- आचार्य डॉ. लोकेश मुनी(संस्थापक, अहिंसा विश्व भारती, नवी दिल्ली)
बांग्लादेश, अफगाणिस्तान, इराक, इराण, सिरीया या देशांसह जगात अनेक ठिकाणी अस्वस्थता असताना सर्वत्र सौहार्दाचा दृढ संदेश जाण्याची आवश्यकता आहे. बंधुत्व, एकतेच्या विचारांवर सर्व जगाने चालण्याची गरज आहे. आपण भारत देशात जन्म घेतला. जैन परंपरेत भगवान महावीरांचे अनेकांत दर्शनाचे विचार व संस्कार मिळाले हे आपले सौभाग्य आहे. आपण आपल्या अस्तित्वासह दुसऱ्यांचे अस्तित्वदेखील मान्य केले पाहिजे. आपल्या विचारांप्रमाणे इतरांच्या विचारांचादेखील आदर करायला हवा. त्याहून पुढे जात मी तर हे म्हणतो की, आपण आपल्या धर्माचे प्रामाणिकपणे पालन करावे, परंतु इतर पंथांचादेखील आदर केला पाहिजे. यातूनच अहिंसा धर्माचा खरा शुभारंभ होईल.
धर्म व संप्रदाय एक नाहीत. धर्म हा फळाचा रस आहे, त्याच्या सुरक्षेसाठी असलेले कवच म्हणजे संप्रदाय! आपला देश धर्मनिरपेक्ष नाही तर पंथनिरपेक्ष आहे. माझा धर्म, माझा विचार श्रेष्ठ असे दावे सुरु झाले की प्रश्न उभे राहतात. अफगाणिस्तान-बांग्लादेशमधून जेव्हा धर्मपरिवर्तन करा वा निघून जा, असा फतवा निघतो, तेव्हा हा आततायीपणा प्रकर्षाने जाणवतो. मानवता हा अंतरात्मा. आपण त्यालाच धर्म म्हणायला हवे. हिंदू किंवा मुसलमान हा विचार फार नंतरचा आहे. धार्मिक उन्मादाला त्यात थारा नाही. जेथेदेखील सत्य व सकारात्मकता असेल त्यासोबतच धर्माचार्यांनी राहायला हवे. जेथे असे चित्र नसेल अशा लोकांना धर्माचार्यांनी सहकार्य करता कामा नये.
जैन धर्मात सम्यकदर्शनाला महत्त्व आहे. जशी आपली दृष्टी असते तशा सृष्टीची निर्मिती होते. त्यामुळेच लोकांनी आपला दृष्टीकोन व जगाकडे पाहण्याची नजर बदलली पाहिजे. एक व्यक्ती एकदा जत्रेत जाते. त्या जत्रेत बोलणारा एक पक्षी असतो. त्याचा मधूर चिवचिवाट ऐकून हिंदू व्यक्तीला वाटते, तो पक्षी म्हणतो आहे ‘राम लक्ष्मण दशरथ’, मौलवीना वाटते त्या पक्ष्याच्या चिवचिवाटाचा अर्थ आहे ‘सुभान तेरी कुदरत’... एक मसाले विक्रेता म्हणतो, हा पक्षी नक्की ‘हल्दी, मिरची ढक रख’ म्हणतोय... भाजी विक्रेत्याला वाटते, पक्षी म्हणतो आहे, ‘गाजर, मुली, अदरक’ तर पहेलवानाला वाटते ‘दंड, मुद्गल, कसरत’... थोडक्यात काय, जे आपल्या मनात आहे, तेच अनेकदा ऐकू येते! जशी दृष्टी; पर्यायाने तशीच सृष्टी बनते. त्यामुळे सकारात्मक विचार व विधायक भाव वृद्धिंगत होण्याची आवश्यकता आहे. नकारात्मकता सोडली तर सृष्टी आणखी सुंदर बनू शकते.
युद्ध, हिंसा, दहशतवाद हे कुठल्याही समस्येचे उत्तर नव्हे. सकारात्मक संवाद व अहिंसेच्या मार्गाने प्रत्येक समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. कोरोनाकाळात आपल्या देशाच्या महान सनातन परंपरेचे महत्त्व जगाच्या लक्षात आले. संयमाधारित जैन जीवनशैली किती सखोल, उपयोगी व भविष्याचा दृष्टीकोन असलेली आहे, ही बाब जगाला पटली आहे. आयुर्वेद, योग, प्राणायाम, संयमाधारित जीवनशैली यामुळे कोरोनात देशाचा मृत्यूदर कमी आहे. अशा परिस्थितीत सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित बसून संवाद केला पाहिजे. चार पावले का होईना पण सोबत चालण्याचा संकल्प केला पाहिजे. प्रत्येकाने पुढाकार घेतला तर हे सहज शक्य आहे. तसे तर अंतरातून अंतर वाढत जाते, मात्र कधी तरी स्वत:शी संवाद व भेट व्हायला हवी.
बात सरल, बलिदान कठीन है,पतन सहज, उत्थान कठीन है..गाता है खंडहर का हर पत्थर,ध्वंस सरल निर्माण कठीन है..आयुर्वेद, योग-प्राणायाम, संयम यावर आधारित जीवनशैली पुन्हा प्राप्त करा. बोलणे सोपे आहे आणि कृती कठीण. म्हणूनच ती कृती सुकर व्हावी, असे प्रयत्न गरजेचे आहेत.
(शब्दांकन : योगेश पांडे, नागपूर)