लोकसभा निवडणुकीची चाहूल लागताच अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे हाकारे-पिटारे करून रान उठविणे सुरू झाले आहे. ज्याला ‘हिंदू परिवार’ अशा भ्रामक नावाने ओळखले जाते त्यातील पिलावळ गावोगावी राम मंदिरासाठी टाहो फोडू लागली आहे. या सर्वांचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी यावरून पहिली टीका केली होती. त्यानंतर राम मंदिराचा विषय पद्धतशीरपणे तापविणे सुरू झाले. मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही रामभक्तीचा तीव्र अॅटॅक आला. तुम्ही मंदिर बांधणार नसाल तर आम्ही बांधू, असा मोदींना लटका दम भरत ते सहकुटुंब अयोध्येची तीर्थयात्राही करून आले.कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयाग तीर्थावर साधू-संतांची जत्रा भरली. त्यातही पापक्षालन आणि मोक्षाचे विषय गंगार्पण करून राम मंदिराचेच गुऱ्हाळ चालविले गेले. त्यातच द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी, सरकारने काही करण्याची वाट न पाहता, येत्या २१ फेब्रुवारीपासून अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू करण्याची घोषणा करून टाकली. विश्व हिंदू परिषद नावाच्या सर्व हिंदूंच्या वतीने मक्ता घेतलेल्या संघटनेने या मंदिर आंदोलनाचे स्वयंघोषित यजमानपद घेतले आहे. हा सर्व गदारोळ सुरू असताना आपणही काही तरी करत आहोत हे मोदी सरकारने दाखविणे गरजेचे होते. त्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला. अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या सभोवतालची संपादित केलेली ६७ एकर जमीन मूळ मालकांना परत देण्याची मुभा सरकारला हवी आहे. वादग्रस्त जागेसह या अतिरिक्त संपादित जागेवर न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश आहे. शिवाय तेथे शिलान्यासासह कोणताही धार्मिक विधी करण्यासही मनाई आहे. सरकारला ही बंधनेही शिथिल करून हवी आहेत. या अतिरिक्त संपादित जमिनीपैकी ४२ एकर जमीन रामजन्मभूमी न्यासाची आहे.गेल्या निवडणुकीत मोदी सत्तेवर येण्यात उत्तर प्रदेशने केलेल्या चमत्काराचा मोठा वाटा होता. या वेळी हा चमत्कार पुन्हा होईल, याची शाश्वती वाटत नाही. त्यामुळे हिंदू मतांचे केंद्रीकरण करण्यासाठी राम मंदिराचा वन्ही पुन्हा चेतविला जात आहे. पण हा निव्वळ राम मंदिराच्या नावाने टोप्या घालण्याचा धंदा आहे, हे चाणाक्ष मतदारांनी ओळखायला हवे. यातील ग्यानबाची मेख लक्षात घ्या. हिंदूंना उल्लू बनविण्यासाठी गेली २५ वर्षे जी ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची आवई उठविली जात आहे त्यातील ‘वहीं’ हा शब्द महत्त्वाचा आहे. ‘वहीं’ याचा अर्थ पूर्वी बाबरी मशीद जेथे होती त्याच जागेवर. सध्या सुरू असलेल्या कोलाहलाचा या ‘वहीं’शी सूतराम संबंध नाही. बाबरी मशीद जेथे होती तीच प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच जागेवर राम मंदिर उभारण्याचा अट्टाहास आहे. पण नेमक्या याच जागेच्या मालकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. तो सुटत नाही तोपर्यंत ‘वहीं’ मंदिर उभारणे शक्य नाही. दुसरे असे की, मंदिर उभारणीसाठी स्वत:हून पालखीचे भोई होण्यासाठी जे हिरिरीने पुढे येत आहेत त्यांच्यापैकी कोणीही न्यायालयात पक्षकार नाही. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल दाव्यातील हिंदू पक्षकारांच्या बाजूने झाला तरी त्यांच्या जागेवर हे स्वयंभू कंत्राटदार मंदिर कसे उभारणार, हाही प्रश्नच आहे.दुसरा प्रश्न आहे संपादित केलेल्या अतिरिक्त जमिनीचा. न्यायालयाने परवानगी दिली व ही जमीन जरी उद्या रामजन्मभूमी न्यासाला परत मिळाली आणि तेथे मंदिर बांधायचे म्हटले तरी ते मंदिर ‘वहीं’ बांधले जाणार नाही. बाबरी मशिदीची नेमकी जागा सोडून इतरत्र मंदिर बांधण्यात काहीच हशील नाही. तशी देशात गावोगावी रामाची मंदिरे आहेतच. मर्यादा पुरुषोत्तम राम पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेले. जन्मस्थळी मंदिर नव्हते म्हणून महात्म्य जराही कमी न होता रामाचे हिंदूंच्या मनात अढळ स्थान आहे. त्यामुळे रामावरील श्रद्धेचा त्याच्या जन्मस्थळी मंदिर असण्या व नसण्याशी काहीही संबंध नाही. भगवान श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात झाला. मथुरेतील श्रीकृष्णाचे मंदिर त्या कारागृहाच्या ठिकाणी नाही. तरी श्रीकृष्णाचे देवत्व अबाधित आहे. त्यामुळे या दैवतांचा राजकारणी मतांसाठी चलनी नाणे म्हणून वापर करीत आहेत, हे सुज्ञ मतदारांनी ओळखायला हवे.
पुन्हा राम मंदिराची टोपी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:53 AM