मोबाइल फोनच्या माध्यमातून होणाऱ्या वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गेल्या गुरुवारी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता जे दुकानदार सीमकार्डाची घाऊक खरेदी करतात, अशा विक्रेत्यांची वैयक्तिक पोलिस पडताळणी होणार आहे. तसेच, त्यांच्यामार्फत ज्या सीमकाडांची विक्री होते ती कुठे होते, कुणाला होते, सीमकार्ड खरेदी करणाऱ्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे संबंधित विक्रेत्याने नीट पडताळून त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवला आहे का, याचीदेखील तपासणी होणार आहे. आजवर या सीमकार्ड खरेदी-विक्री व्यवहारांकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते.
मात्र, आता त्याची कडक पडताळणी करणारे धोरणच केंद्र सरकारच्या पातळीवरून आल्यामुळे सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानता येईल. यानिमित्ताने केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जी माहिती दिली आहे ती जर नीट समजून घेतली तर असा निर्णय घेणे किती गरजेचे होते, हे समजू शकेल. सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने देशभरामध्ये मोबाइल सीमकार्डाची विक्री करणाऱ्या तब्बल ६७ हजार विक्रेत्यांची यादीच सरकारच्या हाती लागली आहे. या प्रकरणांत देशभरात एकूण ३०० एफआयआरदेखील पोलिसांनी नोंदवले आहेत तर, या विक्रेत्यांच्या मार्फत विक्री झालेली तब्बल ५२ लाख अवैध सीमकार्ड सरकारने बंद केली आहेत.
अवैध सीमकार्ड विक्री व्यवहारांची व्याप्ती समजून घेण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. यानिमित्ताने सरकारने आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे ती म्हणजे, सीमकार्डाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची केवळ पडताळणीच होणार नाही तर हे केल्यानंतरही जे लोक अवैधरीत्या सीमकार्ड विकतील, अशा लोकांना तब्बल १० लाख रुपयांपर्यंत दंडाच्या कारवाईची देखील तरतूद या नव्या धोरणांतर्गत करण्यात आली आहे. साधा मोबाइल जेव्हा उत्क्रांतीचे टप्पे पार करत स्मार्ट फोनपर्यंत पोहोचला त्यावेळी त्याद्वारे मिळणाऱ्या तंत्रसुविधेने जसे सर्वसामान्य लोकांचे आयुष्य सुसह्य केले त्याचप्रमाणे या तंत्राच्या वापराला गुन्हेगारांनीही आपलेसे केले. गुन्ह्याचे स्वरूप बदलले.
यापूर्वी सामान्य लोक ज्या गुन्ह्यांचे बळी पडत होते, त्याचे आरोपी त्यांच्या आजूबाजूलाच असायचे आणि त्यामुळे पोलिसांनादेखील त्यांना पकडणे फारसे जिकिरीचे नसायचे. पण तंत्र क्रांतीनंतर गुन्हेगारीचे जग दृष्टीआडच्या सृष्टीतून चालू लागले. गुन्हेगार अदृश्यपणे गुन्हे करू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य जनता आपल्या आयुष्याचे आर्थिक संचित गमावू लागले, जगात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने भारताबाबत केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तब्बल ३१ टक्के भारतीयांनी सायबर गुन्ह्यांमध्ये आपले सर्व संचित गमावले आहे.
एकीकडे लोकांचे पैसे जात आहेत तर अलीकडच्या काळात सेक्सटॉर्शनसारखे प्रकारही होत आहेत. कोणत्याही मोबाइल क्रमांकावरून लोकांना अचानक व्हिडीओ कॉल येतात व समोरची विवस्त्रावस्थेतील व्यक्ती संबंधित व्यक्तीचे रेकॉर्डिंग करत त्याला नंतर ब्लॅकमेल करते. या सर्वांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केला तर बनावट नावावर घेतलेल्या सीम कार्डावरून हे होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा बनावट पद्धतीने विक्री होणाऱ्या सीम कार्डासंदर्भात धोरण निश्चित करणे गरजेचेच होते. पण केवळ सीमकार्ड विक्रीसंदर्भात धोरण निश्चित करून भागणार नाही. कारण तंत्र गुन्हेगार रोज नवनवे मार्ग शोधत आहेत. अलीकडे सीमकार्डाचे क्लोनिंग हादेखील भयावह प्रकार पुढे येत आहे.
याचा अर्थ असा की, तुमच्याच मोबाइल क्रमांकाचे दुसरे कार्ड दुसऱ्या मोबाइलमध्ये बसवून त्याद्वारे व्यवहार करणे. हे प्रकार तूर्तास कमी असले तरी एक मार्ग बंद झाल्यावर गुन्हेगार दुसरे मार्ग शोधतात, हे वास्तव आहे. त्यामुळे केवळ सरसकट गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांचे विश्लेषण करून त्यावर तोडगा काढण्यासोबतच तंत्र गुन्ह्यातील प्रत्येक प्रकार, कार्यपद्धती, त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन मार्ग काढणेही तितकेच गरजेचे आहे. अलीकडे एका ओटोटी प्लॅटफॉर्मवर जामतारा नावाची मालिका आली आहे. मोबाइलच्या माध्यमातून सायबर गुन्हे कशा पद्धतीने होतात त्याचे उत्तम चित्रण यामध्ये केलेले आहे. जामताराच्या पहिल्या सीझनपेक्षा दुसऱ्या सिझनमध्ये गुन्ह्याची वेगळी कार्यपद्धती दिसते. त्यामुळेच तिसरा जामतारा वास्तवात येऊ नये, याकरिता वेळीच सावध हाका ऐकणे गरजेचे आहे.