भाजपाच्या दिल्लीतील अभूतपूर्व पराभवाची अनेकानेक कारणे आता सांगितली जाऊ लागली आहेत. यशाला अनेक बाप असतात, अपयश नेहमी अनाथ असते असे म्हणतात. त्यातलाच हा प्रकार. काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंतांनी ऐनवेळी आपली मते आप पक्षाकडे वळवून त्या पक्षाला विजयी केले असे काहींचे म्हणणे, तर सगळ्या अल्पसंख्य, दलित व वंचितांच्या वर्गांनी आपला दिलेली मते त्याला विजयी करणारी ठरली असे इतरांचे सांगणे. मोदींच्या सरकारातील अनेकांची अरेरावी, त्या सरकारचा हुकूमशाही तोरा, आपण अजिंक्य असल्याचा त्याने स्वत:विषयी करून घेतलेला समज आणि माध्यमांनी वाढवून दिलेल्या त्याच्या अपेक्षा याही गोष्टी सामान्य नागरिकांना आवडणाऱ्या नव्हत्या. मोदींची दरदिवशीची प्रवचने, त्यांनी ओबामांना ‘बराक’ अशी मारलेली हाक आणि गणराज्य दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी परिधान केलेला दहा लक्ष रुपयांचा ड्रेसही लोकांना आवडला नव्हता. किरण बेदींना त्यांनी दिलेली मुख्यमंत्रिपदाची उमेदवारी भाजपातील अनेकांसह संघाला न पचणारी ठरली. परिणामी त्या दोन्ही संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते प्रचार कार्यापासून दूर राहिले असेही सांगितले गेले. (किरण बेदींच्या यजमानांनी तसा आरोप आता केलाही आहे.) नितीशकुमार, ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला, शरद पवार व द्रमुक या सारख्या देशातील प्रादेशिक नेत्यांनी व पक्षांनी आपल्या भाषिक मतदारांना आपच्या बाजूने जाण्याचे केलेले आवाहन हेही अनेकांनी त्या पक्षाच्या विजयाचे एक कारण ठरविले. यातले प्रत्येकच कारण काही ना काही प्रमाणात आपच्या यशाला कारणीभूत असले तरी दिल्लीतील काही राजकीय विश्लेषकांनी व संसदीय कामकाजात वावरलेल्या जाणकारांनी पुढे केलेले आणखीही एक कारण महत्त्वाचे आहे. त्यावर या क्षणापर्यंत कोणी प्रकाश टाकला नाही म्हणून ते प्रकाशात आणणे महत्त्वाचे आहे. दिल्ली विधानसभेच्या याआधी झालेल्या निवडणुकीत भाजपाने ३२ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीची सारी सूत्रे संघ परिवाराने आपले नागपूरचे निष्ठावंत स्वयंसेवक व केंद्रीय भूस्तर वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हाती सोपविली होती. उमेदवारांची निवड करण्यापासून जाहीरनामा तयार करण्यापर्यंत आणि हर्षवर्धन यांचे नाव नेतेपदासाठी पुढे करण्यापासून त्या निवडणूक प्रचाराची सारी आखणी करण्यापर्यंतची जबाबदारीच तेव्हा गडकरींकडे होती. या निवडणुकीत मोदींनी त्यांना पूर्णपणे बाजूला सारले आणि ओळीने ४१ निवडणुका जिंकण्याची कीर्ती संपादन केलेल्या अमित शहांच्या हाती तिची सारी सूत्रे सोपविली. या शहांनी दिल्लीचे उमेदवार ठरविले, पक्षाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आणि किरण बेदींकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले. हा सारा प्रकार संघाच्या संतापाला कारण ठरला. गडकरींची अवहेलना हा संघाने आपला अपमान मानला आणि त्याने आपल्या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना या निवडणुकीपासून दूर राहण्याचा आदेश दिला. ही बाब लक्षात घेऊन किरण बेदींना पक्षाचे मुख्यमंत्रिपद देऊ करणाऱ्या भाजपच्या नव्या नेत्यांपासून त्या पक्षाचे जुने कार्यकर्तेही संतप्त होऊन घरी बसले. संघ दूर आणि भाजपाचे जुने लोक बाजूला या स्थितीत भाजपाच्या किरण बेदींना या निवडणुकीला तोंड द्यावे लागले. संघाला मोदींना धडा शिकवायचा होता आणि शहा यांच्या उद्दामपणालाही आळा घालायचा होता. सदर विश्लेषकाने विनोदाने असेही म्हटले की संघाचे लोक प्रात:शाखेत ‘मोदींचे नाक कटो’ म्हणत आणि सायंशाखेत ‘बेदींचे नाक कटो’ म्हणत. संघाचे माजी बौद्धिक प्रमुख राहिलेल्या मा.गो. वैद्यांचा या संदर्भातील अभिप्रायही येथे महत्त्वाचा ठरावा. ‘हा संघाचा नसून भाजपाचा पराभव आहे’ असे ते म्हणाले. मोदी आणि शहा यांच्या चमूने अडवाणी-मुरली मनोहरांना कधीचेच रिंगणाबाहेर काढले आहे. प्रमुख मंत्र्यांच्या तोंडांना कुलुपे लावली आहेत. त्यांचे सहकारी नेमण्याचे काम स्वत:कडे घेऊन त्यांची एकूणही नाकेबंदी केली आहे. प्रधानमंत्र्यांचे कार्यालय आणि अमित शाह सांगतील ते करा आणि स्वस्थ राहा हा त्या साऱ्यांना दिला गेलेला संकेत आहे. त्यातून मोदींची वक्रदृष्टी झालेले लोक या प्रकाराचे विशेष लक्ष्य आहेत. अशा लक्ष्यांत गडकरी आणि सुषमा स्वराज यांच्यासारख्यांचा समावेश आहे. एकेकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या सुषमाबार्इंना या निवडणुकीत कोणतेही काम नव्हते आणि गडकरींनी त्यांना नेमून दिलेल्या एकदोन सभाच तेवढ्या केल्या. हे मोदी आणि शहा यांचे राज्य आहे याची ग्वाहीच या निवडणुकीत त्या दोघांनी फिरविली. याउलट तिकडे संघ परिवाराचे बेबंद लोक घरवापसी, लव्ह जिहाद आणि धर्मांधतेचे विषाक्त राजकारण पेरत राहिले. मोदींनी त्यांना ते करूही दिले. आता त्यांच्यामुळे पराभव झाला असे मोदींनी म्हणायचे आणि मोदींच्या एकाधिकारापायी पराभव झाला असे संघाने म्हणायचे. संघटनेत दुही असली आणि तिच्यातला एकोपा कोणत्याही कारणाने का होईना संपला की त्याची परिणती अशीच व्हायची. दिल्लीतील भाजपाच्या पराभवाची मीमांसा यानंतर आणखीही होत राहील. त्या मीमांसेत या परिमाणाचा समावेश महत्त्वाचा ठरावा असे आहे. मोदींमुळे देशात विजयी झालेला पक्ष, आता त्यांच्यामुळेच दिल्लीत पराभूत झाला असा याचा अर्थ आहे.
पराभवाला भगवी फूटही कारणीभूत
By admin | Published: February 11, 2015 11:34 PM