शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
3
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; आलिशान कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
5
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतील २८ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
6
New Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
7
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
8
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
9
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
10
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
11
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
13
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
14
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
16
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
17
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
18
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
19
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
20
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 7:56 AM

देशाच्या उभारणीत योगदान असलेले रतन टाटा शांत पावलांनी चालत पैलतीरी गेले असले तरी त्यांच्या पावलांचे अमिट ठसे कधीच मिटवता येणार नाहीत. 

‘सोने-चांदी आम्हा मृत्तिके समान’ अशा संस्कारात वाढलेल्या माणसांना एका उद्योजकाविषयी जिव्हाळा वाटावा, ही गोष्ट तशी आश्चर्यकारकच ! ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’ अशा कविता बालपणापासून म्हणत आलेल्यांनाही महालात राहणारा एक उद्योजक संत वाटावा, हे अद्भुतच. अनेक उद्योजकांची नावे खलनायकाप्रमाणे भासू लागलेली असताना, एक उद्योजक मात्र अवघ्या देशाला महानायक वाटावा, हे थक्क करणारे. ‘सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो? सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो?’ अशी नारेबाजी करणाऱ्या चळवळींनाही एका उद्योजकाच्या निधनानंतर गलबलून यावे, हे तसे अस्वाभाविक. मात्र, ‘रतन टाटा’ हे नावच अपवादात्मक. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी मध्यरात्री आली आणि अवघा देश शोकव्याकुळ झाला. देशाच्या उभारणीत योगदान असलेला हा माणूस शांत पावलांनी चालत पैलतीरी गेला असला तरी त्यांच्या पावलांचे अमिट ठसे कधीच मिटवता येणार नाहीत. 

‘आम्ही टाटांचं मीठ खाल्लंय’, अशा प्रकारची प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटते, तेव्हा त्यांच्याबद्दलची अवघ्या देशाची कृतज्ञता जाणवते. १९९१मध्ये डॉ. मनमोहनसिंगांनी खुलेपणाला वाट करून देणारा अर्थसंकल्प सादर केला आणि जागतिकीकरणाचे पर्व सुरू झाले. ‘वर्ल्ड ऑर्डर’ बदलून टाकणारा असा तो काळ. सोव्हिएत रशिया कोसळला होता. ‘पेरेस्त्राइका आणि ग्लास्तनोस्त’ची चर्चा सर्वदूर सुरू झाली होती. या नव्या वाटेवर देश चाचपडत होता. हेच ते वर्ष होते, जेव्हा रतन टाटांनी टाटा समूहाची धुरा आपल्या हातात घेतली. जागतिकीकरणानंतरच्या भारताला टाटांनी दिशा दाखवली. ज्या जमशेदजी टाटांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताचे एक शिल्पकार म्हटले, तोच वारसा पुढे चालवत रतन टाटांनी या भारताला आणखी नव्या वळणावर नेले. त्यामुळेच अवघ्या देशाने टाटांकडे आत्यंतिक आदराने पाहिले. रतन टाटा यांच्या जाण्याने अवघ्या देशवासीयांना आपल्या घरातीलच एखादे माणून गेल्याचे दु:ख झाले. ‘सॉल्ट टू सॉफ्टवेअर’पर्यंत पसरलेल्या या जागतिक उद्योगसमूहाचा वार्षिक महसूल १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे आहे, ही आकडेवारी वाणिज्यतज्ज्ञ सांगतीलच. पण ‘टाटा’ या नावाचा भारतीय जनमानसावरील प्रभाव त्या पल्याडचा आहे. रतन टाटा यांच्या निधनाने कोट्यवधी देशवासीयांचे काळीज कालवणे ही त्यांची खरी कमाई आहे. पराकोटीच्या बाजारीकरणाच्या आजच्या जगात ही शिदोरी पदरात पडण्यासाठी तशीच पुण्याई कमवावी लागते. 

