विसाव्या शतकात खनिज तेलाने जगाची ऊर्जेची गरज भागवली. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दोन दशकातही खनिज तेल हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत राहिला आहे आणि आणखी काही दशके तरी हीच स्थिती कायम राहणार आहे; मात्र हे शतक संपता संपता मानवाला ऊर्जेचा पर्यायी स्रोत शोधावाच लागणार आहे. खनिज तेलाचे साठे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने, ते संपण्यापूर्वी दुसरा ऊर्जास्रोत शोधणे अपरिहार्य आहे. संशोधकांनी त्यासाठी हायड्रोजन वायूवर लक्ष केंद्रित केले आहे. पृथ्वीच्या वातावरणात हायड्रोजन वायू अत्यल्प प्रमाणात आहे; मात्र पृथ्वीचा तीन-चतुर्थांश भाग व्यापून टाकलेल्या पाण्याचा तो प्रमुख घटक आहे. हायड्रोजनचे दोन अणू आणि आॅक्सिजनचा एक अणू यांच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार होणारे संयुग म्हणजे पाणी! थोडक्यात काय, तर पाण्यातून हायड्रोजन वेगळा करता आल्यास, अत्यंत स्वच्छ, मुबलक व स्वस्त इंधन उपलब्ध होऊ शकते; मात्र अडचण ही आहे, की पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करण्याच्या उपलब्ध प्रक्रिया एक तर अत्यंत खर्चिक आहेत किंवा त्यासाठी लागणारी ऊर्जा, प्राप्त होणाऱ्या हायड्रोजनपासून मिळणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. त्यामुळे या प्रक्रिया करून हायड्रोजन मिळविणे आणि तो ऊर्जास्रोत म्हणून वापरणे, हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरतो. त्यामुळे गत अनेक वर्षांपासून, पाण्यातून स्वस्त व जलदगतीने हायड्रोजन वेगळा कसा करता येईल, यावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नांना पहिले यश लाभल्याची सुखद बातमी अमेरिकेतील हुस्टन विद्यापीठातून आली आहे. त्या विद्यापीठातील भौतिक शास्त्रज्ञांनी पाण्यापासून हायड्रोजन वेगळा करण्याची एक कार्यक्षम प्रक्रिया शोधून काढली आहे. पाण्याचे हायड्रोजन व आॅक्सिजनमध्ये विभाजन करण्यासाठी, प्रत्येक वायूसाठी एक याप्रमाणे दोन प्रक्रिया कराव्या लागतात. त्यापैकी आॅक्सिजन वेगळा करण्यासाठी कार्यक्षम उत्प्रेरक शोधण्यात शास्त्रज्ञांना आजवर यश मिळाले नव्हते. हुस्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना नेमके तसे उत्प्रेरक शोधून काढण्यात यश लाभले आहे. हे उत्प्रेरक सध्या वापरात असलेल्या उत्प्रेरकांच्या तुलनेत अत्यंत कार्यक्षमरीत्या आॅक्सिजन वेगळा करण्यात सक्षम आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते स्वस्त पडेल, असा हुस्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. विशेष म्हणजे, त्यांनी शोधलेल्या प्रक्रियेत कार्बनही निर्माण होत नाही. हे संशोधन ‘सुफळ संपूर्ण’ झाल्यास ऊर्जेची प्रत्येक गरज पाण्यापासून भागविली जाऊ शकेल. विशेष म्हणजे, त्यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी पोहचणार नाही; कारण ऊर्जा निर्मितीसाठी हायड्रोजनचे ज्वलन करताना त्यापासून कोणतेही घातक वायू निर्माण होत नाहीत, तर केवळ पाणीच निर्माण होते. त्यामुळे हुस्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे संशोधन अत्यंत क्रांतिकारी सिद्ध होणार आहे. ते लवकरात लवकर पूर्णत्वास जाओ, हीच प्रत्येक पर्यावरणप्रेमीची इच्छा असणार आहे!
क्रांतिकारी संशोधन!
By admin | Published: May 20, 2017 3:04 AM