतागृहात पाणी नाही. ते इतके अस्वच्छ की तिथे पाय ठेवणे अशक्य. ही जर प्रथम श्रेणीची अवस्था असेल तर जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांचे हाल काय असतील? विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. त्यासाठी आपण स्वच्छता सेस ही देतो. रेल्वे डब्यातील अस्वच्छता आणि कासवगतीने चालणाऱ्या नंदीग्राम आणि मराठवाडा एक्सप्रेस, हे रेल्वे मंत्रालयासमोरील मोठे आव्हान आहे. तेव्हा प्रभुजी माफ करा. घोषणेच्या बरोबर जमिनीवरचेही निरीक्षण करा. आपण अभ्यासू म्हणूनच आग्रहाची विनंती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शुभेच्छा.(राजेंद्र दर्डा हे लोकमतचे एडिटर-इन-चीफ आहेत.)
बुलेट ट्रेनची पायाभरणी सप्टेंबरमध्ये - सुरेश प्रभू
नवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचा पायाभरणी समारंभ पुढील महिन्यात होणार असून, त्या समारंभाला जपानचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.या मार्गाला १ लाख १0 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ही बुलेट ट्रेन २0२३ पर्यंत सुरू होईल, असेही ते म्हणाले. या रेल्वे प्रकल्पासाठी अतिशय कमी व्याजाचे कर्ज जपानने देऊ केले आहे.४००० कर्मचाऱ्यांना जपानतर्फेच विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई-दिल्ली, चेन्नई-मुंबई, कोलकाता मुंबई, दिल्ली-चेन्नई व दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी ३५0 किलोमीटर वेगाने धावणारी गाडी सुरू करण्यासाठी अभ्यास सुरू झाला आहे, असेही प्रभू म्हणाले.दिल्ली, कानपूर, चंदीगड, नागपूर-सिकंदराबाद, मुंबई-गोवा आणि नागपूर-बिलासपूर या मार्गांवर ताशी १६0 ते २५0 किमी वेगाने धावणा-या गाड्या सुरू करणार. बुलेट ट्रेनबाबत मागील सरकारने जपानशी बोलणी सुरू केली. त्याला आमचे सरकार आल्यावर वेग आला, असे ते म्हणाले.