अवघ्या स्वातंत्र्यलढ्यात ‘टाटा’ गांधींसोबत होते. अत्यंत कठीण काळात मोठी किंमत चुकवून देशासोबत होते. तोच वारसा जपत रतन टाटाही देश हाच केंद्रबिंदू मानत राहिले. सदैव सामान्य माणसासोबत राहिले. ही गोष्ट तीन वर्षांपूर्वीची. कर्मचाऱ्यांना कुटुंबाप्रमाणे मानणाऱ्या रतन टाटा यांना जेव्हा, त्यांच्या कंपनीतील एक कर्मचारी दोन वर्षांपासून आजाराशी झुंज देत असल्याची बातमी कळाली, तेव्हा मुंबई ते पुणे प्रवास करत ते थेट त्याला भेटण्यासाठी आले. त्यात कोणताही गाजावाजा नाही की कसला अभिनिवेष.  मनाचे मनाशी बंध आणि ते जपणारी निखळ भेट. २००८ सालचा मुंबईवरील दहशतवादी हल्ला. देशाचा मानबिंदू असणारे, टाटा समूहातील ताज हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असलेले पाहताना देशवासीयांचे काळीज असेच तुटले होते. मुंबईतील या हल्ल्यात जे १६६ जण प्राणांस मुकले, त्यात ३३ जणांचा मृत्यू ताजमध्ये झाला. हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना रतन टाटा यांनी तो कर्मचारी हयातभर जेवढी कमाई करू शकला असता, तेवढी भरपाई दिली. मुंबईवरील हल्ल्यात देशाचे नाक कापले गेले होते. रतन टाटा यांनी पुढील २१ महिन्यांत १ अब्ज डॉलरहून अधिक खर्च करून ताज पुन्हा नव्याने उभे केले आणि ग्राहकांच्या सेवेत पूर्ववत सादर केले. कर्मचाऱ्यांच्या निधनाने हळव्या होणाऱ्या माणसाचा कणखरपणाही जगाने पाहिला. 

रतन टाटा यांनीच एका कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे भारतासारख्या देशात तुम्ही स्वत: काम करून नेतृत्वाचे उदाहरण घालून द्यायचे असते. नुसते तुमच्या संपत्तीचे आणि प्रभावाचे प्रदर्शन करायचे नसते. जेआरडी टाटा यांच्या पश्चात रतन टाटा यांच्याकडे टाटा उद्योगसमूहाची धुरा आली तेव्हा अनेक आव्हाने उभी होती. प्रत्यक्ष रतन टाटा यांच्या निवडीबाबतही शंका घेतली जात होती. पण या सर्व विरोधाला न जुमानता रतन टाटा यांनी समूहाची व्यवस्था अधिक पक्की तर केलीच, शिवाय जगभरात त्याचा विस्तार केला. रतन टाटा यांनी नेतृत्व केलेल्या १९९१ ते २०१२ या २१ वर्षांच्या काळात टाटा उद्योगसमूहाचा नफा ५० पटींनी वाढला. त्यातील बहुतांश नफा परदेशातील व्यवहारांतून येत होता. त्यात जग्वार आणि लॅण्ड रोव्हरसारख्या कार आणि टेटली टी यासारख्या चहा कंपनीचा समावेश प्रामुख्याने होता. रतन टाटा यांच्याच कार्यकाळात टाटा समूहाने या कंपन्यांसह परदेशातील ‘कोरस’सारखा समूह ताब्यात घेतला होता. या निमित्ताने एका अर्थाने इतिहासाचे एक चक्र पूर्ण झाले होते. ज्या ब्रिटिश आमदनीत टाटांनी उद्योगाचा पाया घातला, त्याच उद्योगसमूहाने आता ब्रिटन आणि युरोपमधील महत्त्वाचे उद्योग विकत घेतले होते. 

एकेकाळी रतन टाटा यांना त्यांच्या कार कंपनीचा तोट्यातील विभाग विकण्यासाठी फोर्ड कंपनीच्या बिल फोर्ड यांच्याकडे जावे लागले होते. तेव्हा बिल फोर्ड यांची वर्तणूक फारशी चांगली नव्हती. पुढे रतन टाटा यांनी जेव्हा त्याच कंपनीकडून जग्वार आणि लॅण्ड रोव्हर कंपन्या विकत घेतल्या, तेव्हा फोर्ड यांनी समाधान व्यक्त केले. जगाने या घटनेकडे उलटा वसाहतवाद (रिव्हर्स कलोनियलिझम) म्हणून पाहिले. पण रतन टाटा तितकेच शालीन आणि संयत होते. त्यांनी आपल्या कृतीतून धडा शिकवला होता. जमशेटजी टाटा यांनी १५५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या व्यवसायाचे रतन टाटा यांनी जागतिक साम्राज्यात रूपांतर केले. आज या समूहात शंभरहून अधिक उपकंपन्या आहेत. त्यात सहा लाख ६० हजार कर्मचारी आहेत. या कंपन्यांच्या विविध उत्पादनांनी भारतीयांचे अवघे जीवन व्यापून टाकले आहे. देशवासीयांचा दिवस सुरू होतो, टाटा चहा पिऊन. त्यांचे जेवण रुचकर बनते टाटा मिठाने. टाटा स्टीलने बनलेली असंख्य उत्पादने दिवसभरात त्यांच्या वापरात येतात. देशवासीयांच्या अवघ्या जगण्यावर इतका प्रभाव असूनही, टाटांचे वर्तन मात्र विश्वस्ताप्रमाणे राहिले. एखाद्या उपभोगशून्य स्वामीसारखे. त्याला असलेली दातृत्वाची किनारही तितकीच उठून दिसते. 

