श्रीमंत माने
ज्युलिअस सीझर व मार्क ॲंटोनी या दोन दिग्गज रोमन सम्राटांना आपल्या तालावर नाचविणारी इजिप्तची शेवटची टॉलेमी राणी क्लिओपात्रा तिच्या मृत्यूमुळे इतिहासात अजरामर आहेच. इसवी सनापूर्वीच्या शेवटच्या शतकात तिचे साम्राज्य मोडीत निघाले. राेमनांवर राज्य चालविणारा इजिप्त त्याच रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनला. दरम्यान, मार्क ॲंटोनीकडून सीझरची हत्या झाली होती. ॲंटोनीने क्लिओपात्राला जवळ केल्यामुळे सुडाने पेटलेला त्याचा मेहुणा ऑक्टेव्हियनच्या हाती लागण्याऐवजी तिने दोन दासी व स्वत:ला अतिविषारी सापाचा दंश करवून घेऊन अवघ्या ३९ व्या वर्षी आपले आयुष्य संपविले. तिच्यावर कथा-कादंबऱ्या निघाल्या. काव्ये रचली गेली. शेक्सपिअरपासून अनेक दिग्गजांना मोह आवरला नाही. १९६३ साली भव्य अशा क्लिओपात्रा चित्रपटात एलिझाबेथ टेलरने ती पडद्यावर साकारली आणि तिच्या दंतकथेने जगाला मोहिनी घातली. या सगळ्या दंतकथांना आता क्लिओपात्राने वापरलेल्या मेंडेजिअन अत्तराच्या पुनर्निर्मितीची एक सुवासिक जोड मिळाली आहे.
इजिप्शियन साम्राज्याचे केंद्र असलेल्या मेंडेज शहरावरून या अत्तराला मेंडेजियन हे नाव मिळाले. नंतर मेंडेजचे महत्त्व कमी झाले व थ्मुईज नावारूपाला आले. नाईल नदीखोऱ्यातील सध्याचे तेल तिमाई हेच ते जुने थ्मुईज. तिथे उत्खननात तब्बल २३०० वर्षे जुना परफ्यूम बनविण्याचा एक कारखानाच सापडला. संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. त्यांना आढळले, की भारत, अरबस्तान, आफ्रिकेच्या काही देशांमधून येणारे मसाल्याचे सुवासिक पदार्थ हा मेंडेजियनचा कच्चा माल होता. अलेक्झांड्रिया व भूमध्य समुद्राच्या विविध भागात ये-जा करणाऱ्या जहाजांच्या बळावर इजिप्तची निर्यात भरभराटीस आली होती. मेंडेजियनचा त्या निर्यातीत मोठा वाटा होता. झेक ॲकेडमी ऑफ सायन्सेसमधील सियान कफलीन व इतरांनी मेंडेजियनच्या पुनर्निर्मितीचा ध्यास घेतला. त्यांच्या हाती होत्या प्राचीन वाङ्मयातल्या नोंदी आणि टॉलेमी राजवटीशी संबंधित एका कबरीमधील परफ्यूम बनविणाऱ्यांचे एक चित्र. सलग दहा दिवस, दहा रात्री गरम केलेल्या तेलात दालचिनीची पावडर, गंधरस, राळ वगैरे टाकल्यानंतर काय होते याचे प्रयोग झाले आणि अखेर एक दिवस मेंडेजियन तयार झाल्याचा दावा करण्यात आला. जगप्रसिद्ध स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटमध्ये त्याचा वापर झाला आणि अमेरिका टेस्ट कीचनच्या एका कार्यक्रमात त्याचे जल्लोषात सादरीकरण करण्यात आले. त्याची अजूनही जगभर चर्चा सुरू आहे. अत्तर असो, सुवासिक तेल असो की आणखी काही, असा प्राचीन गंधांचा शोध घेणे अजिबात सोपे नाही. कारण, वनस्पती, फळे-फुले किंवा माणूस व इतर प्राण्यांपासून निघणारा गंध ही क्षणभंगूर बाब आहे. स्रोत नष्ट झाला की गंध हवेत विरून जातो. त्याला अपवाद तेल, चरबी किंवा मेणाचा. कारण ते पाण्यात विरघळत नाहीत. त्यांचे बाष्पीभवन होत नाही. तरीही विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात सापडलेली भांडी, अत्तर व तेलाच्या कुप्या, धूपदान, धान्य साठवण्याच्या कणग्या आदींमध्ये त्या गंधाचे, वासाचे काही बायोमोल्युक्युलर रेसिड्यूज म्हणजे जैविक अंश असावेत, असे संशोधकांना वाटले. त्यांनी क्रोमॅटोग्राफी तंत्राचा वापर करून ते जैविक अंश मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याला बऱ्यापैकी यश आले आहे. सौदी अरेबियातील तायमा येथील उत्खननात सापडलेल्या धूपदानावर जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटच्या बार्बारा ह्युबर यांनी बरेच काम केले आहे.
