बोलणाऱ्याची मातीही विकली जाते, न बोलणाºयाचे सोनेही विकले जात नाही, अशा अर्थाची आपल्याकडे म्हण आहे़ खासगी शिकवण्यांच्या बाबतीत ती तंतोतंत लागू पडते़ खासगी शिकवणी हा कमी भांडवलात उत्तम नफा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने याचे पेव वेगाने पसरत गेले. काही वर्षांपूर्वी तर दहावी-बारावीत टॉपमध्ये आलेले विद्यार्थी आमच्याच क्लासचे होते, अशा बिनदिक्कत खोट्या जाहिरातीही प्रसिद्ध केल्या गेल्या़ या खोटेपणाला आळा घालण्याची नितांत गरज होती़ सुरुवातीच्या काळात या खासगी शिकवण्यांत होणाºया पैशाच्या उलाढालींवर कोणाचेच नियंत्रण नव्हते़ त्यामुळे शाळेत शिकवणाºया शिक्षकांनीही खासगी शिकवण्या सुरू केल्या. काही शाळांनी तर शाळेतच खासगी शिकवणी सुरू केली़ यावर शिक्षण विभागाने तेव्हाच निर्बंध घालणे आवश्यक होते़ मात्र भ्रष्ट प्रशासकीय कारभाराचे पाठबळ मिळाल्याने कोचिंग क्लासेस अधिकच बळकट होत गेले़़ शालेय शिक्षणाला समांतर अशी शिक्षण पद्धती खासगी क्लासेसच्या नावाने सुरू झाली़ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, की त्यांचे बॅनर लावण्याची प्रथा सुरू झाली़ आमच्याकडे शिकवणी घ्याल तर शाळा व महाविद्यालयात हजेरीची गरज नाही, असेही कोचिंग क्लासेस घेणारे सांगू लागले़ अखेर पाच वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली़ न्यायालयाने गंभीर दखल घेत खासगी कोचिंग क्लासेससाठी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर शासनाने नियमावली तयार केली़ पण त्याची अंमलबजावणी ताकदीने झाली नाही़ आता पुन्हा शासनाने यासाठी नियमावली तयार केली आहे़ यातील हास्यास्पद बाब म्हणजे कोचिंग क्लासच्या नफ्यातील एक टक्का रक्कम चालकांना शासनाकडे जमा करावी लागणार आहे़ या पैशाचा वापर शिक्षण पद्धती सुधारण्यासाठी केला जाणार आहे़ एकीकडे समांतर शिक्षण पद्धतीला मोकळे रान द्यायचे आणि त्यांच्याकडूनच पैसे घेऊन प्रशासकीय शिक्षण पद्धती सुधारायची, ही शासनाची दुटप्पी भूमिका आहे़ कोचिंग क्लासेसने आर्थिक दुर्बल घटकांसाठी जागा राखून ठेवून त्यांना मोफत शिकवणी देण्याचा नियम स्वागतार्ह आहे़ असे असले तरी आता पालकांनी खासगी शिकवणीचा गांभीर्याने विचार करायला हवा़ एकीकडे शाळांतील शिक्षणासाठी हजारो रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे शिक्षकांवर अविश्वास दाखवून खासगी शिकवणी लावायची हा विरोधाभास असून शालेय शिक्षणच अधिक सक्षम व्हायला पाहिजे, यादृष्टीने शिक्षण तज्ज्ञांनी पावले उचलायला हवीत़ अन्यथा हे उपायही तोकडे ठरतील़
खासगी क्लासेसना वेसण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:52 AM