महत्त्वाचे मानले जाणारे आपल्या देशी भाषांचे बहुतेक श्रेष्ठ लेखक व लेखिका अभिजन वर्गातील व अभिजननिष्ठ आहेत. त्यांचा वर्ग देशी असला तरी समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचण्याची त्यांची तयारी व क्षमता या दोहोंनाही मर्यादा आढळतात. मात्र अभिजन वर्गात जन्माला येऊन भारतीय संस्कृतीच्या गर्भनाडीशी जोडलेल्या थोड्या व अपवादभूत लेखिकांमध्ये बंगालच्या महाश्वेतादेवी या श्रेष्ठ लेखिकेचा सादर समावेश करावा लागतो. गुरुवारी त्यांचे प्रदीर्घ आजारानंतर कोलकात्यात निधन झाले तेव्हा भारतीय साहित्याच्या क्षेत्रानेच आपले एक अनमोल रत्न गमावले असे नाही, तर देशभरातील वंचितांचा वर्गही त्यांच्या खऱ्याखुऱ्या प्रवक्त्याला मुकला. लेखन हाच जीवनमार्ग असे मानून जगणाऱ्या महाश्वेतादेवी आरंभापासून समाजातील धनवंतांनी नागविलेल्या आणि शासनाने शोषिलेल्या वर्गांशी नाते राखणाऱ्या होत्या. विचाराने डाव्या असलेल्या महाश्वेतादेवी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या आणि बिजन भट्टाचार्य या डाव्याच विचारांच्या बंगाली नाटककाराशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. बिजनदा हे कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते असल्याने महाश्वेतादेवींनाही एक मोठे व वंचितांचे व्यासपीठ लाभले होते. १९२६ मध्ये ढाक्यात जन्माला आलेल्या महाश्वेतादेवींना वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे ढाका, मिदनापूर, कोलकाता आणि शांतीनिकेतनमध्ये शिक्षण घ्यावे लागले. तेथेच त्यांनी इंग्रजी या विषयाची एम.ए. ही पदवी प्राप्त केली. काही काळ त्या प्राध्यापकही होत्या. बिजनबाबूंशी घटस्फोट घेतल्यानंतर त्या असीम गुप्त या लेखकाशी विवाहबद्ध झाल्या. या साऱ्या काळात ‘देश’ या तेव्हाच्या सर्वाधिक खपाच्या दैनिकातून त्यांचे स्तंभलेखन सुरू होते. गरीबी आणि दारिद्र्य यांनी छळलेल्या माणसांच्या दु:खदैन्यात त्यांना आपले साहित्यजीवन गवसले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या त्याच्याशी एकनिष्ठ राहिल्या. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंध असलेल्या तीन ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्यानंतर त्या वर्तमानाच्या झगझगीत पण भाजणाऱ्या क्षेत्रात आल्या. ‘झाशीर राणी’, ‘अमृतसंचय’ आणि ‘अंधारमाणिक’ या ऐतिहासिक कादंबऱ्यांनंतर त्यांनी मराठी बारगीरांनी बंगालमध्ये केलेल्या अत्याचारांवरही एक कादंबरी लिहिली. इतिहासाचे मार्क्सवादी विश्लेषण करणाऱ्या महाश्वेतादेवींना १९६७ च्या सुमारास बंगालमध्ये उभ्या झालेल्या नक्षलवादी चळवळीत आशेचा व नवोदयाचा किरण आढळला आणि त्याकडे त्या आकर्षित झाल्या. ती चळवळ दडपण्यासाठी काँग्रेस व कम्युनिस्ट सरकारांनी केलेल्या जुलमी कारवायांच्या त्या कट्टर विरोधक बनल्या. चहाच्या मळेवाल्यांनी सक्तीने ताब्यात ठेवलेली जमीन मिळविण्यासाठी नक्षलबारीतील शेतकऱ्यांनी शस्त्र उपसले. तेव्हा त्या उठावात महाश्वेतादेवींना नव्या भारताचा व त्यातल्या गरीबांच्या अभ्युदयाचा भाव दिसला. त्यांच्या कादंबरीतील पात्रे साधी, गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय असत. त्यात आदिवासी आणि दलित असत. त्यांच्या व्यथावेदना आणि त्यांच्यावर होणारे अन्याय-अत्याचार असत. पण त्यांची पात्रे निमूटपणे अन्याय सहन करणारी नसत. जुलुमापुढे आव्हान होऊन उभे राहण्याचे आत्मसामर्थ्य त्यांच्यात असे. आपल्या परिसरातील स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्या एका ब्रिटीश अधिकाऱ्यासमोर नग्नावस्थेत उभे होऊन ‘ये, आणि कर माझ्यावर बलात्कार’ असे आव्हान देणारी त्यांची द्रौपदी (डोपडी) अनेकांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या प्रेरणा देऊन गेली. ‘हजार झुराशीर मा’ ही त्यांची कादंबरी अशाच शौर्याच्या प्रेरणा जागविणारी ठरली. ‘आॅपरेशन बसाई टू डू’, ‘अरण्येर अधिकार’, ‘हरिराम महातो’,‘सरसानित्य’, ‘द स्टॅच्यू’ आणि ‘दे फेअरी टेल आॅफ मोहनपूर’ या आपल्या कादंबऱ्यांतूनही त्यांनी अडीअडचणीत आयुष्य काढणाऱ्या माणसांच्या कहाण्या लिहिल्या. अरण्येर अधिकार या कादंबरीत त्यांनी मुंडारी जमातीने तोंडी जपलेला त्यांचा इतिहास शब्दबद्ध केला. कोलकात्यात कम्युनिस्ट सरकार सत्तारुढ होण्याआधी कामगारांना लुटणारे अनेकजण एका रात्रीतून कम्युनिस्ट कसे झाले, यावरही त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून कडवट टीका केली. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरी अस्पृश्यता, जातीभेद आणि वरिष्ठांची सत्ताकांक्षा अजून जात नाही यावरचा त्यांचा रोष मोठा होता. महाश्वेतादेवींना ज्ञानपीठ पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कार मिळाले. भारतातील पहिल्या पाच लेखिकांमध्ये जाणकार समीक्षकांनी त्यांचा समावेश केला. गरीबांना नायकत्व देणारी आणि त्यांच्या व्यथावेदनांना ‘रुदाली’चा स्वर देणारी ही महान लेखिका वयाच्या ९० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेली आहे. त्यांच्या जाण्याने केवळ बंगाली साहित्यच नव्हे, तर भारतीय साहित्यही दरिद्री बनले आहे आणि त्याचवेळी देशातील दरिद्री माणसांनी त्यांच्या हक्काचे व घरचे वाटावे असे प्रेमळ मातृत्व हरवले आहे. महाश्वेतादेवींच्या स्मृतींना आमचे अभिवादन.
वंचितांची वाचा : महाश्वेतादेवी
By admin | Published: July 30, 2016 5:45 AM