- कल्याणी गाडगीळ (न्यूझीलंड)भारतातील रंगपंचमी हा सण आता जगातल्या अनेक देशांत प्रसिद्ध झाला असून, परदेशात राहणारे भारतीय लोक व त्यांच्याबरोबर त्या - त्या देशातले स्थानिक लोकही या उत्सवात सहभागी होऊन रंगत आहेत. भारतामध्ये विशेषत: खेडेगावांतून पूर्वी ‘धुळवड’ खेळली जात असे. चक्क चिखल व माती एकमेकांच्या अंगावर टाकायची, चिखल आणि धुळीने सगळे शरीर माखून घ्यायचे; मग इतरांनाही त्यात ओढायचे अशी मजा! या धुळवडीचाच एक सुधारित प्रकार या वर्षी न्यूझीलंडमधील रोटोरुआ येथे प्रथमच साजरा झाला.रोटोरुआ शहराच्या आसपासचा परिसर हा ज्वालामुखीचा प्रदेश असल्याने शहरात प्रवेश केला की जागोजागी होम पेटल्यासारखे धुराचे लोट आकाशात झेपावताना दिसतात. अनेक ठिकाणी सल्फरचा उग्र वासही येतो. त्यामुळे या शहराला ‘सल्फर सिटी’ म्हणूनही ओळखतात. येथील भूमीतून उसळणारे गरम पाण्याचे झरे, खनिजांचे मिश्रण पाण्यात मिसळून तयार झालेली विविध रंगांची तळी, उकळत्या चिखलांची तळी यांमुळे हा परिसर न्यूझीलंडमधील तसेच विविध देशांतील पर्यटकांनी व्यापून गेलेला असतो. येथील ‘स्पा’ व ‘मड पूल्स’ विशेषकरून फार प्रसिद्ध आहेत. ‘स्पा’ म्हणजे नैसर्गिक कारंजे, ज्याचे पाणी विविध प्रकारच्या खनिजांनी मिश्रित असल्यामुळे त्या पाण्यात डुंबत राहिल्याने शारीरिक आजारांना उतार पडतो. तसेच ‘मड पूल्स’ म्हणजे चक्क मऊसर चिखलाची तळी! त्यात डुंबल्याने त्वचेचा रंग सुधारतो, चिखल गरम असल्याने स्नायू सैलावतात. एक्झिमा, सोरायसिस हे त्वचेचे रोग बरे होतात, शिवाय सांधेदुखीच्या आजारामुळे ज्यांचे सांधे दुखतात त्यांनाही उतार पडतो. नैसर्गिक सौंदर्य उपचार म्हणूनही या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध असल्यामुळे चिखलात डुंबणे हे न्यूझीलंडमधे काही नवे नव्हते. पण, खास ‘चिखलाचा उत्सव’ म्हणजे ‘Mudtopia’ (मडटोपिया) ही कल्पना मात्र रोटोरुआ येथे नव्यानेच प्रत्यक्षात उतरविली गेली.मडटोपियाची तयारी रोटोरुआमध्ये सुरू झाली त्या वेळी उत्सवात आयोजित केलेल्या विविध खेळांसाठी पुरेसा चिखल असेल किंवा नाही अशी शंका आयोजकांना येऊ लागली. शेवटी रोटोरुआच्या सिटी काउन्सिलने चक्क नव्वद हजार डॉलर्स (म्हणजे सुमारे पंचेचाळीस लाख रुपये) खर्च करून साउथ कोरियातून चिखल आयात केला. या उत्सवात चिखलाशी संबंधित असंख्य खेळ होते. चिखलाच्या तळ्यात मस्तपैकी निवांतपणे डुंबत राहून स्वत:च्या शरीर-मनाला सैलावणे, चिखलाच्या विविध औषधीय उपचारांचा उपाय शरीरावर करून घेणे, चिखलामधे डुंबून शरीर कांती अधिक चांगली करून घेणे इत्यादी. चिखलाचे एक ‘मार्केट’ही होते, जिथे चिखलाच्या इलाजांची विविध औषधी पाकिटे विक्रीला उपलब्ध होती. चिखलात केलेली रस्सीखेच, चिखलात खेळला जाणारा फुटबॉल, मोठ्या घसरगुंड्या असे खेळ होते. या उत्सवात चिखलात खेळण्याबरोबरच मनोरंजनासाठी आयोजकांनी तीन दिवस तीन वेगवेगळ्या जागतिक कीर्तीच्या संगीतकारांचे जाहीर कार्यक्रम आयोजित केले होते. शारीरिक दमणूक झाली की लोक या संगीताच्या कार्यक्रमात येऊन बसत होते व परदेशीय पद्धतीनुसार स्टेजवर गाणाऱ्या गायक-वादकांच्या गाण्याबरोबर गाऊन, नाचून मस्त मजाही करीत होते. कित्येक लोक तर फक्त या संगीताचा आस्वाद घेण्यासाठीच केवळ मडटोपियामध्ये सामील झाले होते. स्वत:च्या शरीराला चिखलाचा कणही चिकटू न देता ते केवळ संगीतसमाधीत रंगले होते, संगीतकारांबरोबर नाचत, गात होते.मडटोपियाचे तिकीट साधारण ७० डॉलर्सपासून (म्हणजे साधारणत: साडेतीन हजार रुपयांपासून) सुरू होत होते. संगीताचे तिकीट काढणाऱ्यांना ‘मड पास’ मोफत होता. म्हणजे चिखलात जाऊन कोणतेही खेळ मोफत खेळण्याची मुभा होती. कार्यक्रमात सहभागी झालेले लहान-मोठे लोक अगदी थोडेसे कपडे घालून चक्क स्वत:ला चिखलाने माखून सगळीकडे निर्धास्तपणे व न लाजता वावरत होते. अर्थात कार्यक्रम संपल्यानंतर आंघोळी करून, स्वच्छ होऊन बाहेर पडण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या वेगवान फवाऱ्यांचे शॉवर्सही उपलब्ध होते. त्याचा उपयोग करून लोक आनंदाने स्वच्छ होऊन घरी परतले. हा न्यूझीलंडमध्ये प्रथमत:च साजरा केलेला ‘मडटोपिया’ कमालीचा रंगला व जनमानसाच्या मनात त्याने जागा घेतली. आता दरवर्षी हा उत्सव अधिक रंगेल.नवा विसावा शोधण्यासाठीचा उपक्रमकॉम्प्युटरच्या क्रांतीनंतर व सेलफोनच्या आगमनाने सगळ्या जगातील लोकांचे आयुष्यच अतीव वेगवान होऊन गेलेले आहे. या दमणुकीतून विसावा शोधण्यासाठीच आता जग वेगवेगळे उपक्रम शोधू लागले आहे. न्यूझीलंडमधील ‘मडटोपिया’ हाही याच नव्या विसावा शोधण्यासाठीच्या उपक्रमांपैकी एक आहे असे निश्चित वाटते; कारण या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी त्यांना हा कार्यक्रम फार म्हणजे फारच आवडला. त्यांचे तीन दिवस अगदी छान निवांत गेले... अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Rang Panchami : चिखलाच्या मऊ तळ्यात न्यूझीलंडची रंगपंचमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 1:21 AM