- विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
एका बाजूला खोल दरी, इतकी खोल; की आपल्या वाहनाचे चाक इंचभराने जरी घसरले, तरी थेट मृत्यूशी गाठ ठरलेली! जिवंत वाचण्याची शून्य शक्यता! दुसऱ्या बाजूला उंच उभे सुळक्यासारखे पहाड. ज्याच्यावरून भल्यामोठ्या शिळा तुटून खाली गडगडत येण्याचा धोका कायमच असतो. कोणता दगड काळ होऊन कधी खाली येईल समजणार नाही. पहाडाचा कुठला तुकडा घसरून वेगाने गडगडत खाली येईल आणि रस्ता बंद होईल, याचा अंदाज करणे अर्थातच मुश्कील!
खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याची रुंदी पंधरा फुटांपेक्षा जास्त नाही. विशेषत: जोझीला खिंड ते सोनमर्ग यादरम्यानचे सुमारे २७ किलोमीटरचे अंतर अतिशय धोकादायक. - या थरारक प्रवासात माझ्याबरोबर बंधू राजेंद्रही होते. आम्ही प्रत्येक क्षणाला देवाचे नाव घेत सावकाश पुढे चाललो होतो. ‘एनएच-१’ नावाच्या या घाबरवून टाकणाऱ्या रस्त्याने झालेल्या या थरारक प्रवासाचे निमित्तही तसे रोचक होते. ‘महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्रा’तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा महाकरुणा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी लेहला गेलो होतो. तेथून हेलिकॉप्टरने आम्हाला द्रासला जायचे होते. तेथे लोकमत समूह आणि जनसहयोगातून सैनिकांसाठी उभारण्यात आलेल्या उबदार घरांचे लोकार्पण होणार होते. द्रासमध्ये हवामान खराब असल्याचे समजले. अशा हवामानात हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नव्हते. त्यामुळे रस्त्याने निघालो. द्रासपर्यंतचे २८० किलोमीटरचे अंतर कापायला आम्हाला तब्बल आठ तास लागले. जम्मू- काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यातील द्रास हे मानवी वस्ती असलेले जगातले दुसरे सर्वाधिक थंड ठिकाण आहे. रशियाचे ओमियाकोन पहिल्या क्रमांकावर येते. द्रासचे तापमान उणे २२ डिग्रीपर्यंत घसरते. गतवर्षी इथले तापमान उणे २७.२ इतके खाली गेले होते. अर्थात ९ जानेवारी १९९५ चा विक्रम तर अति भयंकर आहे. तेव्हा द्रासचे तापमान उणे ६० डिग्री झाले होते. १९९९ मध्ये कारगिलचे युद्धही 0 ते उणे १० तापमानात लढले गेले होते. द्रासला पोहोचायच्या आधीच १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाच्या आठवणीने आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. ताशी नांग्याल हे नावही आठवले. हा द्रास भागातला एक गावकरी!
आपले हरवलेले याक शोधायला एका पहाडावर चढला आणि त्याला समोर काही हालचाल दिसली. १३ मे १९९९चा तो दिवस होता. त्याने लगोलग खाली येऊन भारतीय सैन्याला सावध केले. नेमके काय घडते आहे हे कळायला भारताला थोडा वेळ लागला. तोवर पाकिस्तानी फौज गुपचूप शिखरांवर पोहोचली होती. ते उंचावर होते आणि आपले सैन्य त्यांच्या निशाण्यावर; पण काय घडले आहे हे लक्षात येताच भारतीय सैन्याने जो पराक्रम दाखवला त्याला इतिहासात तोड मिळणे अवघड आहे. कारगिलच्या युद्धात सुमारे अडीच लाख बॉम्बगोळे आणि क्षेपणास्त्रे डागली गेली. पाकिस्तानी सैन्याला पळून जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उरला नाही.२६ जुलै म्हणजे कारगिल विजय दिनाच्या दिवशी मी आणि राजेंद्र, आम्ही दोघेही द्रासमधल्या कारगिल युद्ध स्मृतिस्तंभासमोर उभे होतो.
