पाच लाख रुपयांत एक मुसलमान आणि दोन लाख रुपयांत एक ािश्चन विकत घेऊन त्याला हिंदू धर्मात आणण्याचे धर्मजागरण मंचाचे माणसांच्या खरेदीचे समाजकारण आता उत्तर प्रदेशात सुरू झाले आहे. ‘जागरण मंच’ ही संघाच्या अनेक शाखांपैकी एक शाखा असून, तिचा हा खरेदी व्यवहार संघाच्या संमतीनेच सुरू आहे याविषयी कोणाला शंका असण्याचे कारण नाही. देशात हिंदूंची संख्या 8क् टक्के असल्याचे जनगणनेत जाहीर झाल्यापासून ती यथाकाळ कमी होईल व आपला धर्म अल्पमतात जाईल, या भीतीने ग्रासलेल्या हिंदुत्ववाद्यांनी प्रत्येक कुटुंबात किमान चार मुले जन्माला आलीच पाहिजेत, असा प्रचार थेट केला. सुदर्शन हे सरसंघचालक असतानाच सुरू केला होता. हिंदूंचा जो वर्ग साडेचारशे वर्षाच्या मोगल राजवटीत अल्पमतात आला नाही आणि दीडशे वर्षाच्या ब्रिटिशांच्या राजवटीत कमी झाला नाही, तो नरेंद्र मोदींच्या भगव्या राजवटीत अल्पमतात येईल असे सांगणो हास्यास्पद आहे. मोदींचे सरकार सत्तारुढ झाल्यापासून आणि काही राज्यांच्या निवडणुका भाजपाने जिंकल्यापासून संघाचे राजकीय अवतारकार्य तसेही संपुष्टात आले आहे. आपले अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी त्याला आता इतर क्षेत्रे धुंडाळावी लागत आहेत. धर्म जागरणाच्या नावाखाली इतरांची धर्मातरे घडवून आणण्याचा त्याचा उद्योग त्यातलाच एक आहे. तसेही कल्याणाश्रम या नावाचे त्याचे धर्मातराचे कारखाने आदिवासी क्षेत्रत सुरूच आहेत. मात्र, त्यात भाबडे आदिवासीच तेवढे गवसत असल्याने त्याचा गाजावाजा फारसा होत नाही. त्यामुळे मोठा ओरडा होईल, असे मुसलमान व ािश्चनांचे धर्मातर घडविण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. तसेही गेल्या काही दिवसांपासून मोदींचे एकोप्याचे राजकारण बाजूला सारत संघातल्या उठवळांनी धर्मजागरणाच्या नावावर देशात धार्मिक तेढ उभी करण्याचे प्रयत्न चालविलेच आहेत. निरंजन ज्योती या तथाकथित साध्वीने हिंदूंखेरीज इतरांना ‘हरामजादे’ म्हणणो, गिरिराज सिंग या खासदाराने भाजपाला न मानणा:यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणणो, सुषमा स्वराजने गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा द्या अशी मागणी करणो, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी बाबरी मशिदीच्या जागेवरच राम मंदिर बांधा, असे म्हणणो आणि स्वत: साक्षी महाराज म्हणविणा:या भाजपाच्या बुवाने नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणो हे सगळे प्रकार भाजपा व संघ परिवाराच्या वाटचालीची यापुढची दिशा दाखविणारे आहेत. (साक्षीबुवाच्या या विधानावर भाष्य करताना मराठीतील एका स्वनामधन्य पत्रकाराने ‘गांधींचा खून करणो ही बाब देशभक्तीच्या आड कशी येते’ असे म्हणण्यार्पयतचा उथळपणाही केला आहे.) ते देशाला धार्मिक विभाजनाकडे व जनतेला धर्माच्या नावावरील फाळणीकडे नेणारे आहेत. ािश्चन आणि मुसलमान या धर्मातील लोकांची धर्मनिष्ठाही इतर कोणत्याही धर्माच्या लोकांप्रमाणोच अढळ व अविभाज्य आहे. त्यांच्यावर धर्मातर लादण्याचा व त्याच्या जाहिराती करण्याचा प्रकार दंगलींना चिथावणी देणारा व त्या घडवून आणणारा आहे. उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांच्या समाजवादी पक्षाचे सरकार सत्तारूढ आहे आणि त्याला पाठिंबा देणा:यांत मुसलमानांचा वर्ग मोठा आहे. त्यामुळे संघाच्या राजकारणाची एक दिशा मुलायमविरोधी आहे हेही उघड आहे. मुलायमसिंग, लालूप्रसाद, नितीशकुमार, देवेगौडा व चौटाला यांनी एका विशाल पक्षाची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्या ताब्यात देशातली दोन मोठी राज्ये असून, तीन राज्यांत त्यांचा प्रभाव मोठा आहे. संघाच्या या धार्मिक खरेदीविरुद्ध त्या पक्षाने आवाज उचलला, तर देशात आजच अनवस्था प्रसंग उभा राहणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षण मंत्री र्पीकर गप्प बसतात, तर बाकीचे मंत्री नुसतेच मुखस्तंभ आहेत. आणि मोदी? त्यांच्या मनात हे होऊ देणो आहे काय हे कळायला मार्ग नाही. कारण ते या बेबंदांना आवर घालत नाहीत आणि त्याविषयी बोलतही नाहीत. त्यांनी निरंजन ज्योतीला फटकारले आणि गिरिराजला तंबीही दिली. मात्र, तेवढय़ावर ती माणसे गप्प झाली नाहीत आणि त्यापासून इतरांनीही कोणता धडा घेतल्याचे दिसले नाही. परिणामी पंतप्रधानांनीच या सा:या बाबींकडे दुर्लक्ष करण्याचे ठरविल्याचे दिसत आहे. देशाचे मध्यवर्ती नेतृत्वच अशा धर्मखरेदीबाबत मूग गिळून बसणार असेल, तर आपण एका अटळ हिंसाचाराच्या दिशेने जात आहोत हे पक्केपणी समजून घेतले पाहिजे व तो टाळायचा असेल, तर देशभरातील सगळ्या सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन मोदींना बोलके केले पाहिजे.