आज देश-विदेशांत अशा कित्येक संस्था आहेत, ज्या टाटांनी दिलेल्या मदतीवर उत्तम सेवा देत आहेत. रतन टाटा यांनी अनेक नवउद्यमींना साहाय्य देऊन आपल्या पायावर उभे केले. टाटा उद्योगसमूहातील मुख्य ‘टाटा सन्स’ या कंपनीची मालकीही टाटांच्या अनेक सेवाभावी संस्थांकडे होती. ही बाब पुरेशी बोलकी आहे. लहानपणापासूनच जगातील सर्व सुखे रतन टाटा यांच्या पायाशी लोळण घेत होती. टाटा पॅलेसमध्ये किमान पन्नास चाकर त्यांच्या दिमतीला होते. शाळेत सोडायला रोल्स-रॉइस होती. पुढील शिक्षण अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये झाले. तेथील वास्तव्यात ते विमान उड्डाणही शिकले. कंपनीचे खासगी जेट विमान स्वत:च चालवत ते जगभर फिरत. कॉर्नेल  विद्यापीठातील त्यांची पदवी आर्किटेक्चरमधील. पण या संन्यस्त सम्राटाला देशातील रस्त्यांवरील गर्दीत दुचाकीवरून फिरणारे चौकोनी कुटुंब पाहून कळवळा येत असे. त्यातूनच टाटांच्या नॅनो कारचा प्रकल्प उभा राहिला. सामान्य नागरिकांना एक लाख रुपयांत कार देण्याचा चंग त्यांनी बांधला आणि तो सत्यातही उतरवला. पुढे विविध कारणांनी तो प्रकल्प फारसा यशस्वी होऊ शकला नाही. मात्र त्या निमित्ताने टाटांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि व्यावसायिक समर्पित वृत्ती जगाने पाहिली. रतन टाटा यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी नेल्को आणि अन्य कंपन्याही नीट चालवून दाखवल्या. त्यातही अडचणी उद्भवल्या. पण त्यातूनही रतन टाटा यांनी मार्ग काढला. 

सायरस मेस्त्री प्रकरणात ते टीकेचे धनी झाले. पण त्या आणि अशा अनेक वादळातून त्यांनी समूहाची नौका शिताफीने बाहेर काढली. धनाढ्य उद्योगपती असूनही टाटा गोरगरिबांनाही आपले वाटले आणि ते पारशी आहेत की आणखी कोणत्या धर्माचे आहेत, हे ना त्यांना कोणी कधी विचारले! माणूस कसा असावा, याचं उत्तर म्हणून लोक रतन टाटांकडे पाहात राहिले. टाटा खरे सृजनशील. त्यांचे मन कवीचे आणि स्वप्नाळू. कवीप्रमाणं नवनवीन स्वप्नं पाहायची आणि एखाद्या लहानग्याच्या झपाटलेपणानं ती सत्यात आणायची. त्यांच्या या स्वप्नांचा केंद्रबिंदूही सामान्य माणूस असायचा. टाटांनी ज्या नवउद्यमींना बळ दिले, त्यापैकी ‘गुडफेलोज’ हा त्यांचा आवडता उपक्रम! एकटेपण अनुभवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या नातवंडांशी संपर्क साधण्याची अनोखी व्यवस्था त्यांनी उभी करून दिली. त्यामुळे ते जसे टाटा उद्योगसमूहाचे पितामह ठरले, तसेच समस्त देशवासींच्या मनातही वडीलकीचे राज्य त्यांनी निर्माण केले. त्यांच्या अवघ्या लेकरांचे डोळे आज पाणावले नाहीत तरच नवल! 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटा