हिंदू हा केवळ एक धर्म नसून ती संस्कृती व वृत्तीही आहे. ती सहिष्णुतेची धारणा आहे. या धारणेला कुंपणे नाहीत, कडा नाहीत आणि आतून केलेल्या बंदोबस्ताची व्यवस्थाही नाही. तो आपल्या साऱ्यांना खुल्या, स्वस्थ व सभ्य जीवनाची मुभा देतो. न्या. रंजन गोगोई म्हणाले, ‘देश म्हणजे सर्वसमावेशकता’. ही व्याख्या हिंदू धर्मालाही लागू होणारी आहे. हा धर्म सर्वसमावेशक तर आहेच शिवाय त्यात धर्म न मानणाऱ्यांनाही स्थान आहे. तो जेवढा ऋषीमुनींचा, संतांचा, समाजाचा आणि नेत्यांचा तेवढाच तो चार्वाकांसारख्या धर्म न मानणाऱ्यांनाही कवेत घेणारा आहे.गांधी, पटेल, नेहरू व त्यांची परंपरा अशी सर्वांठायी समभाव पाहणारी आहे. या पाण्यासारख्या निर्मळ व पारदर्शी वृत्तीत आपल्या कडवेपणाचे भगवे व इतर रंग मिसळून तिला गढूळ करणारी माणसे या धर्माएवढीच त्या वृत्तीचीही विध्वंसक आहेत. गांधी हिंदू होते. गोडसेही हिंदू होता. गोडसेच्या हिंदू असण्याला कडवेपणाची रक्तधार होती. त्या धारेनेच गांधीजींचा बळी घेतला. ही धार कायम ठेवण्यासाठी झटणारी व लहान-मोठ्या प्रसंगी ती परजत राहणारी खूप माणसे सध्या देशात आहेत. त्यांचा वार अल्पसंख्याकांवर चालतो, स्वतंत्र विचार करणाऱ्या उदारमतवाद्यांवर चालतो आणि दलितांचाही तो तसाच विचार करतो. हे केवळ हिंदू समाजाचेच चित्र नाही. सारा दक्षिण-मध्य आशियाचा मुस्लीम प्रदेश अशाच तऱ्हेच्या आपल्याच धर्मातील उदारमतवादी व कडव्या प्रवाहांमधील युद्धांनी ग्रासला आहे. अफगाणिस्तानातले तालिबान किंवा त्यापलीकडचे इसिस आणि बोकोहराम हे कडवे इस्लामपंथी आहेत आणि त्यांना जगात इस्लामचे हिरवे राज्य स्थापन करायचे आहे. मात्र त्यांची शस्त्रे सर्वप्रथम त्यांच्याच धर्मबांधवांवर चालत आहेत. इराण, इराक, सिरिया व येमेन या मुस्लीम देशांतून अशा कडव्या मुस्लीम संघटनांच्या हिंसाचारापायी निर्वासित झालेल्यांची संख्या दोन कोटींहून अधिक आहे. त्यांना देशात राहता येत नाही आणि विदेशात थारा नाही. त्यांच्या बोटी समुद्रात बुडतात. त्यात मुले, स्त्रिया व वृद्ध मरण पावतात. पण कडव्या शस्त्राचाऱ्यांना त्याचे काही एक वाटत नाही. गांधीजींच्या खुनानंतरही पश्चात्ताप न झालेले असे कडवे आपण आपल्याही देशात पाहिले आहेत. उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांवर किंवा गुजरातमधील दलितांवर अत्याचार करणारे कडवे हिंदुत्ववादीही असेच पश्चात्तापमुक्त असल्याचेच आपल्याला दिसले आहे. या माणसांना त्यांचा धर्म प्रिय असतो की परधर्मीयांविषयीचा व स्वधर्माची चिकित्सा करणाºयांचा द्वेष अधिक असतो? त्यातून भारतात अशा कडव्या लोकांचा गौरव करणारे, त्यांना सरोपे देणारे व पुढाऱ्यांच्या हातून त्यांचा सत्कार करणारे राजकारण आहे. या स्थितीत निळ्या आकाशाला भगवा रंग फासण्याच्या महत्त्वाकांक्षेने ग्रासलेले लोक वाढणारच. प्रश्न त्यांची शस्त्रे उद्या ज्यांच्यावर चालतील त्या उदारमतवाद्यांच्या सुरक्षित जीवनाचा आहे.भारतात सध्या कडवे हिंदुत्व व सौम्य हिंदुत्व हे दोन शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. वास्तव हे की धर्म कडवा वा सौम्य असा दोन भागांत विभागला जाणारा विषय नाही. तो एकच आहे आणि तो माणसांच्या स्वभाव धर्मासारखाच सहजसाधा व निर्मळ आहे. तो बदलून त्याला कडवे रूप देणारे व त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याची सौम्य आवृत्ती काढणारे दोन्ही वर्ग धर्माचे खरे स्वरूप समजून न घेणारे आहेत. मात्र धर्माला राजकारणात ओढायचे एकदा ठरविले की त्याला अशी रूपे येतात. मग समाजातली माणसे परधर्मीयांवर हल्ले करतात आणि आपल्याच धर्मातील उदारमतवादी माणसांचे मुडदे पाडतात. खरा धर्म ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणतो. तो ‘हे विश्वची माझे घर’ म्हणतो. तो केवळ स्वधर्मातील लोकांचेच नव्हेतर, जगातल्या साऱ्या ‘दुरितांचे तिमिर जावो’ असे म्हणतो. त्या वृत्तीची कास धरणे ही खरी धर्मसेवा आहे. बाकीच्या आडवाटा माणसांना चुकीच्या दिशेने नेणाऱ्या आहेत. हा मार्ग समजून घेण्यासाठी संतांचे मन लागते. महामानवांची वृत्ती लागते आणि खऱ्या धर्माचे प्रयोजन नीट समजून घ्यावे लागते. ही समज अध्ययनातून व चिंतनातून येते. दु:ख याचे की अलीकडे धर्म समजावून द्यायला त्याचे बुरखे पांघरलेले राजकारणीच आपल्या समाजात अधिक झाले आहेत आणि त्या ढोंगी माणसांना अनुयायीही लाभताना दिसत आहेत. हे बदलल्याखेरीज खऱ्या धर्ममार्गाचे दर्शन व्हायचेही नाही.
वसुधैव कुटुंबकम्
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 4:37 AM