ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक विराजमान होत असल्याने भारतात 'गर्व से कहो...' असा माहौल आहे. अर्थमंत्री म्हणून ११ डाउनिंग स्ट्रीटवर पत्नी व मुलीसोबत दिवाळी साजरी करणारे, भगवद्गीता हातात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे हिंदू पंतप्रधान ब्रिटनची सूत्रे घेत असल्याबद्दल अपार आनंद व्यक्त होत आहे. दीड महिन्यापूर्वी लिझ ट्स यांच्याशी स्पर्धेत सुनक यांची संधी हुकली तेव्हा भारतीय हळहळले होते. आता दिवाळीत लक्ष्मीपूजनादिवशी ती संधी साधली गेल्याने काही फटाके त्यासाठीही फोडले गेले.
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. सुधा मूर्ती मराठी असल्याने यात तोही अतिरिक्त गोडवा आहे. भारतीयांना झालेला आनंद स्वाभाविक, नैसर्गिक आहे; परंतु त्यामुळे काहीतरी क्रांतिकारक घडल्यासारखी फार छाती फुगविण्याची अथवा वृथा अभिमान बाळगण्याची, झालेच तर देश सांभाळायला भारतीय लायक नाहीत असे म्हणणाऱ्या विन्स्टन चर्चिलला फार सुनावण्याचीही गरज नाही.
ऋषी सुनक यांचे पंतप्रधानपद काही आकाशातून अवतरलेले नाही. त्यात हुजूर पक्षाचे राजकारण आहेच. भारतीय किंवा पाकिस्तानी, अधिक व्यापक स्वरूपात सांगायचे तर आशियाई वंशाचा ब्रिटनच्या समाजकारणावर, राजकारणावर प्रभाव आहेच. तो अलीकडे वाढूही लागला आहे. मूळचे पाकिस्तानचे सादिक खान २०१६ पासून लंडनचे महापौर आहेत. इंग्लंड आणि वेल्स मिळून ब्रिटनच्या लोकसंख्येत साडेसात टक्क्यांहून अधिक आशियाई आहेत.
ब्रिटनच्या संसदेत पंधरा खासदार भारतीय वंशाचे आहेत, तर इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत भारताचा क्रमांक चीननंतर दुसरा आहे. ब्रिटनमधील आघाडीच्या शंभर उद्योजकांमध्ये ९. तर वीस सर्वाधिक धनवानांच्या यादीत तिघे भारतीय वंशाचे आहेत. आशियाई वंशाचे लोक डावीकडे झुकलेल्या मजूर पक्षाचे समर्थक असायचे. सादिक खान मजूर पक्षाचेच आहेत. आता मात्र धर्माभिमानी ख्रिश्चन व रूढी-परंपराप्रिय हिंदू समाजात हुजूर पक्षाला समर्थन वाढते आहे.
तुलनेने मुस्लीम व शीख समाज मात्र अजूनही मजूर पक्षाचा समर्थक आहे. आतापर्यंत मॉरिशस, गयाना किंवा सुरीनामसारख्या छोट्या देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान मूळ भारतीय राहिले आहेत. कारण, त्या देशांमध्ये भारतातून स्थलांतरित झालेल्यांची संख्या मोठी आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांचे मूळ गोव्यात, तर आयर्लंडमधील लिओ वराडकर यांचे कोकणात आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या विजयानंतर भारतीय आनंदले. आता ऋषी सुनक यांनी अभिमानाचे क्षण दिले आहेत.
खरे पाहता ऋषी सुनक किंवा कमला हॅरिस यांची निवड हा त्या त्या देशांच्या उदारमतवादी सामाजिक, राजकीय संस्कृतीचा विजय आहे. कोणत्या तरी कारणांनी ज्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली, निर्वासित म्हणून जगणे नशिबी आले, त्यांना या देशांनी स्वीकारले, सांभाळले आणि देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याइतके अनुकूल वातावरण दिले. एका दृष्टीने हा तीस वर्षांपूर्वी जगातल्या बहुतेक देशांनी स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचा किंवा वैश्विक खेडे या संकल्पनेचाही विजय आहे.
वंश, धर्म, जात, प्रांत, भाषा नव्हे, तर गुणवत्ता हाच निवडीचा निकष मानणारी ही संकल्पना आहे. म्हणूनच ज्यांच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नव्हता अशा ब्रिटनने आर्थिक मंदीच्या काळात देशाची सत्तासूत्रे धर्म व भौगोलिक मूळ न पाहता गेल्या दोनशे वर्षांमधील सर्वाधिक तरुण पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हाती विश्वासाने सोपविली आहेत. अमेरिकेने तर असे अन्य देशांमध्ये मूळ असलेल्या तब्बल २३ अध्यक्षांना निवडून दिले.. बराक ओबामा हे त्यापैकी अलीकडचे ताजे उदाहरण.
तेव्हा, सुनक यांच्याबद्दल अभिमान बाळगताना भारताने असा उदार वैश्विक दृष्टिकोन स्वीकारला का, श्रीमती सोनिया गांधी यांचा जन्म इटलीमध्ये झाला म्हणून आपल्या राजकारणात गदारोळ माजवला गेला तो संकुचितपणा नव्हता का, तो आपण कधी सोडणार आहोत, असे प्रश्न आपण स्वत:लाच विचारायला हवेत. तसे न करता केवळ ऋषी सुनक यांचे आजोबा सध्याच्या पाकिस्तानातील गुजरानवाला म्हणजे फाळणीपूर्व भारतातून केनियाला गेले, या मुद्यावर वृथा अभिमान बाळगण्यापेक्षा त्यांच्या सत्ताकाळातील दोन्ही देशांच्या संबंधांवर अधिक चर्चा व्हायला हवी. नरेंद्र मोदी व बोरीस जॉन्सन यांनी आधीच आखून ठेवलेली मुक्त व्यापार व अन्य सहकार्याची वाट भारतीयांचे लाडके जावई अधिक प्रशस्त करतील, अशी आशा बाळगूया.