-बी.व्ही. जोंधळे, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासकबाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोबर, १९५६ साली आपल्या लक्षावधी अनुयायांसह धर्मांतर करून बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे बौद्ध समाजात एक स्वाभिमान आला. समतेची जाणीव निर्माण झाली. अन्यायाविरुद्ध तो बंड करू लागला. परिणामी, हजारो वर्षे ज्या पूर्वास्पृश्य समाजाला गुलामगिरीची पशुतुल्य वागणूक देण्याचा अमानुष-अमानवी संस्कार हिंदू सवर्ण समाजव्यवस्थेवर झाला होता. ती विषमतावादी समाजव्यवस्था खवळून उठली. बौद्ध समाजाचे अस्मितादर्शक बंड मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. बौद्धांविषयी गैरसमज पसरविण्यात येऊ लागले. त्यातील एक मोठा गैरसमज म्हणजे बौद्धांची खूपच मोठी आर्थिक प्रगती झाली, हा एक होय. बौद्ध समाजाने खरे तर धर्मांतराची एक मोठी किंमत मोजल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती नाजूकच आहे, हे खरे वास्तव आहे.२०१२च्या आकडेवारीनुसार बौद्धांचा दरडोई खर्च सर्वात कमी म्हणजे ४६२ रुपये आहे, तर मुस्लिमांचा दरडोई खर्च ६२१ रुपये व हिंदूंचा दरडोई ६३६ रुपये खर्च बौद्धांपेक्षा कितीतरी जास्त आहे. २०१२ची आकडेवारी सांगते की, महाराष्ट्रात एकंदर १७ टक्के गरिबी असून, त्यात बौद्ध समाजाचे गरिबीचे प्रमाण २८ टक्के आहे, शिवाय शहरात राहणाऱ्या आदिवासी व अनुसूचित जातींतील गरिबीचे प्रमाण २३ टक्के आहे, तर बौद्धांचे सर्वात जास्त म्हणजे २५ टक्के आहे.बौद्ध समाजातील शिक्षणाचा प्रसार समाधानकारक जरी असला, तरी २०१४ च्या आकडेवारीनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेत नाव नोंदविण्याचे प्रमाण बौद्ध समाजात कमी आहे. इंग्रजी माध्यमाच्या, तसेच खासगी शाळांतून बौद्ध विद्यार्थ्यांचे ३६ टक्के, तर याच शाळेतील मुस्लीम मुलांचे प्रमाण ८४ टक्के व हिंदू मुला-मुलींचे प्रमाण ६३ टक्के आहे. याचा अर्थ, बौद्ध समाजातील मुले-मुली अजूनही सरकारी शाळांवर अवलंबून आहेत. शालान्त व बारावी परीक्षेच्या आधी शाळा सोडणाºयांमध्ये बौद्धांचे प्रमाण ४१ टक्के, ओबीसी ३५ टक्के, तर उच्च जातीची २६ टक्के मुले असतात.बौद्ध समाजाच्या गरिबीचे कारण म्हणजे या समाजाकडे उत्पादनाची कुठलीही साधने नाहीत, हे आहे. रोजंदारीवर हा समाज जगतो. व्यापार उद्योगात बौद्ध समाज अवघा २ टक्के आहे. त्याच्याकडे जमीन नाही. परिणामी, हिंदू दलितांत ३६ टक्के समाज रोजंदारीवर अवलंबून असताना बौद्धांचे प्रमाण मात्र ४६ टक्के आहे. बौद्ध समाजातील बेरोजगारीचे प्रमाण ९ टक्के, हिंदू अनुसूचित जातीत ५.६ टक्के, अनुसूचित जमाती ७ टक्के ही २०१२ची आकडेवारी बोलकी आहे.बौद्ध समाजातील बेरोजगारीचे कारण म्हणजे नोकरी देताना त्यांच्याशी केला जाणारा भेदभाव होय. खासगी क्षेत्रातही बौद्धांना डावलले जाते. बौद्ध व्यापारी व उद्योजकांशी व्यवहार टाळले जातात. भेदभावामुळे जातीय अत्याचार वाढतात. २०१४मध्ये अत्याचार झालेल्यांमध्ये ५८ टक्के बौद्ध होते. सबब बौद्ध समाजाचा आर्थिक विकास करावयाचा, तर सरकारने आपले विकासविषयक धोरण बदलले पाहिजे. बौद्ध समाजातील उद्योजकांची संख्या वाढविली पाहिजे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत बौद्धांना प्राधान्याने स्थान दिले पाहिजे. माणुसकीचे हक्क प्राप्त करून घेण्यासाठी केलेल्या धर्मांतराची किंमत आज बौद्ध समाज मोजतो आहे, हे थांबले पाहिजे.डॉ. आंबेडकरांची लढाऊ चळवळ बुद्ध धम्माचा स्वीकार, यामुळे बौद्ध समाजाचा स्वाभिमान जागा होऊन, जेव्हा तो विषमतावादी प्रथा परंपरेविरुद्ध लढू लागला, तेव्हा याचा राग प्रस्थापित समाजव्यवस्थेस येणे गैर जरी असले, तरी स्वाभाविक आहे. याचा अर्थ, उभा हिंदू समाज आपला शत्रू आहे, असे समजून बौद्ध समाजानेही अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढताना अद्वातद्वा वागण्या-बोलण्याचा मोह टाळला पाहिजे. बाबासाहेबांचा समतेचा लढा, त्यांचा धम्म स्वीकार हा सुडाचा प्रवास नव्हता. बाबासाहेबांनी धर्मांतर करताना ही बाब वेळोवेळी निक्षून सांगितली होती. तेव्हा बौद्ध समाजानेसुद्धा समतेची लढाई पुढे नेताना समन्वयाचा, सुसंवादाचा मार्गच अवलंबिला पाहिजे आणि बहुसंख्याक म्हणून हिंदू समाजानेही अन्याय, अत्याचाराविरोधी बौद्ध समाजाचा सात्विक संताप समजून घेऊन मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा हाच खरा संदेश आहे.अजून असे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारताना आपल्या समाजबांधवांना उद्देशून असे म्हटले होते की, बौद्ध धर्माचे आचरण आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे. अन्यथा जग उद्या महारांनी बौद्ध धर्म बाटविला, असे म्हणेल. बाबासाहेबांनी याच दृष्टीने नवदीक्षित बौद्धांना २२ प्रतिज्ञासुद्धा दिल्या होत्या. या २२ प्रतिज्ञांचे सार म्हणजे मी देवदेवता मानणार नाही, कर्मकांड करणार नाही, जाती पाळणार नाही, व्यभिचार करणार नाही, दारू पिणार नाही, असे होते. तेव्हा प्रश्न असा की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्म संस्कृती आपण निर्माण करू शकलो काय याचाही आजच्या धम्मचक्र प्रवर्तनदिनी विचार झाला पाहिजे, दुसरे काय?
धम्म संस्कृती जपण्याचा खरा अर्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:55 AM