सुमारे सहा वर्षांपूर्वी पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील एकमात्र आरोपी मिर्झा हिमायत बेग याला पुणे न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कमी करून त्याला जन्मठेपेची सजा सुनावण्याचा निवाडा जाहीर केला आहे. संसदेवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी अफझल गुरू यास झालेली फाशी चुकीच्या पद्धतीने दिली गेली अशी चर्चा सध्या देशभर सुरू असून, एकूणच फाशीच्या शिक्षेच्या विरोधातील दबाव वाढत असून, त्याचाच तर हा परिणाम नव्हे ना, अशी शंका उपस्थित केली जाऊ शकते. विशेष तपास पथकाने बेगवर अनेक आरोप ठेवले होते आणि ज्या बॉम्बचे स्फोट घडवून आणले गेले त्यांची निर्मितीदेखील त्यानेच केली या आरोपाचा त्यात समावेश होता. उच्च न्यायालयाने मात्र एक वगळता बाकी सर्व आरोपांमधून त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बेगच्या राहत्या घरी पोलिसांना तब्बल बाराशे किलो इतक्या मोठ्या प्रमाणातील आरडीएक्सचा साठा आढळून आला होता. परिणामी उच्च न्यायालयाने प्राणघातक स्फोटके जवळ बाळगल्याचा एकमात्र आरोप त्याच्याविरुद्ध सिद्ध होत असल्याचे स्वीकारून त्यासाठी त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. हिमायत बेगकडे जी स्फोटके सापडली त्याच स्फोटकांचा वापर करून त्याने बॉम्ब तयार केले व जर्मन बेकरीत प्रत्यक्ष स्फोट घडवून आणणाऱ्यांच्या सुपूर्द केले असा कोणताही नि:संदिग्ध पुरावा तपासी यंत्रणेला सादर करता आला नाही असे निकालपत्रात नमूद करून न्यायालयाने तपासी यंत्रणेवर कडक ताशेरे ओढले आहेत. बॉम्बची निर्मिती नेमकी कोणी केली, ते कोणी कोणाच्या हवाली केले आणि त्यांची नेमकी पेरणी कोणी केली हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहिल्याचे व त्यालाही पोलीसच जबाबदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सबब सतरा निरपराधांचा बळी घेणाऱ्या आणि ५८ जणांना जखमी करणाऱ्या या घातपाती कृत्यामागील गुन्हेगार आजही मोकळेच आहेत. हिमायतला जन्मठेप झाली असून व जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत कारावास असा अर्थ अलीकडे मांडला जात असताना, त्याने कच्च्या कैदेत काढलेले दिवस या शिक्षेत जमा धरले जातील असे जे न्यायालयाने म्हटले आहे त्याचा उलगडा मात्र होत नाही.