माझे संपादकीय सहकारी सुरेश भुसारी आणि मुख्य छायाचित्रकार राजेश टिकले हेही आमच्याबरोबर होते. समोर उभ्या युद्धाच्या स्मृतिस्तंभावर ५५९ हुतात्म्यांच्या नावाच्या पट्ट्या होत्या. ती नावे वाचता वाचता माझे डोळे भरून आले. हृदय हेलावले. त्या शहिदांबद्दल कृतज्ञतेने काही बोलायला माझ्याकडे साधे शब्दही नव्हते. हात जोडून आम्ही कितीतरी वेळ नुसते स्तब्ध उभे राहिलो. मनात आले, आपल्या याच फौजी बांधवांमुळे आपण आपापल्या घरी सुखाने झोपू शकतो. यांच्यामुळेच तर देश सुरक्षित राहतो. तिरंग्याचा मान यांच्यामुळेच राखला जातो. आमच्यासोबत सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता, मेजर जनरल नागेंद्रसिंह, ब्रिगेडियर यू. एस. आनंद आणि ब्रिगेडियर बी. एस. मुलतानी होते. गप्पांच्या ओघात मी त्यांना सहज विचारले, हे युद्धस्मारक द्रासमध्येच का उभे केले गेले?
मेजर जनरल नागेंद्रसिंह म्हणाले, आपण हे जे उंच पहाड पाहत आहात त्यांच्यावरच कारगिलचे युद्ध लढले गेले आणि इथूनच ५५९ हुतात्म्यांचे पार्थिव देह खाली आणले गेले. शहिदांचे पार्थिव देह तर त्यांच्या घरी पोहोचले, पण त्यांच्या पराक्रमाची आठवण अभंग ठेवण्यासाठी इथे कारगिल युद्ध स्मृतिस्तंभ उभारला गेला. आमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या शिखरांकडे बोटे दाखवत नागेंद्रसिंहजी सांगत होते, कारगिलचे ७० टक्के युद्ध द्रासच्या शिखरांवरच लढले गेले. समोर दिसते ते तोलोलिंग शिखर ! ते टायगर हिल ! बत्रा पीकही इथेच आहे...
हिवाळ्यात या भागात तापमान उणे ६०च्याही खाली जाते. याच शिखरांवर पाकिस्तानी फौज येऊन बसली होती. श्रीनगर-लेह रस्ता हे त्यांचे लक्ष्य होते. त्याच रस्त्याने सहा महिने रसद आणि सैन्य पाठविले जाते. या रस्त्यावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला असता तर अनर्थ झाला असता. अशात कॅप्टन विक्रम बत्रा यांना शिखर क्रमांक ५१४० वर कब्जा करण्याचे आदेश मिळाले. तिथे पोहोचणे अतिशय कठीण होते. तरीही विक्रम बत्रा यांनी ते शिखर जिंकले. तिथूनच त्यांनी विजयी उद्घोष केला होता, ‘ये दिल मांगे मोअर’... त्या पराक्रमी तरुणाचे ते शब्द सगळ्या जगभरात घुमले. या मोहिमेसाठी विक्रम बत्रा यांचे सांकेतिक नाव होते शेरशाह. त्यामुळेच बत्रा यांना कारगिलचा वाघ असेही म्हटले जाते. त्यानंतर बत्रा यांना ४८७५ क्रमांकाचे शिखर सर करण्याची जबाबदारी देण्यात आली. अशक्य वाटणारे हे कामही बत्रा यांनी धाडसाने केले. परंतु त्यावेळच्या चकमकीत झालेल्या गंभीर जखमांमुळे विक्रम बत्रा यांना वीरगती प्राप्त झाली. ४८७५ या शिखराला आता ‘बत्रा पीक’ असे नाव मिळाले आहे.युद्धाच्या काळातली परिस्थिती अधिकच आणीबाणीची असते. असे प्रसंग बाजूला ठेवले तरी एरवी शांतता काळातसुद्धा सैनिक येथे किती कठीण परिस्थितीत राहतात याचा अंदाज सामान्य माणसाला लागणे अशक्य आहे. या भागात कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या अंगावर सात अस्तरांचे गरम कपडे असतात हा विचारही अंगावर काटा आणणारा आहे. शत्रूपेक्षाही निसर्गाचे उग्र स्वरूप हे या भागातले अधिक मोठे आव्हान असते. लोकमत फाउंडेशन आणि जनसहयोगातून या भागातील सैनिकांसाठी विशेष अशी गरम घरे तयार केली गेली आहेत.
