सार्वत्रिक निवडणुकांच्या जाहीर सभा, मेळावे, मिरवणुका असतात. आता त्यांना ‘राेड शाे’ आणि रॅम्पवर चालण्याचे स्वरूप आले आहे. कार्यकर्त्यांच्या केडरच्या मतानुसार निर्णय हाेत असत. काँग्रेसमध्ये तर याची माेठी परंपरा हाेती. जिल्हा काँग्रेस समितीने पाठविलेली उमेदवारांची यादी शक्यताे बदलली जात नसे. प्रदेश पातळीवर केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत तीच यादी कायम राहायची. कम्युनिस्ट पक्षाचे नेते त्याहूनही अधिक कडवट असायचे. पक्षाच्या पाॅलिट ब्युराेचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरील रेषच! त्यात काेणताही बदल व्हायचा नाही. पक्ष कार्यकर्त्यांनी ताे निर्णय शिरसावंद्य म्हणून कामाला लागायचे!
पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण नेहमी असेच तप्त असते. कदाचित डाव्या आघाडीच्या चाैतीस वर्षांच्या राजवटीचा परिणाम असेल. ती राजवट संपविण्याचे धारिष्ट्य काँग्रेसने कधी दाखविले नाही. परिणामी नाराज झालेल्या काँग्रेस नेत्या ममता बॅनर्जी युवा असतानाच बंडाची भाषा वापरून आक्रमक राजकारण करीत हाेत्या. डाव्यांना विराेध करताना सर्वसामान्य माणसांच्या वेषभूषा करून त्या मैदानात उतरत हाेत्या. अनेक वर्षे सत्तेवर राहूनही त्यांनीही साधी राहणी साेडली नाही. भावनिक तथा राजकीय सजग असलेल्या बंगाली माणसाला त्यांचे राजकारण भावले. त्यांनी प्रसंगी भाजप आघाडीची साथ केली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सहभागीदेखील झाल्या. डाव्या आघाडीविराेधातील लढाई त्यांनी सुरू ठेवली. काँग्रेस आणि भाजपला जमले नाही ते त्यांनी एकहाती करून दाखविले. डावी आघाडी पार तळाला जाऊन बसली आहे.
आता मुख्य लढत तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी हाेत आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूकदेखील तशीच हाेणार आहे. देशपातळीवर भाजपविराेधात भक्कम आघाडी व्हावी, यासाठी आग्रही असणाऱ्या ममतादीदी यांनी पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व ४२ लाेकसभा मतदारसंघांचे उमेदवार नाट्यमयपणे जाहीर करून टाकले. काेलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर झालेल्या प्रचंड माेठ्या जाहीर सभेत बाेलताना ४२ उमेदवारांसह ममतादीदी स्वत: रॅम्पवर चालत आल्या. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची चिंता न करता नाट्यमय पद्धतीने ४२ उमेदवार जाहीर केले. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीररंजन चाैधरी यांच्यासह दाेनच खासदार मागील निवडणुकीत विजयी झाले. चाैधरी हे लाेकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. त्यांच्या बेहरामपूर मतदारसंघात माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. पठाण मूळचे गुजरातचे आहेत. उत्तम किक्रेटपटू असलेल्या युसूफ पठाण यांना चाैधरी यांच्याविराेधात उभे करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी पाच विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. साेळा जणांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये बारा महिला, राज्यातील दाेन मंत्री आणि नऊ आमदारांचा समावेश आहे. शिवाय मेघालयात माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांनी तशी कृती केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या घडामाेडींवर बाेलताना अद्याप चर्चा हाेऊ शकते, अशी भाबडी आशा व्यक्त केली आहे. इंडिया आघाडीमधील जागावाटप लवकर करावे, अशी मागणी ममता बॅनर्जी अनेक दिवसांपासून करीत हाेत्या, तर पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते किमान दहा जागा साेडाव्यात, अशी मागणी करीत हाेते. ममता बॅनर्जी यांनी गत निवडणुकीत विजयी झालेल्या दाेनच जागा देण्याची तयारी दर्शविली हाेती. हा वाद काही संपत नव्हता. ममतादीदींनी काल परेड ग्राउंडवर रॅम्प करूनच तडजाेडीची आशा वगैरे उडवून लावली आहे. आता चर्चेचे दरवाजेच बंद केले गेले. ममता बॅनर्जी यांचे राजकारणच असे धक्कातंत्राचे अन् आक्रमक आहे, त्यामुळे त्यांनी डाव्या आघाडीची पाेलादी भिंत भेदलेली आहे. त्यांच्या सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन वेगळ्या पातळीवर जाऊन करावे लागेल. कारण बंगाली भाैगाेलिक रचना आणि हवामान खूप वेगळे आहे. ती ही जागा नव्हे.
डाव्या आघाडीच्या सरकारच्या कामगिरीचा गाैरवही वेगळ्या पातळीवर केला जात हाेता, तेव्हा ममतादीदी तडाखेबाज भाषणाने डाव्या आघाडीच्या सरकारचे हात रक्ताने माखले आहेत, असा आराेप करीत असत. आजच्या घडीला त्यांच्यासमाेर काँग्रेस किंवा डाव्या आघाडीचे आव्हान नाहीच. ते बंगालच्या राजकारणात दूरवर फेकले गेले आहेत. मुख्य लढत नव्याने पाय राेवलेल्या भाजपशी आहे. तेव्हा ममतादीदींची रॅम्पवरील वाटचाल पुन्हा एकदा गावाेगावी पाेहाेचते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.