- राम सुतारख्यातनाम शिल्पकार
वयाच्या ९७व्या वर्षीही कार्यरत असणारे जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेल्या संवादाचा संपादित अंश.
आपले बालपण गरिबीत गेले. आज तुमच्याकडे यश आणि पैसा दोन्ही आहे. या प्रवासाकडे कसे बघता? माझे वडील सुतार होते. कुटुंबात चालत आलेले काम मी पुढे नेले. पुढे त्या रोपट्याचे झाड झाले, त्याला फांद्या फुटल्या, फुले-फळे लागली. बस आणखी काय?
आपण चांगली चित्रे काढता, मग आपण शिल्पकार होणे का पसंत केले? प्रत्येक शिल्प तयार करण्याच्या आधी रेखाचित्र तर काढतोच. मी पुष्कळ चित्रे काढली आहेत. पण सर्वाधिक आनंद शिल्प तयार करण्यात मिळाला.
आपली शिल्पं देहबोलीतून तर संवाद साधतातच, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आपण कसे पकडता? जर समोरची व्यक्ती हसली तर तिच्या चेहऱ्याच्या मांसपेशी कशा काम करतील आणि रागावली तर या मांसपेशी कशा वळतील, याची कल्पना मी करतो. त्यातूनच हावभाव तयार होतात आणि बदलतात.
गांधीजींची तुमची बहुतेक शिल्पं ध्यानमुद्रेतच का? त्यांच्या जीवनाला इतर अनेक पैलू होते. गांधीजींचे माझे पहिले शिल्प हसरेच होते, परंतु संसदभवनात स्थापित करण्यासाठी सरकारला ध्यानमुद्राच पाहिजे होती. आज जगातील ५०हून अधिक देशात मी तयार केलेली गांधीजींची हीच मुद्रा बसवली आहे. शांती आणि अहिंसेचे ते प्रतीक आहे.
आपल्या जीवनातील सर्वात चांगला, सर्वात वाईट काळ कोणता? मी वर्तमानात जगतो. घडून गेलेल्या गोष्टींचे सुख-दुःख बाळगत नाही आणि भविष्याची चिंता करत नाही. जे झाले ते झाले. पुढचा विचार काही करायचा नाही. यामुळे मला जीवनातला सगळाच काळ चांगला वाटतो.
कोणते शिल्प तयार करताना अडचणी आल्या? मला शिल्प तयार करताना आनंद मिळतो. जे काम आपल्याला आवडते त्यात कधीच अडचण येत नाही.
आपल्या कल्पनेत असलेले, पण अजून प्रत्यक्षात न उतरलेले एखादे शिल्प आहे काय?मी गांधींच्या एका शिल्पाची कल्पना केली होती. जिच्यात ते दोन मुलांबरोबर आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाच्या हातात शांततेचे प्रतीक कबूतर आहे आणि मुलीच्या हातात समृद्धीचे प्रतीक फूल. हे शिल्प अजून बाकी आहे. शिवाय मुंबई आणि पुण्याच्यामध्ये एक डोंगर कापून शिवाजी महाराजांचे चरित्र कोरण्याचा विचार आहे. एक - दोनदा बोलणी झाली आहेत. महाराष्ट्र सरकार या प्रस्तावाला कधी मंजुरी देते ते बघायचे.
अफगाणिस्तानातील बामियान, अमेरिकेतील माऊंट रुश्मोर स्मारक किंवा अजिंठा-वेरूळसारखे काही करण्याचा विचार आहे काय? मी सुरुवातीला अजिंठा - वेरूळमध्येच काम केले. काही गुंफा अपुऱ्या होत्या. त्यातील एकात गांधीजींचे शिल्प तयार करण्याचा विचार केला होता. गुजरातमधील केवडियात उभारलेल्या सरदार पटेलांच्या शिल्पाचे डोके माऊंट रुश्मोरमधील राष्ट्रपतींच्या डोक्यापेक्षा दहा फूट मोठे आहे. आणखी काय पाहिजे? शिवाय भारतात त्याप्रकारच्या खडकासारखे पहाडही नाहीत.
आपण तयार केलेल्या हजारो शिल्पांमधील आपल्याला सगळ्यात जास्त कोणते आवडते? मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर तयार होत असलेल्या गांधीसागर धरणावर उभी असलेले चंबळची शिल्प. त्याचे एक कारण आहे. केवळ ३५ वर्षांचा असताना मी हे काम केले. ते फक्त दहा हजार रुपयात चंबळचे सात फूट उंच शिल्प मागत होते. तिथे पोहोचल्यावर मला वाटले, इतके छोटे शिल्प दूरवरुन दिसणार नाही. ते जास्त पैसे द्यायला तयार नव्हते. मी तेवढ्याच पैशात एकट्याने एक वर्षात हे ४५ फूट उंचीचे चंबळ देवीचे शिल्प तयार केले. त्यांनी फक्त काँक्रीट दिले. त्याचा पहाड तयार करुन छिन्नी हातोड्याने हे शिल्प मी कोरुन काढले. धरणाच्या ठेकेदाराने छिन्नीला धार काढण्यासाठी फक्त एक माणूस दिला होता. मी दररोज त्या काँक्रीटच्या पहाडावर चढून संध्याकाळपर्यंत काम करत राहायचो. दोन राज्यांमधल्या सहयोगाचेही हे शिल्प प्रतीक असल्याने त्याचे ‘भाईचारा’ ठेवले. माझ्यासाठी कामाला महत्त्व होते, पैशाला नाही.आपण अडीचशे-तीनशे मीटर उंचीचे जगातील सर्वांत मोठे शिल्प तयार करता आहात. इतकी मोठी शिल्पं सटीक कशा तयार करता? पहिल्यांदा स्टुडिओमध्ये मातीचे मॉडेल तयार करतो. स्टायरोफोमचे मोठे मॉडेल करतो. नंतर संगणकावर त्याचे माप मोठे करत जातो. नंतर शिल्पाचे वेगवेगळे भाग फाउंड्रीत टाकले जातात. ते जोडून शेवटी मोठे शिल्प तयार केले जाते.