- प्रवीण दीक्षित(निवृत्त पोलीस महासंचालक) पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात एका नगरसेविकेने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने एका रुग्णावर तातडीने उपचार केले नाहीत, त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण केली. त्यामुळे चिडून सर्व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला व मागणी केली, की त्या नगरसेविकेस अटक करण्यात यावी व तिच्याविरुद्ध वैद्यकीय अधिकाºयांविरुद्ध हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारच्या घटना सार्वजनिक रुग्णालये अथवा खाजगी दवाखान्यांत अधूनमधून घडल्याचे वृत्त येते. यातील काही घटनांत वैद्यकीय अधिकाºयांना जबर मारहाण झाल्याचे अथवा दवाखान्यातील संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळते.वैद्यकीय संस्थांमधील हिंसाचार हा काही तात्कालिक कारणांमुळे घडला असे दिसत असले, तरी त्या पाठीमागे संबंधितांना योग्य प्रशिक्षणाचा अभाव, आवश्यक त्या सुरक्षा-सुविधांचा अभाव व अशा घटनांचा कसा प्रतिबंध करावा किंवा त्या कशा हाताळाव्यात यासंबंधी धोरणाचा अभाव ही खरी कारणे आहेत. हिंसक घटना घडणार नाहीत यासंबंधी सर्व प्रकारची काळजी घेणे अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयात हजर झाल्याबरोबर व नंतर वेळोवेळी संबंधितांना सुरक्षा तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रशिक्षण अपेक्षित आहे. रुग्णालयातील प्रत्येक थरातील जसे रुग्णालयाचे बिल बनविणारे कारकून, स्वागतासाठी नेमलेल्या व्यक्ती, वॉर्डबॉय, परिचारिका, विविध तंत्रज्ञ, निवासी वैद्यकीय अधिकारी ते सर्वांत वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ या प्रत्येक पातळीवर प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. प्रत्येक थरातील व्यक्तींच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाºयांकडून हे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. प्रशिक्षणामध्ये त्या त्या व्यक्तीने काय करावे व काय करू नये यासंबंधी व्यावहारिक सूचना देणे गरजेचे आहे. हिंसाचाराच्या घटनांसंबंधी प्रत्यक्ष घटनांबाबत तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने विश्लेशण करून अनुमान काढणे गरजेचे आहे. याबाबतचा प्रशिक्षण कार्यक्रम पॉवर पॉइंटच्या माध्यमातून दाखवताना त्या घटनांचे दृक्श्राव्य चित्रीकरण दाखविल्यास ते जास्त परिणामकारक ठरते. अशा प्रकारच्या कार्यक्रमात रुग्णांशी सुसंवाद हे प्रमुख उद्दिष्ट असणे गरजेचे आहे.सर्व रुग्णालयांनी सुरुवातीपासूनच सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबिणे व नवनवीन तंत्रज्ञान अवलंबून त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. सुरक्षातज्ज्ञांशी विचारविनिमय करून हे उपाय करणे गरजेचे आहे. कारण सहज सोप्या वाटणाºया गोष्टींकडेसुद्धा दुर्लक्ष झाल्याचे आढळते. काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे- प्रवेश व निर्गमनासाठी वेगवेगळे दरवाजे असावेत. तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यासाठी वेगळे प्रवेशद्वार असावे. रुग्णांना भे़टायला येणाºया व्यक्तींवर योग्य नियंत्रण न ठेवल्यास चेंगराचेंगरी होते व आगंतुक थोपविणे अवघड होते. सीसीटीव्ही कॅमेरे व त्यातच आवाज नोंदविण्याची व्यवस्था असणे आणि रात्रीच्या वेळीही ते प्रभावीपणे काम करतील हे पाहणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेºयांचे निरीक्षण करण्यासाठी योग्य प्रशिक्षित व्यक्ती व हिंसक घटनांसंबधी संबंधितांना माहिती देणारी वॉकीटॉकी असल्यास गंभीर घटना टाळता येऊ शकतात. रुग्णांना भेटायला येणाºया व्यक्ती व रुग्णांबरोबरचे नातेवाईक यांच्यासाठी योग्य व्यवस्था केल्यास वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच रुग्ण यांच्यावर येणारा ताण कमी होऊ शकतो.कोणत्याही नियमाविरुद्ध होणाºया घटनेची अचूक नोंद ठेवल्याचे दिसत नाही. या घटनांची नोंद नीट ठेवल्यास कोणत्या व्यक्ती चुकीचे वागत आहेत व त्यासंबंधी काय सुधारणा करणे आवश्यक आहे, याचे उपाय योजणे शक्य होते. या घटनांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग संबंधित कर्मचाºयांना वेळोवेळी दाखवून त्या घटना कशा टाळता आल्या असत्या हे समजावून सांगता येईल. बºयाचवेळा हिंसाचाराच्या घटना पोलिसांना न कळवणे किंवा कळवल्यास न्यायालयासमोर जबानी न देणे अशी प्रवृत्ती दिसते. साक्षीदार किंवा तक्रारदार दुरूनही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या साहाय्याने न्यायालयासमोर जबानी देऊ शकतो, याची बहुतेक लोकांना कल्पना नसते. वैद्यकीय संस्थातील हिंसाचारात तक्रारदाराने दाखवलेली उदासीनता व न्यायाधीशांसमोर जबानी न देणे ह्यामुळे ह्या हिंसक घटनात गुन्हेगार मोकळे सुटतात.वैद्यकीय अधिकाºयांविरुद्ध हिंसाचार प्रतिबंधक कायदा केवळ पुस्तकात असल्याने हिंसाचार होणार नाही याची कुठलीही शाश्वती नाही. रुग्णालयाशी संबंधित सर्व व्यक्तींनी सर्व प्रकारच्या घटनांना तोंड देण्याची तयारी, घटना घडल्यास कोणी काय करायचे यासंबंधीची सविस्तर माहिती, त्याची वारंवार रंगीत तालीम केल्यास व ज्या वेळेस आणीबाणीची परिस्थिती नाही अशाही वेळेस संबंधित पोलीस अधिकारी व अन्य संस्था ह्यांच्याशी ठेवायचा समन्वय या काही महत्त्वाच्या सूचनांची अंमलबजावणी केल्यास रुग्णालयातील हिंसक घटना घडणार नाहीत व दुर्दैवाने घडल्यास त्यावर त्वरित नियंत्रण ठेवता येईल.
वैद्यकीय संस्थांतील हिंसाचारावर उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:34 AM