मोबाईलमध्ये धडाधड मेसेज पडू लागले, तसे पिंटकराव खडबडून जागे झाले. ‘आता आज कुठला डे ?’ म्हणत त्यांनी ‘व्हॉट्सअॅप’ उघडलं. उठसूठ दुसऱ्याच्या मातोश्रींचा उद्धार करणाºयांना जेव्हा आईच्या ममत्वाचा उमाळा येतो, त्या दिवशी ‘मदर डे’ असतो. एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसणाºयांनाही दोस्तीपायी गहिवरून येतं, तो ‘फ्रेंडशीप डे’ असतो. हे याच ‘व्हॉट्सअॅप’नं शिकवलेलं.एकेक पोस्ट बघताना ‘झटकन् उठल्यास हार्टअटॅक येतो,’ हा मेसेज त्यांनी वाचला. ते पुन्हा घाबरून आडवे झाले. पंधरा-वीस मिनिटं बेडवरच हातापायाचा व्यायाम करून ते उठले, तेव्हा त्यांची पत्नीही ‘सकाळी चहा प्यावा की लिंबू पाणी?’ ही पोस्ट वाचण्यात किचनमध्ये मग्न होती. ‘रोज चहा पिल्यानं शरीरात अखंड ऊर्जा राहते, अशी एक पोस्ट मी वाचलीय,’ असं त्यांंनी सांगताच ‘चहामुळे हृदयविकाराची शक्यता अधिक असते,’ ही पोस्ट जोरात वाचून पत्नीनं त्यांना केवळ ग्रीन-टी पाजला.बाथरूममध्ये जाऊन त्यांनी शॉवर सुरू केला, मात्र काहीतरी आठवलं. बाहेर येऊन पोस्ट वाचली, ‘गरम पाणी पोटात... तर थंड पाणी अंगावर घ्यावं,’ मग कुडकुडत्या थंडीतही त्यांनी थंड पाण्याचा बाथ घेतला. एवढ्यात शिंका आल्यानं तोंडाला टॉवेल लावावा म्हणेपर्यंत बायको ओरडली, ‘कॉटनचा वापरा. कालच पोस्ट पडलीय तशी.’नाक पुसून कपडे नेसत ते ड्युटीला निघाले, तेव्हा हातात भरगच्च टिफीनही आला. ‘पावसाळ्यात सिझनेबल भाज्या खाव्यात, असं मी कालच वाचलंय,’ बायकोकडून नवी माहिती ऐकत ते गुपचूपपणे बसस्टॉपवर पोहोचले. मात्र, बस गेल्याचं कळताच चालत निघाले... कारण ‘रोज किमान ९७४६ पावलं चालावीत. दीर्घायुष्य लाभतं,’ ही पोस्ट कधी तरी त्यांच्या नजरेस पडलेली. चालून-चालून पाय दुखू लागले. वाटेत मेडिकल दुकानात पेनकिलर गोळी मागितली. मात्र, ‘यामुळे किडनी फेल होते,’ अशी पोस्ट वाचल्याचं त्यांना आठवलं.गोळीचा नाद सोडून शेवटी रिक्षानं आॅफिस गाठलं. ‘लंच टाईम’ला टिफीन उघडणार, एवढ्यात एक सहकारी म्हणाला, ‘आजपासून मी दिवसातून फक्त दोन वेळा जेवणार. दोन्हींमध्ये किमान सात तासांची गॅप पाहिजे. कालच एका डॉक्टरांचा सल्ला वाचलाय,’ पिंटकरावांनीही गुपचूप उकडलेल्या भाज्यांचा डबा बाजूला सारला. मात्र, शेजारच्या टेबलावरच्या मॅडमनी तो डबा चाटून-पुसून खाल्ला, कारण ‘दर दोन तासांनी काहीतरी खाल्लंच पाहिजे,’ असं म्हणे त्यांनी वाचलेलं. दिवसभर उपाशीपोटीच काम करणारे पिंटकराव आॅफिस सुटताच बाहेर पडले. फूटपाथवरची किमान पाणीपुरी तरी खावी, असं क्षणभर त्यांना वाटलं. मात्र चौपाटीवरचा तो ‘शिवांबू’ व्हिडीओ डोळ्यासमोर येताच त्यांना ओकारी आली.आजूबाजूच्यांना वाटलं, ‘हा पक्का बेवडाऽऽ,’ लोकांच्या नजरेतली किळसवाणी भावना बघून त्यांना मेल्यासारखं झालं. जीव द्यावा, असा निर्धारही झाला; ‘पण सुटसुटीत कसं मरायचं?’ याचं उत्तर काही त्यांना कोणत्याच पोस्टमध्ये सापडलं नाही. शेवटी खवळून समोरचा ‘बार’ पकडला. ‘रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यास आयुष्य कमी होतं,’ या पोस्टवर मात्र खळखळून हसत रात्री उशिरापर्यंत इथंच मुक्काम ठोकण्याचा मेसेज त्यांनी बायकोला पाठवून दिला.
पोट भरावं म्हणे पोस्ट वाचून !
By सचिन जवळकोटे | Published: August 09, 2018 3:51 AM