- धनाजी कांबळे । वरिष्ठ उपसंपादक, लोकमतराजगृह वास्तू नव्हे, ऐतिहासिक ठेवा आहे. कोट्यवधी भारतीयांच्या काळजावर कोरून ठेवलेला राजमुकुट आहे. अंधाऱ्या वस्तीत उजेड पेरणा-या मानव कल्याणाची प्रकाशज्योत इथेच निर्माण झाली आणि हजारो वर्षांपासूनच्या गुलामगिरीला सुरुंग लावला गेला. महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या तिसºया अधिवेशनातील ऐतिहासिक कामगिरी बजावून भारतात आले. मुंबईत आल्यावर परळ येथील पोयबावाडीच्या सिमेंटच्या चाळीत ते राहत. तब्बल २५ वर्षे ते या चाळीत राहत होते.अंगबळापेक्षा ज्ञानबळ असणे महत्त्वाचे आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. जगातल्या कोणत्याही ग्रंथालयाच्या तोडीचे ग्रंथालय आपल्या संग्रही पाहिजे, असे त्यांना वाटत असे. ज्ञानाची मक्तेदारी एका वर्गाकडे असताना बाबासाहेबांनी ज्ञानाच्या लढाईतील एखाद्या किल्ल्याप्रमाणे राजगृह उभे केले. त्यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज काढले. जानेवारी १९३४ मध्ये काम पूर्ण झाले. बाबासाहेबांनी दामोदर हॉलमधून आपले ग्रंथालय राजगृहात हलवले आणि सहकुटुंब ते इथे राहण्यासाठी आले.
बाबासाहेबांच्या जीवनात राजगृहाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, कायदा, संरक्षण, राज्यशास्त्र, चरित्रे, आत्मचरित्रे, परदेश नीती, बालशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, युद्ध, राज्यघटना, चलन, मानववंशशास्त्र असे वेगवेगळे विभाग करून राजगृहात पुस्तकांची मांडणी केली होती. कोणीही विद्वान, गर्भश्रीमंत, भांडवलदार एवढेच काय एखादा राज्यकर्ता, बादशहादेखील थक्क होईल, एवढी हजारो पुस्तके बाबासाहेबांच्या ग्रंथालयात होती. पंडित मदनमोहन मालवीय यांनी हे ग्रंथालय पाहिल्यानंतर कित्येक लाख रुपयांना त्यांनी विकत मागितले. परंतु, बाबासाहेबांनी नकार दिला. बाबासाहेब म्हणाले, ‘तुम्ही तर माझी शक्तीच विकत घ्यावयास मागता, ती मी कशी देईन?’ या प्रसंगावरून बाबासाहेब आणि राजगृहातील ग्रंथालयाचे नाते स्पष्ट होते. गौतम बुद्धांच्या जीवनातील एक महत्त्वाचे धम्मस्थळ म्हणजे राजगृह. या स्थळातून व या नावातून बाबासाहेबांना धम्म इतिहासाची स्फूर्ती मिळत होती, त्यामुळे त्यांनी राजगृह हे नाव निवडले, असे बी. सी. कांबळे यांनी समग्र आंबेडकर चरित्रात लिहिले आहे.
बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथालयास एखाद्या पॉवर हाऊसचे स्वरूप दिले होते. जगातील अस्सल ज्ञानभांडार त्यांनी राजगृहात मोठ्या काळजीने संग्रहित केले. चैैत्यभूमीवर आलेले अनुयायी दरवर्षी राजगृहालाही भेट देतात. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूचे दर्शन घेतात. याच राजगृहासमोर कुणा माथेफिरूने तोडफोड केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी अस्मितेच्या प्रतिकांवर हल्ला केला जातो. किंबहुना राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण केली जाते. अशावेळी आंबेडकर कुटुंबीयांनी दाखवलेला संयम आणि घेतलेली संयत भूमिका महत्त्वपूर्ण म्हणायला हवी. कुणाच्याही सत्ताकांक्षेसाठी बहुजन समाजाने बळी का जायचे? या दूरदृष्टीने घेतलेला निर्णय साकल्याचा ठरला आहे. या दरम्यान समाजमाध्यमांवर दोन प्रवाह दिसले. ज्यात सरकारी मालमत्तेचा मुद्दा होता. मुळात आतापर्यंत जे लोक वारसाहक्काने हजारो एकर शेती, धनदौलत, संपत्ती स्वत:कडे घेऊन बसले आहेत, त्यांच्या मालमत्तांचा प्रश्न याआधी कुणी उपस्थित केल्याचे वाचनात आले नाही. बाबासाहेबांनी जी हजारो पुस्तके संग्रही ठेवली, त्यांचे डिजिटालायजेशन करणे, पुस्तकांचे जतन करणे याबद्दल कुणी काही केल्याचेही दिसले नाही. स्वत:चे झाकून ठेवून दुसºयाकडे बोट दाखवणाºया काही प्रवृत्ती या निमित्ताने उजेडात आल्या.
राजगृह तत्त्वज्ञानगृह आहे. त्याची जपणूक करण्याची जबाबदारी जशी कुटुंबीयांची, समाजाची आहे, तशीच ती सरकारचीदेखील आहे. मानवी जीवनाच्या व्यवस्थांतराची धगधगती प्रयोगशाळा म्हणजे राजगृह...इतर सत्ता येतात आणि जातात, पण ग्रंथसत्तेचा सूर्य उगवतो आणि कधीच अस्ताला जात नाही. उजेडाची क्षितिजे निर्माण करणाºया जगातल्या सर्वच ग्रंथांचे संघटित निवासस्थान म्हणजे राजगृह...असे प्रसिद्ध कवी यशवंत मनोहर म्हणतात. यातून या दुष्ट प्रवृत्तींनी बोध घ्यावा. राजगृहातील पुस्तके ही भारतीय समाजाची मिळकत आहे. प्रत्येकाने हा वारसा जतन केला पाहिजे. जमलं तर स्वत:च्या आयुष्यात वृद्धिंगत केला पाहिजे. नालंदा, तक्षशिलाप्रमाणे हा अमूल्य ठेवा भारतीय संस्कृतीची ओळख आहे. विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही, तेव्हा प्रतिकांवर हल्ले केले जातात. मात्र, कुणी कितीही हल्ला केला तरी भीमाचा किल्ला आजही मजबूत आहे आणि उद्याही राहील...