शून्यापेक्षा कितीतरी खाली तापमान गेले तरीही ही घरे सैनिकांना उबदार वातावरणातले विश्रांतीस्थान देऊ शकतील. कारगिल युद्धानंतर भारतीय सैन्यासाठी केल्या जाणाऱ्या नागरी प्रयत्नांमध्ये ‘लोकमत’ने नेहमीच मोठा हातभार लावला, याचा मला आनंद आहे आणि अर्थातच समाधानही ! हाडे गोठवणाऱ्या थंडीत वावरणाऱ्या सैनिकांसाठी ही गरम घरे तयार करण्याच्या कामी लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी मोठे परिश्रम घेतले. मी त्यांचा कृतज्ञ आहे.शहिदांना वंदन करून आम्ही पुढे श्रीनगरला रवाना झालो. परंतु जोझीला खिंडीजवळ सुमारे अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर फूट उंचीवरून सोनमर्गपर्यंतचा जवळजवळ २७ किलोमीटरचा रस्ता अत्यंत भयावह होता. या स्तंभाच्या प्रारंभी मी त्याचा उल्लेख केला आहे. इतक्या उंचावर प्राणवायूची कमतरता जाणवते. या प्रवासादरम्यान माझ्या नाकातून दोनदा रक्त आले. माझ्या सहकाऱ्यांना कितीदा तरी उलट्या झाल्या. माझ्या मनात विचार आला, सैन्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘एनएच-वन’ या महामार्गाची हालत इतकी भयानक कशी ?
केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी देशभरात रस्त्यांचे जाळे पसरवण्याच्या कामात मग्न आहेत. त्यांनी रोहतांग क्षेत्रात अटल बोगद्याचे काम वेळेआधी पुर्ण केले. अरुणाचलात चीनच्या सीमेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही आता बोगदा तयार होतो आहे. गडकरी यांचे यासाठी अभिनंदन, पण आता ‘एनएच-वन’ या रस्त्याच्या अवस्थेकडेही त्यांनी तातडीने लक्ष द्यायला हवे. चीनने लडाख क्षेत्रापासून अरुणाचल प्रदेशापर्यंत भारताच्या अगदी जवळून अतिशय चांगले रस्ते तयार केले आहेत. अक्साई चीनमध्ये दोन नव्या हमरस्त्यांचे काम सुरू आहे. असे असताना, इतक्या संवेदनशील, महत्त्वपूर्ण भूभागात भारतालाच काय अडचणी येतात, हे मला समजत नाही. युद्धासाठी आधुनिक सामग्री जशी आवश्यक असते तसेच सैन्यासाठी उत्तम रस्तेही अतीव महत्त्वाचे असतात.
या प्रवासातला एक महत्त्वाचा अनुभव मला इथे आवर्जून नोंदवला पाहिजे. थंडीने काकडत असताना मला मराठा लाइट इन्फंट्रीचे सैन्य अधिकारी श्री मोखा भेटले. हे गृहस्थ सरदारजी. मला आश्चर्य याचे वाटत होते की सरदारजी माझ्यापेक्षा अस्खलित मराठीत बोलत होते. मी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्यावर ते म्हणाले, ‘मी ज्या रेजिमेंटचा आहे, त्याची भाषा जर मला बोलता आली नाही तर मला माझे काम कसे करता येईल? माझ्या सहकाऱ्यांची भाषा मलाच समजली नाही तर त्यांना समजावून सांगणे मला कसे साधेल?’
- मी थक्क होऊन ऐकत राहिलो. अशाच प्रकारे एक तामिळ सैन्य अधिकारी माझ्याशी अस्खलित हिंदीमध्ये बोलत होते. खरा भारत आपल्याला सैन्यात पाहायला मिळतो, तो हा असा ! जाती, धर्म, भाषा असे कुठलेही भेदभाव नसणारा भारत ! जय हिंद !