केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यात आता जोराचे वाक्युद्ध सुरु झाले आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक ज्या धार्मिक दुहीकरणाच्या बळावर भाजपने जिंकली त्याचाच वापर केरळात करण्याच्या इराद्याने अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केरळ या देशातील सर्वाधिक साक्षर राज्यात उतरत आहेत. केरळात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी विधिमंडळात दुस-या क्रमांकाच्या जागा मिळवलेली आहे. केरळात आजवर भाजपला यशाचा चेहरा पाहता आला नाही. उत्तरेतील विजयानंतर तो दक्षिणेतही मिळविण्याच्या जिद्दीने शाह आणि योगी हे तेथील विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. तेथे जाताना त्यांनी त्यांची जुनीच हत्यारे सोबत घेतली आहेत. पिनारायी सरकार हे प्रामुख्याने डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे आहे आणि ते ‘जिहादी मुसलमानांना हाताशी धरून तेथील संघ परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करीत आहे,’ या आरोपासह शाह आणि योगी यांनी त्यांच्या प्रचारकार्याला सुरुवात केली आहे. राजकारणाला धर्मद्वेषाची जोड देण्याचा भाजपचा प्रयत्न आता साºयांच्या परिचयाचा झाला आहे. केरळात कम्युनिस्ट आणि संघ परिवाराचे लोक यांच्यात आजवर अनेक हाणामाºया झाल्या आणि त्यात दोन्हीकडची बरीच माणसे मारली गेली हे वास्तव आहे. मात्र या हाणामारीला आजवर कुणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. शाह असा प्रयत्न आता प्रथमच करीत आहेत. धर्म न मानणाºया कम्युनिस्ट पक्षाची सांधेजोड त्यांनी जिहादी मुसलमानांशी त्यासाठी केली आहे. हा प्रयत्न समाजाला राजकीय वैराकडून धार्मिक तेढीकडे नेणारा आहे. मात्र याच प्रकारातून आपण विजयी होऊ शकतो याची अनुभवसिद्ध खात्री पटलेल्या शाह यांना त्यात काही गैर दिसत नाही. पिनारायी विजयन किंवा त्यांचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यावर आतापर्यंत कोणी धर्मांधतेचा आरोप केला नाही आणि केला तरी तो त्यांना चिकटलाही नाही. मात्र आपल्या राजकीय हातोटीविषयी नको तेवढी खात्री असणाºया शाह यांना तसा प्रयत्न तेथे करावासा वाटला तर तो त्यांच्या सवयीचा भाग आहे, असेच आपण मानले पाहिजे. पिनारायी विजयन हेही कमालीचे लढाऊ नेते आहेत. त्यांनी शाह यांच्या आरोपाला आपल्या जवळच्या तडाखेबंद आकडेवारीनिशी उत्तर देऊन त्यांच्या प्रचाराची धार बोथट केली आहे. सन २००० पासून २०१७ पर्यंत केरळात ज्या राजकीय हत्या नोंदविल्या गेल्या त्यातील ८५ कम्युनिस्टांच्या तर ६५ संघ परिवाराच्या आहेत, असे सांगून त्यांनी एवढ्या काळाची पोलिसांची कागदपत्रेच देशाला दाखविली आहेत. या काळात केरळात एकट्या डाव्या कम्युनिस्टांचेच राज्य होते असे नाही. काँग्रेसप्रणीत उजवी व कम्युनिस्टांच्या नेतृत्वातील डावी अशा दोन्ही आघाड्यांनी तेथे आळीपाळीने राज्य केले आहे आणि ही आकडेवारी या काळातील आहे. एवढ्या काळात झालेल्या कोणत्याही हत्येला कोणी धर्म चिकटविला नाही. शाह यांनी त्यात धर्माला ओढले आहे आणि आपला आरोप अधिक गडद दिसावा म्हणून तो करताना योगी आदित्यनाथ या भगव्या वस्त्रातल्या पुढाºयाला त्यांनी सोबत घेतले आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत साºया देशात धार्मिक दुहीकरण घडवून आणण्याचे हे राजकारण देशविघातक आहे. मात्र ज्यांना राजकीय विजय देशहिताहून मोठा व महत्त्वाचा वाटतो त्या सत्ताकांक्षी लोकांना त्याचे सोयरसुतक नसते. विचार किंवा विकास यांची भाषा समजायला अवघड तर जात व धर्म या बाबी समजायला सोप्या असतात हा आजवरचा देशाचा अनुभव आहे आणि त्याबाबत पुढाकार घेणाºयांत शाह अग्रेसर आहेत.
हे राजकारण दुहीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 11:48 PM