- रविप्रकाश कुलकर्णीतुम्हाला विवेक हा नट माहीत आहे काय? अर्थात पटकन उत्तर येणार नाही? आठवणार नाही हे समजण्यासारखं आहे. कारण विवेक यांना जाऊनसुद्धा अनेक वर्षे झाली आहेत. (जन्म - १६ फेब्रु. १९१८ : मृत्यू - ९ जून १९८८.) त्यांच्यावर स्मृतिग्रंथ करण्याचे योजिले आहे. वहिनींच्या बांगड्या, देवबाप्पा, तू सुखी रहा, पुढचे पाऊल, मर्द मराठा, दूधभात, अबोली, पोस्टातली मुलगी, बोलकी बाहुली, पुत्र व्हावा ऐसा.. यांसारख्या चित्रपटांची आठवण झाली तर विवेक आठवतो तो त्यांच्या देखणेपणामुळे. असं आकर्षक व्यक्तिमत्त्व फारच थोड्या मराठी नटांच्या वाट्याला आलं असेल. त्यामुळेच पुढे आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’मध्ये त्यांना डॉ. कांचनची भूमिका दिली गेली. आणि हा डॉ. कांचन त्यांनी इतका झकास केला की, लग्नाच्या बेडीत रश्मीच्या भूमिकेत हंसा वाडकरपासून पद्मा चव्हाण ते थेट आजपर्यंत अनेक जणी आल्या मात्र नायक डॉ. कांचन एकच राहिला तो म्हणजे विवेक!पण अशा विवेकबद्दल चटकन माहिती उपलब्ध होत नाही. जी मिळते ती म्हणजे चित्रपटांची यादी वा त्याची जुजबी ओळख. त्यापेक्षा अधिक माहिती हवी आहे. याच कारणाने विवेकसंबंधात एक स्मृतिग्रंथ करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत भारती मोरे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांना प्रभाकर भिडे, प्रकाश चांदे (आणि अर्थातच मी) यांनी साथ द्यायचं कबूल केलं आहे. म्हणूनच ‘कलाक्षरे’च्या वाचकांनादेखील विनंती आहे की, त्यांच्याकडे विवेक या अभिनेत्यासंबंधात काही विशेष माहिती, आठवणी असतील तर त्या कळवाव्यात, सूचना कराव्यात.अर्थात एक प्रकारे ही शोधयात्राच आहे. कसं ते पहा.. कविवर्य अरुण म्हात्रे यांच्याकडे हा विषय काढताच ते म्हणाले, ‘‘म्हणजे काय? ‘जेथे सागरा धरणी मिळते’ या गाण्याच्या वेळी वाळूत रेखलेल्या सुधीर अक्षराबरोबर विवेक दिसतो. हे आजही मी विसरलेलो नाही. आपण असं असावं असं वाटायचं त्या वेळी...’’‘‘मग हे लिहून दे’’ असं मी म्हटलं. हे तुम्ही ओळखलंच असणार. त्यासाठी म्हात्रेला पुन्हा आठवण केली तेव्हा तो म्हणाला, ‘‘अरे हे सगळं मी बायकोला सांगितलं तेव्हा तिला पण काय काय आठवत गेलं. आता मी लिहितोच...’’कुणाला काय आणि कसं आठवत जाईल हे सांगणं कठीण. फक्त तेथपर्यंत पोचण्यासाठी काही धागादोरा सापडला पाहिजे. शिवाय एका आठवणीतून दुसरी आठवणदेखील निघू शकते हेदेखील तितकेच खरे. या प्रकारातून डॉ. क. म. जोशी, महंमद रफीचे फॅन-लेखक श्रीधर कुलकर्णी, अशा गाण्यांनी ज्यांचा विवेकशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आला त्यांनी सहर्ष सहकार्य केलं आहे.विवेक हे मुळातले गणेश अभ्यंकर. पण चित्रपटासाठी त्यांचं बारसं झालं- विवेक. ते केलं बाळ कुडतरकर यांनी. बाळ कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्सचे एका बाकावर बसणारे सहाध्यायी. तेव्हा बाळ कुडतरकरांनीपण सहर्ष सहकार्य केलं आहे.शेवटी अशा माहितीतूनच हा स्मृतिग्रंथ आकाराला येणार आहे. यासाठी रमेश उदारे, वसंत इंगळे या भिडंूचीपण मदत होतेच आहे. या शोधाची पण गंमत आहे. अर्जुन निकुंभ याची एक आठवण हाताशी आली. ते सांगतात-अंबरनाथ येथील ‘नवप्रकाश चित्र’ या चित्रसंस्थेच्या ‘हमारी कहानी’ या हिंदी चित्रपटातील प्रमुख भूमिकेत विवेक यांची निवड झाली होती. मी चित्रपटाच्या युनिटमध्ये होतो. त्यांच्या तोंडच्या ‘नेकी से काम कर’ या गाण्याच्या चित्रपटाच्या वेळी त्यांचं अभिनयकौशल्य पाहून मी चकित झालो होतो. या चित्रपटाचे निर्माते- लेखक- दिग्दर्शक भालचंद्र वासुदेव कुलकर्णी होते. दुर्दैवाने ‘हमारी कहानी’ प्रकाशित झाला नाही. विवेक यांच्यासंबंधात धांडोळा घेत असताना अशी दुर्मीळ माहिती हाताशी तर आली; पण ह्याबाबत आणखी माहिती कशी मिळणार?निर्माते भालचंद्र वासुदेव कुलकर्णी (अंबरनाथ) आणि अर्जुन निकुंभ ह्यांचा शोध कसा घेता येईल? विशेष म्हणजे हे अर्जुन निकुंभ डोंबिवली - विष्णू नगरमधले (तेव्हाचा पत्ता) आहेत. पण अजूनतरी सापडलेले नाहीत...तर सांगायचा मुद्दा हाच की तुम्हाला विवेक या नटासंबंधात काही माहिती, विशेष घटना आठवत असतील तर कळवा. आधीच विस्मृतीत गेलेल्या या हकिगती या स्मृतिग्रंथाच्या निमित्ताने ग्रंथबद्ध होतील. उद्या कुणाला विवेक या नटासंबंधात कुतूहल निर्माण झालंच तर त्याला हा स्मृतिग्रंथ वाचनालयात उपलब्ध होऊ शकेल.म्हणूनच पुन्हा म्हणतो, ‘‘तुम्हाला विवेक नटाबाबत विशेष माहिती आहे काय? कळवा. शेवटी हा एक प्रकारे जगन्नाथाचाच रथ आहे. कलाक्षरे सदरातून ही हाक माझ्या वाचकांसाठी!विवेकबद्दल चटकन माहिती उपलब्ध होत नाही. जी मिळते ती म्हणजे चित्रपटांची यादी वा त्याची जुजबी ओळख. त्यापेक्षा अधिक माहिती हवी आहे. याच कारणाने विवेकसंबंधात एक स्मृतिग्रंथ करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत भारती मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.
आठवण विवेकसाठी
By admin | Published: June 26, 2016 4:03 AM