सध्या परफ्यूम बनविण्याचा पाया म्हणून शक्यतो सगळीकडे इथेनॉल वापरले जाते. अगदीच उंची अत्तराचे उत्पादन करणारे काही मोजके उत्पादक तेल व चरबीचा वापर करतात. प्राचीन काळात इथेनॉल नव्हते. त्यामुळे इतिहासातील सगळ्या कृत्रिम गंधांचा आधार चरबी किंवा तेलच असावे. त्यांचा वापर करून सुवासिक अत्तर किंवा तेल, सौंदर्य प्रसाधने, इतकेच नव्हे तर वाईनसारखी पेये तयार करण्याचे तंत्र मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आले. ते जतन करण्याचे प्रयत्न सुरूच राहिले. आजही जगात बहुतेक सगळीकडे हे पारंपरिक तंत्र वापरले जाते. किंबहुना अशा प्राचीन तंत्रांच्या आधारे त्या उत्पादनांचे बाजारातील मूल्य ठरते.
केवळ परफ्यूमच्या सुवासानेच संशोधकांना वेड लावले असे नाही. ज्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे त्या पुस्तकांचा वास हादेखील मोठ्या कुतूहलाचा विषय आहे. पेपरलेस ऑफिस, डिजिटायझेशनच्या सध्याच्या युगात प्रत्यक्ष कागदाला हात लागणे दुर्मिळ बनले आहे. खरेतर या प्राचीन ठेव्याचा स्पर्श व वास हे दोन्ही माणसांची, संस्थांची, संस्कृतीची ओळख असते. परंतु, काळ बदलत असताना दोन्ही संवेदना दुर्लभ झाल्या आहेत. अशावेळी ‘आमच्या काळात हे असे होते’ हे पुढच्या पिढ्यांना कळावे, यासाठी संशोधक एकत्र आले आहेत. विविध ठिकाणी झटत आहेत. लंडन विद्यापीठातल्या द इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल हेरिटेजने जुन्या पुस्तकांना विशिष्ट गंध देणारे रासायनिक सूत्र शोधून काढले आहे. सिसिलिया बेम्बिब्रे या तिथल्या एक संशोधक आहेत. त्यांच्यासारख्या काहींचा समावेश असलेला ऑडयुरोपा नावाचा प्राचीन गंधांचे संवर्धन करणारा एक प्रकल्पच युरोपमध्ये राबविला जात आहे. विशेषत: १७०९ सालच्या सेंट पॉल कॅथेड्रल लायब्ररीमधील प्राचीन ग्रंथांच्या पानापानांना येणारा गंध साठवून ठेवण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. अलीकडेच, २०१८ मध्ये त्या प्राचीन ग्रंथालयाचे नूतनीकरण झाले. त्यामुळे पुस्तकांची बरीच हलवाहलव करावी लागली. पण, त्याआधीच हवेत उडून जाणाऱ्या अस्थिर, क्षणभंगूर असा जुन्या ग्रंथांचा गंध त्याच्या जैविक सूत्रांचा अभ्यास करून साठवून ठेवण्यात आला आहे.
(लेखक नागपूर लोकमतमध्ये कार्यकारी संपादक आहेत)
shrimant.mane@lokmat.com